कोथिंबीर (Coriander) हा रोजच्या स्वंयपाकात वापरला जाणारा पदार्थ आहे. स्वयंपाकात पदार्थाची चव वाढवणारी कोथिंबीर जर तुम्हाला घरच्या घरी आणि अगदी कमी वेळेत, म्हणजे ५ दिवसांत उगवायची असेल, तर काही खास आणि सोप्या टिप्स वापरल्या पाहिजेत. कोथिंबीरीची लागवड तशी सोपी आहे, पण जलद गतीनं उगवणं आणि वाढीसाठी काही गोष्टींची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. (Grow Fresh Coriander at Home in Just 5 Days)
बियाण्यांची निवड आणि प्रक्रिया
कोथिंबीरीची लागवड करताना ताजे धणे वापरा, जुने धणे वापरू नका. नवीन आणि उत्तम दर्जाचे धणे वापरा, कारण जुन्या बियाण्यांची रुजवण क्षमता कमी होते. धणे किंचित रगडून घ्या. कोथिंबीरीच्या प्रत्येक दाण्यात दोन बिया असतात. उगवण जलद होण्यासाठी, धणे पेरण्यापूर्वी लाटण्याच्या मदतीने हलके रगडून घ्या. त्यांचा फार भुगा करायचा नाही, फक्त दोन भाग वेगळे होतील इतका हलका दाब द्या. पाण्यात भिजवा. रगडून घेतलेले धणे एका भांड्यात घेऊन त्यात पाणी घाला. हे धणे किमान २ ते १२ तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे उगवण्याची प्रक्रिया खूप जलद होते.
मातीची तयारी
योग्य कुंडीची निवड करा. कोथिंबीरसाठी नेहमीच्या गोल कुंडीपेक्षा रुंद (Broad) आणि जास्त खोल नसलेली कुंडी किंवा कंटेनर निवडा, ज्यामुळे कोथिंबिरीला पसरायला जागा मिळेल. भांड्याच्या तळाशी पुरेसे छिद्रे आहेत याची खात्री करा. कोथिंबिरीला पाणी साचलेली माती आवडत नाही. माती भुसभुशीत आणि सुपीक असणे आवश्यक आहे. समान प्रमाणात माती रेती आणि शेणखत/कंपोस्ट किंवा कोकोपीट मिसळून मिश्रण तयार करा. यामुळे मातीचा निचरा चांगला होतो आणि पोषण मिळते. हे मिश्रण कुंडीत भरा आणि पेरणी करण्यापूर्वी त्यात पाणी घालून माती मऊ होऊ द्या.
कोथिंबीरची लागवड
पाण्यात भिजवून घेतलेले आणि तयारी केलेले धणे आता पेरा. तयार मातीत धणे एका ओळीत किंवा एकत्रित पुंजक्याच्या स्वरूपात पेरा. पेरणी केल्यानंतर, धण्यांवर मातीचा एक अगदी पातळ थर (सुमारे अर्धा इंच) टाका. बिया खोलवर पेरू नका. पेरणी झाल्यावर झारीच्या मदतीने हळूवारपणे पाणी द्या, जेणेकरून बिया जागच्या जागी राहतील.
दिवसांत जलद उगवण आणि वाढीसाठी टिप्स
रोज पाणी शिंपडा बिया रुजेपर्यंत, माती ओली राहील याची खात्री करा. रोज हलके पाणी मातीवर शिंपडून फवारा (Mist) मारा. जास्त पाणी देऊ नका, अन्यथा बिया कुजू शकतात. मातीचा वरचा थर सुकल्यासारखा वाटला तरच पाणी द्या.
२-३ तास ऊन देणं गरजेचं आहे. कोथिंबीरीच्या रोपाला दिवसातून किमान २ ते ३ तास थेट सूर्यप्रकाश मिळणे आवश्यक आहे. ती जागा निवडा. कोथिंबीरीला थंड हवामान आवडते, त्यामुळे शक्य असल्यास सकाळचे कोवळे ऊन मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
पेरणीच्या वेळी शेणखत किंवा कंपोस्ट घातल्यामुळे बिया रुजण्यासाठी पोषण मिळते. उगवण झाल्यावर, रोपे थोडी मोठी झाली की दर १०-१५ दिवसांनी थोडे गांडूळखत किंवा सेंद्रिय खत घालू शकता. मातीची आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आणि तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी मातीवर गवताचा किंवा पालापाचोळ्याचा पातळ थर घालू शकता.
५ दिवसांचा परिणाम
जर तुम्ही ताजे धणे, रगडून आणि भिजवून वापरले, सुपीक माती घेतली आणि योग्य पाणी व ऊन दिले, तर ३ ते ५ दिवसांत तुम्हाला कोथिंबिरीचे छोटे अंकुर मातीतून बाहेर आलेले दिसतील. तुम्हाला छोटी रोपे दिसू लागतील. १५ ते २० दिवसांनंतर कोथिंबीर कापणीसाठी तयार होईल. जर तुम्हाला बाजारातून आणलेल्या कोथिंबिरीतून पुन्हा वाढवायची असेल, तर मुळं असलेल्या ताज्या कोथिंबिरीच्या जुड्या घ्या. मुळांपासून २ ते ३ इंच वर देठ कापून घ्या. ही मुळे मातीमध्ये ३-४ इंच अंतरावर पेरा. या पद्धतीने ४ ते ५ दिवसांत ताजी पानं येण्यास सुरुवात होते, कारण यात रुजण्याची प्रक्रिया करावी लागत नाही. हे सर्वात जलद उत्पादन देणारे तंत्र आहे.