तुळशीच्या रोपाला आपल्याकडे अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत तुळस असणे म्हणजे प्रसन्नतेचे प्रतीकच! घराच्या अंगणात किंवा कुंडीत लावलेली तुळस ही केवळ धार्मिकच नाही तर औषधी दृष्ट्याही अतिशय महत्त्वाची वनस्पती आहे. अंगणात किंवा बाल्कनीत लावलेल तुळशीचं रोप कायम हिरवागार दिसावं, रोपाची वाढ व्यवस्थित व्हावी किंवा रोपाला भरपूर हिरवीगार पाने यावीत असे आपल्याला वाटते(Tulsi plant has turned black gardener tips & how to save it).
तुळशीच्या रोपाची आपण अत्यंत बारकाईने काळजी घेतोच, तरीपण अनेकदा या रोपाची हिरवीगार पाने अचानकपणे काळी पडू लागतात. अनेकदा हवामानातील बदल, कीड किंवा बुरशीमुळे तुळशीची पाने काळी पडू लागतात किंवा त्यावर एक प्रकारचा काळा थर जमा होतो, हे पाहून अतिशय वाईट वाटते. अशा परिस्थितीत, वेळेवर योग्य काळजी घेतली नाही तर तुळस कोमेजू शकते. केमिकल कीटकनाशकांचा वापर न करता, काही घरगुती आणि नैसर्गिक उपाय केल्यास हा काळा थर सहज काढता येतो आणि तुळशीच्या रोपाला पुन्हा हिरवेगार व ताजेपणा मिळतो. पण काळजी करू नका! काही सोप्या घरगुती उपायांनी तुळशीच्या रोपाला पुन्हा नवसंजीवनी देऊ शकता. तुळशीच्या पानांवरील हा काळा थर नक्की कशामुळे येतो आणि तो घालवण्यासाठी कोणते घरगुती उपाय फायदेशीर ठरतात ते पाहूयात...
तुळशीची हिरवीगार पाने अचानकपणे काळी पडू लागल्यास...
१. कडुलिंबाच्या तेलाचा स्प्रे :- कडुलिंब हे नैसर्गिक कीटकनाशक आहे जे रोपांवरील बुरशी आणि कीड नष्ट करते. १ लिटर पाण्यात १ चमचा कडुलिंबाचे तेल आणि २ ते ३ थेंब लिक्विड सोप मिसळा. हे मिश्रण बाटलीत भरून काळ्या पडलेल्या पानांवर स्प्रे करा. यामुळे कीड मरते आणि पाने स्वच्छ होतात.
२. हळदीचे पाणी :- हळद ही अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल असते, जी रोपांनवरील रोग, कीड लागण्याची समस्या नैर्सगिकपणे दूर करण्यास मदत करते. १ लिटर पाण्यात १ मोठा चमचा हळद मिसळा. हे पाणी तुळशीच्या मुळाशी घाला आणि थोड्या पाण्याचा पानांवर शिडकावा करा. यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव कमी होतो.
३. कोरडी राख :- गावखेड्यात हा उपाय आजही खूप लोकप्रिय आहे. लाकडाची थोडी कोरडी राख घेऊन ती तुळशीच्या पानांवर आणि फांद्यांवर सकाळी लवकर (दव असताना) भुरभुरवून घालावी. २ ते ३ दिवसांनी पाण्याने रोप स्वच्छ धुवून टाकावे. ही राख कीड आणि काळा थर शोषून घेते व यामुळे तुळशीच्या रोपाची पाने पुन्हा हिरवीगार होण्यास मदत मिळते.
४. बेकिंग सोडा आणि पाणी :- तुळशीच्या पानांवरील बुरशीचा थर काढण्यासाठी बेकिंग सोडा खूप उपयुक्त ठरतो. अर्धा चमचा बेकिंग सोडा १ लिटर पाण्यात मिसळा आणि पानांवर फवारा. यामुळे पानांवरील काळेपणा निघून जाण्यास मदत होते.
५. दूध आणि पाणी :- दूध व पाणी समप्रमाणात मिसळून पानांवर फवारा. यामुळे पानांवरील काळा थर कमी होतो आणि पानांना चमक येते.
तुळशीच्या पानांचा हिरवागार रंग काळा पडू नये म्हणून...
१. पाण्याचा अतिवापर टाळा :- तुळशीच्या कुंडीत पाणी साचून राहिल्यास मुळे सडतात आणि पाने काळी पडतात. फक्त माती कोरडी वाटली तरच पाणी द्या.
२. मंजिरी काढत राहा :- तुळशीला मंजिरी (बिया) आल्या की रोपाची वाढ थांबते. वेळोवेळी मंजिरी छाटत राहिल्याने रोप हिरवेगार राहते व रोपाची वाढ देखील चांगली होते.
३. सूर्यप्रकाश :- तुळशीला दिवसातून किमान ४ ते ५ तास ऊन मिळेल याची काळजी घ्या.
