Summer Gardening Tips : हिरवंगार गार्डन घराची सुंदरता वाढवतं. सोबतच हवा शुद्ध मिळते आणि फ्रेश वाटतं. पावसाळा आणि हिवाळ्यात झाडं तर हिरवीगार आणि टवटवीत राहतात. पण उन्हाळ्याची चाहूल लागताच, तापत्या उन्हामुळं झाडं सुकू लागतात. काही झाडं मरतातही. अशात झाडं मरू नये म्हणून काय करावं असा अनेकांना प्रश्न असतो.
जर उन्हाळ्यातही झाडं हिरवीगार ठेवायची असतील तर काही सोप्या टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीनं तुमची घरातील झाडं मरणार नाहीत आणि उन्हाळ्यातही हिरवीगार राहतील.
झाडांना कधी द्याल पाणी?
थंडीच्या दिवसात झाडांना तुम्ही कोणत्याही वेळी पाणी देऊ शकता. पण उन्हाळ्यात असं करणं झाडांसाठी घातक ठरू शकतं. उन्हाळ्यात झाडांना पाणी देण्यासाठी सगळ्यात चांगली वेळ सकाळी आणि सायंकाळी असते. यावेळी तापमान कमी असतं. दिवसा झाडाला पाणी टाकू नये.
जास्त पाणीही टाकू नका...
अनेक लोक असा विचार करतात की, उन्हाळ्यात झाडांना जास्त पाणी टाकल्यानं झाडं मरणार नाहीत. पण असं केल्यास झाडाचं नुकसान होऊ शकतं. उन्हाच्या संपर्कात आल्यानं झाडांची पानं चिमतात आणि गळून पडतात.
त्याशिवाय झाडांना अधिक पाणी दिल्यास मातीमध्ये जास्त ओलावा झाल्यानं बॅक्टेरिया विकसित होऊ शकतात. ज्यामुळे ऑक्सीजन झाडांना कमी मिळतं आणि त्यात फंगल तयार होतात.
माती झाकून ठेवा
गार्डनमध्ये किंवा कुंड्यांमधील माती झाकून ठेवल्यास सूर्यप्रकाश थेट मातीपर्यंत पोहोचत नाही. ज्यामुळे झाडांच्या मुळांच्या आजूबाजूला ओलावा राहतो आणि झाडं सुकत नाहीत. माती झाकून ठेवण्यासाठी त्यावर वाळलेली पानं, गवत, काडी-कचरा, पाला-पाचोळा टाकू शकता.
गार्डनमध्ये शेड लावा
सूर्याची प्रखर किरणे रोखण्यासाठी गार्डनमध्ये शेड किंवा बाल्कनीमध्ये हिरळी नेट लावू शकता. असं केल्यास झाडांचं नुकसान होणार नाही. जाळीदार शेड आणि नेट असेल तर झाडांना हवा चांगली मिळेल.