जर तुम्हाला घरच्या घरी किंवा बागेत आंबा लावायचा असेल, तर सर्वात आधी योग्य 'कलमी' रोपाची निवड करणे आवश्यक आहे. कुंडीत लावण्यासाठी 'आम्रपाली' किंवा 'थाई ऑल टाइम' सारख्या जाती उत्तम ठरतात. लागवड करताना मातीचा पोत सुधारणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (How To Plant Mango Tree At Home)
यासाठी ५०% साधी माती, ३०% चांगले कुजलेले शेणखत आणि २०% वाळू किंवा कोकोपीट यांचे मिश्रण वापरावे. कुंडीला पाण्याचा निचरा होण्यासाठी खाली छिद्रे असावीत, जेणेकरून मुळे सडणार नाहीत. आंब्याच्या रोपाला दिवसातून किमान ६ ते ७ तास कडक सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवावे, कारण सूर्यप्रकाश मिळाल्याशिवाय झाडाची वाढ खुंटते आणि त्याला फळे येत नाहीत.
खत व्यवस्थापनाच्या बाबतीत त्याला ठराविक अंतराने पोषणाची गरज असते. रोपाच्या जोमदार वाढीसाठी दर दोन-तीन महिन्यांनी दोन ते तीन किलो शेणखत किंवा गांडूळ खत मातीत मिसळावे. झाडाच्या मुळांना बुरशी लागू नये आणि मातीतील कीड मरावी यासाठी मूठभर कडुनिंब पेंड वापरणे फायदेशीर ठरते. जेव्हा झाड थोडे मोठे होते.
तेव्हा त्याच्या फांद्या मजबूत करण्यासाठी आणि मुळांच्या विकासासाठी फॉस्फरसयुक्त खतांचा वापर करावा. झाडाला मोहोर येण्याच्या काळात म्हणजे नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास थोडे पोटॅश दिल्यास फळांची गुणवत्ता सुधारते आणि ती गोड होतात. घरगुती स्तरावर तुम्ही तांदूळ किंवा डाळी धुतलेले पाणी, तसेच केळीच्या सालींपासून बनवलेले लिक्विड फर्टिलायझर देखील देऊ शकता, ज्यामुळे झाडाला नैसर्गिक पोटॅशियम मिळते.
पाणी देताना नेहमी एक नियम पाळावा
मातीचा वरचा थर पूर्णपणे सुकल्याशिवाय दुसरे पाणी देऊ नये. विशेषतः मोहोर आल्यावर पाण्याचे प्रमाण कमी करावे, अन्यथा फुले गळून पडण्याची शक्यता असते. झाडावर पांढरी बुरशी दिसल्यास १० मिली कडुलिंबाचे तेल (Neem Oil) शिंपडावे.
एक लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी. सुरुवातीची दोन वर्षे झाडाची हलकी छाटणी (Pruning) केल्यास झाड डेरेदार होते. अशा प्रकारे योग्य खत, पुरेसा सूर्यप्रकाश आणि नियमित देखरेख केल्यास, अवघ्या २-३ वर्षांत तुमच्या घरच्या आंब्याला रसाळ फळे लागू शकतात.
