आपल्या रोजच्या स्वयंपाकात लिंबू लागतेच. कारण लिंबू घातलं की कोणत्याही पदार्थाची चव आणखी खुलून येते. अनेक जणांना तर रोजच्या आमटी आणि भाजीवर थोडंसं लिंबू पिळून खाण्याची सवय असतेच. लिंबामधून व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं. त्यामुळे दिवसाची सुरुवात अनेक जण कोमट पाण्यामध्ये लिंबू पिळून करतात. शिवाय लिंबाचं सरबत हा उन्हाळ्यातला एक अत्यंत आवडीचा पदार्थ. त्यामुळे एकंदरीतच काय की आपल्या घरात नेहमीच लिंबू असतं. आता हे लिंबू दरवेळी विकत आणण्यापेक्षा तुम्हाला गार्डनिंगची आवड असेल तर कुंडीतच छोटंसं लिंबाचं रोप लावून पाहा. पुढे सांगितल्याप्रमाणे थोडीशी काळजी घेतली तरी काही दिवसांतच त्याला खूप लिंबू लागतील (how to grow lemon plant in balcony?). बघा त्यासाठी नेमकं काय करायचं...(gardening tips for lemon plant)
कुंडीमध्ये लिंबाचं रोप कसं लावायचं?
लिंबाचं रोप लावण्यासाठी खूप मोठ्या कुंडीची गरज नसते. त्यामुळे अशी कुंडी निवडा जी साधारण १२ ते १६ इंच एवढी असेल. याशिवाय कुंडीच्या तळाशी व्यवस्थित छिद्रं पाडा. जेणेकरून माती जास्त ओलसर राहणार नाही आणि पाण्याचा व्यवस्थित निचरा होईल.
लग्न जवळ आलंय? मग 'हे' पदार्थ खायला लगेच सुरुवात करा, फेशियल न करताही चेहरा चमकेल
२. जर तुम्ही माती उत्तम पद्धतीने तयार केली तर रोपाला चांगलं पोषण मिळतं आणि त्याची व्यवस्थित वाढ होते. यासाठी माती तयार करताना त्यामध्ये कोकोपीट, कंपोस्ट खत आाणि थोडी वाळूही टाका. कारण चिकट आणि पाणी घट्ट धरून ठेवणारी जर माती असेल तर त्यामध्ये लिंबाचं रोप चांगलं वाढत नाही. त्याची मुळं कुजतात.
३. लिंबाच्या रोपाला भरपूर ऊन लागतं. त्यामुळे ही कुंडी नेहमी अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला ५ ते ६ तास चांगलं ऊन मिळेल. जितकं स्वच्छ ऊन मिळतं, तितकं लिंबाचं रोप जोमाने वाढतं.
४. लिंबाच्या रोपाला पाणी घालताना पाण्याचा अतिरेक होणार नाही, याची काळजी घ्या. कारण खूप पाणी घातलं तर लिंबाच्या रोपाची मुळं सडतात. त्यामुळे माती ओलसर राहील एवढंच पाणी त्याला द्या. तसेच महिन्यातून एकदा या रोपाला खत घाला आणि वेळोवेळी त्याची छटाई करा. बघा रोप मस्त वाढून कसे भरभरून लिंबू येतील..
