लालचुटुक जास्वंदीचे फुल जवळपास सगळ्यांनाचं फार प्रिय असते. आपल्यापैकी बहुतेक घरांमध्ये किमान एक तरी जास्वंदीच्या फुलांचे रोप नक्कीच असते. थंडीच्या दिवसांत जास्वंदीच्या रोपांची वाढ जरी छान होत असली तरी, फुलं मात्र कमी येणं, कळ्या गळून पडणं किंवा फुलांचा आकार लहान होणं ही समस्या जवळजवळ प्रत्येक घरात दिसते. हिवाळ्यात तापमान घटल्यामुळे माती थंड होते, रोपाचा वाढण्याचा वेग कमी होतो त्यामुळे रोपाला फुल येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटते. त्यातच पुरेसा सूर्यप्रकाश न मिळणे, कीड-रोग, पानांवरील थंडीचा तडाखा यामुळे जास्वंदीचं रोप अधिकच कमकुवत होतं(How to Increase Hibiscus Flowers).
थंडीच्या दिवसांत जास्वंदीच्या रोपाला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. अशावेळी, रोपाची योग्य काळजी कशी घ्यावी? जास्वंदीला पुन्हा बहर आणण्यासाठी रासायनिक खतांऐवजी कोणते नैसर्गिक आणि घरगुती उपाय करावे लागतील? असा प्रश्न पडतो. पण काळजीचं कारण नाही, काही साधे घरगुती उपाय, योग्य प्रमाणांत पाणी, खत वापरले तर हिवाळ्यातही जास्वंदीला आकर्षक, मोठी आणि भरपूर फुलं येऊ शकतात.थंडीच्या दिवसांत जास्वंदीच्या रोपाची (Hibiscus Plant Fertilizer at Home) काळजी घेण्याचे खास घरगुती उपाय पाहूया, ज्यामुळे तुमच्या जास्वंदीला पुन्हा भरपूर, मोठ्या आकाराची आणि सुंदर फुलं येतील!
हिवाळ्यात जास्वंदीच्या रोपाची 'अशी' घ्या काळजी...
१. जास्वंदीसाठी योग्य प्रमाणात सूर्यप्रकाश आणि अचूक कुंडीची निवड :- सर्वात आधी तर, जास्वंदीचे रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे त्याला रोज ६ ते ७ तास थेट सूर्यप्रकाश मिळेल. कमी सूर्यप्रकाशात रोपाला पाने येऊ शकतात, पण फुलांची संख्या आणि आकार यावर नकारात्मक परिणाम होतो. आणि जर, जास्वंदीचे रोप छोट्या कुंडीत लावले असेल, तर त्याला मोठ्या कुंडीत स्थलांतरित करणे गरजचेआहे. रोपाच्या मुळांना पसरायला पुरेशी जागा मिळाली तर मोठ्या आकाराची फुलं देखील येतात.
२. रोपाची साफ-सफाई आणि छाटणी :- रोप तणमुक्त आणि स्वच्छ असेल तरच ते निरोगी राहू शकते. रोपावरची सुकलेली फुलं आणि पिवळी पडलेली पानं वेळोवेळी काढत राहा. सुकलेली फुलं काढल्याने रोपाची ऊर्जा बिया बनवण्यात वाया जात नाही आणि त्या ऊर्जेचा उपयोग रोप नवीन कळ्या बनवण्यात करते. कुंडीतील माती स्वच्छ ठेवा आणि त्यातील सर्व तण काढून टाका.
३. कीटकांना दूर ठेवणेही आवश्यक :- जास्वंदीच्या रोपावर अनेकदा मिलीबग आणि इतर कीटकांचा हल्ला होतो, ज्यामुळे फुलं आणि कळ्यांचे नुकसान होते. कीटकांच्या या हल्ल्यापासून रोपाला वाचवण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणजे कडुलिंबाच्या तेलाचा वापर करणे. तुम्ही कडुलिंबाचे तेल, पाणी आणि लिक्विड सोपचे काही थेंब मिसळून द्रावण तयार करा आणि त्याचा फवारा रोपांवर करा.
४. लिक्विड फर्टिलायझर तयार करा :- जास्वंदीच्या रोपाला मोठी आणि सुंदर फुल येण्यासाठी पण घरगुती लिक्विड फर्टिलायझर देखील तयार करू शकतो. यासाठी एका हवाबंद डब्यात पाणी घ्या. त्यात २ ते ३ चमचे मेथीचे दाणे आणि अंदाजे एक इंच आकाराचा गुळाचा तुकडा टाका आणि डबा बंद करा. हे मिश्रण एक आठवडा तसेच राहू द्या. गुळामध्ये असलेले सूक्ष्मजीव मेथीतील पोषक तत्वांना विघटित करण्यास आणि हे द्रावण आंबवण्यास मदत करतात. ठरलेल्या वेळेनंतर तयार झालेल्या या द्रावणापैकी १०० मिली (ml) द्रव घेऊन, ते एक लीटर साध्या पाण्यात मिसळा. या मिश्रणात अर्धा चमचा चहापत्ती किंवा कॉफी पावडर मिसळा. आता ८ इंच कुंडीत अंदाजे २५० मिली हे लिक्विड फर्टिलायझर खत घाला. हे खत रोपाला महिन्यातून एक किंवा दोनदा देऊ शकता.
५. पाणी आणि खत देण्याची योग्य वेळ :- रोपाला केव्हा पाणी द्यायचे आणि केव्हा खत, याचा योग्य समतोल असणे खूप गरजेचे असते. कुंडीतील मातीमध्ये पाण्याचा निचरा चांगला असायला हवा, यामुळे द्रव खत टाकल्याबरोबर माती ते लगेच शोषून घेईल, जे मुळांसाठी फायदेशीर ठरु शकते. खराब निचऱ्यामुळे मुळे सडू शकतात. रोपाला द्रव खत तेव्हाच द्या, जेव्हा रोपाची माती कोरडी असेल. यासाठी मातीच्या वरच्या थराला स्पर्श करून पाहा. ओल्या मातीमध्ये पाणी किंवा खत टाकल्यास जास्त पाणी दिल्यामुळे रोप खराब होऊ शकते.
Web Summary : Get large, vibrant hibiscus flowers even in winter! Ensure sunlight, prune, control pests with neem oil, and use homemade liquid fertilizer (fenugreek, jaggery). Proper watering is essential.
Web Summary : सर्दियों में भी बड़े, जीवंत गुड़हल के फूल पाएं! धूप सुनिश्चित करें, छंटाई करें, नीम के तेल से कीटों को नियंत्रित करें, और घर का बना तरल उर्वरक (मेथी, गुड़) का उपयोग करें। उचित पानी देना जरूरी है।