फेंगशुई आणि वास्तूनुसार, हमखास बरेचजणांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये हिरवेगार 'लकी बांबू प्लांट' असतेच. फारशी काळजी न घेता हे रोप दिसायला अतिशय सुंदर दिसते, म्हणूनच अनेकजण ते घरात किंवा ऑफिसच्या टेबलावर मोठ्या आवडीने आणि हौसेने हे लकी बांबू प्लांट' ठेवतात. याचे वळणदार आणि स्टायलिश देठ कोणत्याही कोपऱ्याची शोभा वाढवतात(tips & tricks to grow lucky bamboo indoors).
फेंगशुईनुसार, हे रोप नकारात्मक ऊर्जा दूर करते आणि आनंद घेऊन येते, म्हणूनच लोक भेट देण्यासाठी याला पसंती देतात. मात्र, अनेकदा आपण पाहतो की, काही दिवसांनंतर या बांबूची पाने पिवळी पडू लागतात किंवा त्याची वाढ पूर्णपणे थांबते. लकी बांबूची वाढ खुंटण्यामागे पाण्याची गुणवत्ता, सूर्यप्रकाश आणि तापमानातील बदल अशी अनेक कारणे असू शकतात. बरेचदा हे लकी बांबू प्लांटचे इवलेसे रोप कोमेजून गेले की, अशावेळी हे प्लांट टाकून देण्याऐवजी थोडीशी (lucky bamboo plant care for healthy growth) योग्य काळजी घेतली, तर ते पुन्हा आधीसारखेच हिरवेगार आणि ताजेतवाने होऊ शकते. जर तुमच्याही 'लकी बांबू प्लांट'ची वाढ थांबली असेल, तर त्याला पुन्हा टवटवीत, हिरवेगार करण्यासाठी नेमकी कशी काळजी घ्यावी ते पाहूयात.
'लकी बांबू प्लांट' ची योग्य पद्धतीने काळजी कशी घ्यावी ?
१. पाणी देण्याची योग्य पद्धत :- लकी बांबू प्लांटची काळजी घेताना होणारी सर्वात मोठी चूक म्हणजे ' गरजेपेक्षा जास्त पाणी देणे'. यामुळे रोपाची मुळे सडू शकतात. जर तुम्ही हे रोप पाण्याच्या फुलदाणीत लावले असेल, तर त्याची मुळे पूर्णपणे पाण्यात बुडलेली राहतील याची खात्री करा आणि दर ७ ते १० दिवसांनी पाणी बदला. जर तुम्ही लकी बांबू प्लांट मातीत लावले असेल, तर पुन्हा पाणी देण्यापूर्वी वरची माती सुकली आहे की नाही हे तपासा. रोपाला योग्य ओलावा मिळाल्यास ते नेहमी हिरवेगार आणि सुंदर दिसते. लकी बांबूसाठी नळाचे थेट पाणी वापरू नका. नळाच्या पाण्यात क्लोरीन आणि फ्लोराईड असते, ज्यामुळे लकी बांबू प्लांट पिवळा पडतो. नेहमी फिल्टर केलेले पाणी किंवा 'RO' वॉटर वापरा. जर नळाचे पाणी वापरायचे असेल, तर ते २४ तास एका भांड्यात उघडे ठेवा आणि मगच वापरा.
२. तापमानाची योग्य पद्धतीने काळजी घ्या :- लकी बांबू प्लांट हे रोप भारताच्या उष्ण हवामानासाठी अतिशय योग्य आहे. लकी बांबूला नेहमी १८°C ते ३०°C दरम्यानच्या तापमानात ठेवावे. हे रोप कधीही हीटर किंवा एअर कंडिशनरच्या अगदी जवळ ठेवू नका, कारण तापमानातील अचानक होणाऱ्या बदलामुळे रोप खराब होऊ शकते. आर्द्रतेच्या बाबतीत, हे रोप मध्यम स्तरातील ओलावा सहजपणे सहन करते. ऑफिस किंवा घरात जिथे एसीची थेट हवा येते, तिथे हे रोप ठेवल्यास त्याची पाने कोरडी पडू शकतात. लकी बांबू प्लांटला अशा ठिकाणी ठेवा जिथे हवा व्यवस्थित खेळती असेल. खूप जास्त थंडी असल्यास लकी बांबू प्लांटला खिडकीपासून थोडे लांब ठेवावे, जेणेकरून रात्रीच्या गारव्याचा त्रास होणार नाही.
३. खत देण्याची योग्य पद्धत :- लकी बांबू प्लांटला खूप जास्त खताची गरज नसते. महिन्यातून फक्त १ ते २ थेंब सौम्य लिक्विड फर्टिलायझर (द्रवरूप खत) या रोपासाठी पुरेसे असते. जर पाण्याच्या भांड्यात बांबूची मुळे लाल रंगाची दिसू लागली, तर हे एक सुदृढ आणि निरोगी रोप असल्याचे लक्षण आहे. जर रोप पिवळे पडले असेल किंवा सुकल्यासारखे वाटत असेल, तर अशा स्थितीत खत घालू नका. सौम्य पर्यायासाठी तुम्ही 'फिश इमल्शन' किंवा 'कंपोस्ट टी'चा वापर करू शकता. बांबूला जास्त खत दिल्यास त्याची पाने जळू शकतात, त्यामुळे योग्य प्रमाणातच खत द्या. जेव्हा तुम्ही भांड्यातील पाणी बदलता, तेव्हाच खताचे थेंब टाका, जेणेकरून ते व्यवस्थित मिसळले जाईल.
खरंच की काय? करण जोहर सांगतो ‘ऑझेम्पिक’ नव्हे, भात-बटाटे खाऊनच ‘असं’ केलं वजन कमी...
४. सूर्यप्रकाशाचे महत्त्व :- या रोपाच्या वाढीसाठी सूर्यप्रकाश महत्त्वाची भूमिका बजावतो. लकी बांबू हा प्रखर पण अगदीच थेट नसावा अशा सौम्य सूर्यप्रकाशात सर्वात चांगल्या प्रकारे वाढतो. हे रोप अशा खोलीत ठेवा जिथे नैसर्गिक उजेड असेल किंवा जिथे खिडकीला पातळ पडदा लावलेला असेल. थेट सूर्यप्रकाशामुळे याची पाने जळू शकतात. खूप कमी किंवा खूप जास्त सूर्यप्रकाश मिळाल्यास झाडाची पाने पिवळी किंवा तपकिरी पडू शकतात. दुपारचे कडक ऊन पानांवर पडल्यास त्यावर काळे डाग पडू शकतात. शक्य असल्यास हे रोप पूर्व किंवा उत्तर दिशेकडील खिडकीजवळ ठेवा, जिथून सकाळचा कोवळा प्रकाश मिळेल. जर बांबूची पाने खूप जास्त फिकट होत असतील, तर त्याचा अर्थ त्याला पुरेसा प्रकाश मिळत नाही, अशावेळी त्याला थोड्या उजेडाच्या ठिकाणी ठेवा.
५. अशी करा छाटणी :- लकी बांबू प्लांटला निरोगी ठेवण्यासाठी वेळोवेळी त्याची छाटणी करणे आवश्यक असते. रोपाची पिवळी पडलेली किंवा खराब झालेली पाने कापून टाका. मुख्य देठ कधीही कापून नका; त्याऐवजी बाजूने येणारे फाटे किंवा फुटवे कापून मुख्य देठापासून सुमारे १ ते २ इंच अंतरावर ट्रिम करा. यामुळे रोपाला नवीन आणि निरोगी पाने फुटतात आणि त्याचा आकारही सुंदर राहतो. जर तुमच्या बांबूचे खोड खालून पिवळे पडले असेल, तर तो भाग कापून टाका आणि हिरवा भाग पुन्हा ताज्या पाण्यात ठेवा. पिवळा पडलेला भाग पुन्हा हिरवा होत नाही, त्यामुळे तो वेळीच काढणे गरजेचे असते. नियमित पाणी, प्रकाश, योग्य तापमान आणि छाटणी या गोष्टींचे पालन केल्यास तुमचे रोप दीर्घकाळ आकर्षक, ताजेतवाने व टवटवीत राहील.
Web Summary : Restore your lucky bamboo plant with these tips: proper watering, temperature, fertilizing, sunlight, and pruning. Avoid tap water, extreme temperatures, and over-fertilizing. Trim yellow leaves to encourage new growth, keeping your plant fresh and vibrant.
Web Summary : इन युक्तियों से अपने लकी बैम्बू प्लांट को पुनर्जीवित करें: उचित पानी, तापमान, उर्वरक, धूप और छंटाई। नल के पानी, अत्यधिक तापमान और अत्यधिक उर्वरक से बचें। नई वृद्धि को प्रोत्साहित करने के लिए पीले पत्तों को ट्रिम करें, जिससे आपका पौधा ताजा और जीवंत रहे।