आपल्या बाल्कनीला किंवा बागेला मोगऱ्याच्या शुभ्र कळ्यांनी भरून काढायची अनेकांची इच्छा असते. परंतु, बऱ्याचदा रोपामध्ये योग्य वाढ होऊनही फुले येत नाहीत. अशा वेळी, बाजारातील महागडी खते वापरण्याऐवजी, तुम्ही अगदी स्वस्त आणि सहज उपलब्ध असलेल्या 'खडू' चा वापर करून तुमच्या मोगऱ्याच्या रोपाला बहर आणू शकता.
खडूचा वापर का करावा?
मोगऱ्याच्या रोपाच्या चांगल्या वाढीसाठी आणि भरपूर फुले येण्यासाठी कॅल्शियम या महत्त्वाच्या पोषक तत्त्वाची गरज असते. कॅल्शियममुळे रोपाच्या पेशींच्या भिंती मजबूत होतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि रोपाची संरचना मजबूत होते. पाटीवर लिहिण्यात येणारा सामान्य खडू हा प्रामुख्याने कॅल्शियम कार्बोनेट या संयुगाने बनलेला असतो. त्यामुळे, खडूचा वापर केल्यास रोपाला आवश्यक असलेले कॅल्शियम नैसर्गिकरित्या मिळते आणि फुले येण्याची प्रक्रिया उत्तेजित होते.
खडूचे तुकडे मातीत खोचणे
पाटीवर लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधे पांढरे खडू घ्या. मोगऱ्याच्या कुंडीतील रोपाच्या खोडापासून थोडे दूर आणि कुंडीच्या कडेला माती थोडी भुसभुशीत करा. एका कुंडीसाठी १ ते २ खडू घ्या आणि ते उभे मातीत अर्धे किंवा पूर्ण खोचून टाका. खडूचे कण हळूहळू पाण्यासोबत विरघळून मातीत मिसळा ज्यामुळे रोपाला दीर्घकाळ कॅल्शियमचा पुरवठा होत राहतो.
खडूची पावडर
खडूची बारीक पावडर तयार करा. कुंडीतील माती थोडी हलवा आणि त्यात एक चमचा खडूची पावडर समान प्रमाणात मिसळून घ्या. यानंतर रोपाला नेहमीप्रमाणे पाणी घाला.
किती वेळा वापरायचा?
हा उपाय तुम्ही साधारणपणे महिन्यातून एकदा किंवा दीड महिन्यातून एकदा करू शकता. कॅल्शियमचे प्रमाण जास्त झाल्यास मातीचा pH स्तर बदलू शकतो, त्यामुळे खडूचा वापर मर्यादित ठेवावा. खडूचा वापर करताना, मोगऱ्याच्या रोपाची काळजी घेण्याच्या इतर मूलभूत गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका.
मोगऱ्याच्या रोपाला भरपूर फुले येण्यासाठी किमान ५ ते ६ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. माती ओली राहील इतपतच पाणी द्या. कुंडीत पाण्याचा साठा होऊ देऊ नका. माती नेहमी भुसभुशीत आणि पाण्याचा चांगला निचरा होणारी असावी. यासाठी मातीमध्ये कोकोपीट किंवा थोडी वाळू मिसळा. कॅल्शियमव्यतिरिक्त, रोपाला नियमितपणे गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत यांसारखे सेंद्रिय खत द्या.