पेरू (Guava) खायला जितके चवदार लागतात तितकेच तब्येतीसाठी सुद्धा पेरू फायदेशीर ठरतात. यात व्हिटामीन सी मोठ्या प्रमाणात असते. ज्यामुळे इम्यूनिटी स्ट्राँग राहते आणि त्वचाही चांगली राहते. बाजारातून पेरू विकत घेण्यापेक्षा तुम्ही घरच्याघरी कुंडीत चांगले आणि केमिकल फ्री पेरू उगवू शकता. घरच्याघरी बाल्कनी किंवा टेरेसवर तुम्हाला पेरूचे रोप लावता येतील. (How To Grow Guava Fruit In Pot)
पेरूचं रोप घरी लावणं कठीण नाही फक्त या रोपाची योग्य पद्धतीनं काळजी घ्यायला हवी. माती, ऊन, पाणी योग्य पद्धतीनं योग्य प्रमाणात द्यायला हवं. व्यवस्थित काळजी घेतल्यास पेरूचं रोपं वर्षभर फळांनी बहरलेलं राहील आणि तुम्हाला ताजे ताजे गोड पेरू खायला मिळतील. पेरूचं रोप लावण्याची योग्य पद्धत पाहूया. (How To Grow Guava Plant In Pot At Home)
घरीच छोट्या कुंडीत लावा १०० रूपयाला १ मिळणारं ड्रॅगन फ्रुट, लाखोंचा होईल फायदा- वर्षानुवर्ष खाल फळं
योग्य पेरू निवडा
पेरूचे रोप लावण्यासाठी तुम्ही कोणत्याही चांगल्या नर्सरीमधून कलम केलेला पेरू घेऊ शकता. पेरूचे रोप साधारण ५० ते १०० रूपयांना मिळते पण तुम्ही पैसे वाचवण्यासाठी एखादा चांगला पेरू विकत घेऊ शकता. पण कलम केलेले रोप लवकर फळं देतं.ॉ किंवा तुम्ही एखाद्या चांगल्या पेरूच्या फळातील बिया वापरूनही रोप तयार करू शकता.
पेरू लावण्यासाठी सुरुवातीला १२ ते १४ इंचाची कुंडी घ्या. जसजसे झाड मोठे होईल, तसतशी कुंडी बदला. कुंडीला खालच्या बाजूने पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रे आहेत का, हे नक्की तपासा. पेरूच्या रोपाला पाण्याचा चांगला निचरा होणारी माती लागते. यासाठी तुम्ही ४०% माती, ३०% कंपोस्ट खत आणि ३०% वाळू यांचे मिश्रण वापरू शकता. हे मिश्रण हलके आणि पोषक असते.
रोप लावण्याची योग्य पद्धत कोणती?
सर्वात आधी कुंडीच्या तळाशी एक लहान मातीचा तुकडा किंवा विटांचे तुकडे ठेवा, जेणेकरून माती छिद्रातून बाहेर येणार नाही. आता, तयार केलेल्या मातीचे मिश्रण कुंडीत भरा. नर्सरीतून आणलेले रोपटे पॉलिथिनमधून हळूच बाहेर काढा आणि कुंडीच्या मध्यभागी ठेवा. आजूबाजूला माती भरून रोपटे व्यवस्थित स्थिर करा. रोप लावल्यानंतर लगेचच पाणी द्या.
रोपाची काळजी कशी घ्यावी?
उन्हाळ्यात दिवसातून एकदा आणि हिवाळ्यात एक-दोन दिवसाआड पाणी द्या. माती कोरडी दिसल्यास पाणी द्या. जास्त पाणी दिल्यास मुळे सडू शकतात. पेरूच्या रोपाला पूर्ण सूर्यप्रकाश आवडतो. त्याला दिवसातून किमान ५ ते ६ तास सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा. दर दोन ते तीन महिन्यांनी थोडं कंपोस्ट खत किंवा शेणखत द्या. यामुळे रोपाची वाढ चांगली होते आणि फळं जास्त लागतात. पानांवर पांढरे डाग किंवा किडे दिसले, तर कडुलिंबाच्या तेलाची फवारणी करा.