Growth Of Money Plant: झाडांची आवड असणाऱ्या सगळ्याच लोकांना मनी प्लांट घरात असावं असं वाटत असतं. मनी प्लांटचा वापर आजकालच्या होम इंटेरिअरमध्येही खूप केला जातो. हे दिसायलाही खूप चांगलं दिसतं. हिरवी पानं, लांबच लांब वेल डोळ्यांनाही आराम देतं. पण मनी प्लांटची पानं अनेकदा पिवळी पडू लागतात. अशात याचं नेमकं कारण माहीत असलं पाहिजे म्हणजे त्यानुसार त्याची काळजी घेता येईल.
मनी प्लांटची पानं पिवळी का पडतात?
मुळात मनी प्लांटला वाढीसाठी पाण्याची गरज असतेच. पण जर तुम्ही याला जास्त पाणी टाकत असाल तर याची पानं पिवळी पडू लागतात. पाणी कमी मिळालं तरी सुद्धा याची पानं पिवळी पडतात. जर मातीमध्ये नायट्रोजनची कमतरता असेल तरीही पानं पिवळी पडतात. कीटकांमुळेही पानांची ही समस्या होते. तसेच रोपाला जर पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नसेल तरी पानं पिवळी पडतात.
काय कराल उपाय?
मनी प्लांटला आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच पाणी द्या. माती पूर्णपणे वाळू नये याची काळजी घ्या. तसेच तुम्ही मनी प्लांटला नायट्रोजन असलेलं खतही देऊ शकता. कुंडी नियमित स्वच्छता करा आणि माती मोकळी करत रहा. झाडाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळू द्या. पिवळी पडलेली पानं काढून फेका.
मनी प्लांट लांबच लांब वाढतो, त्यामुळे त्याला वाढण्यासाठी जागा द्या. जेणेकरून त्याची मूळं व्यवस्थित पसरू शकतील. मनी प्लांट घरात ठेवत असाल तर अशा ठिकाणी ठेवा जिथे तापमान जास्त असू नये आणि जास्त कमीही असू नये.
१० ते १५ दिवसांनी बदला पाणी
घरात जर तुम्ही मनी प्लांट एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये लावला असेल तर त्यातील पाण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. साधारण १० ते १५ दिवसांच्या अंतरानं यातील पाणी बदलायला हवं. पाण्यातील पोषक तत्व रोप अब्जॉर्ब करून घेतं. त्यामुळे ते पाणी फारसं कामाचं राहत नाही. पाणी बदललं तर झाडाला आणखी पोषण मिळेल.
जर मनी प्लांट कुंडीत लावलं असेल तर पाणी निघण्याची चांगली व्यवस्था केली पाहिजे. पाणी जास्त टाकलं आणि मुरलं तर रोपाची मूळं गळून पडण्याचा धोका असतो. यामुळे पानंही पिवळी होतात.
पाणी आणि तेलाचं कॉम्बिनेशन
मनी प्लांट हिरवागार आणि टवटवीत ठेवण्यासाठी तेल आणि पाण्याचं कॉम्बिनेशन वापरू शकता. यासाठी एक स्प्रे बॉटल पाणी घ्या. त्यात एक मोठा चमचा खोबऱ्याचं पाणी टाका. हे मिश्रण रोपावर स्प्रे करा. यानं पानांचा पिवळेपणा कमी होईल. तुम्ही हवं तर ऑलिव्ह ऑइल, मोहरीचं तेल, बदामाच्या तेलाचाही यासाठी वापर करू शकता. पाण्याचं हे मिश्रण रोपावर शिंपडल्यास पानं आठवडाभर चमकदार दिसतील.