Join us

झाड वाढलं उंच पण लिंबू लागत नाहीत? करा 'हे' उपाय, झाड लगडेल लिंबांनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2025 11:20 IST

Gardening Tips : जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या घरी असलेल्या लिंबाच्या झाडाला लटपट लिंबू लागावे तर यासाठी झाड लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य खत कोणतं असतं हे जाणून घ्या.

Gardening Tips : लिंबाचं झाड एक असं झाड आहे ज्याची योग्य काळजी घेतली गेली आणि त्याला योग्य पोषण दिलं तर काही महिन्यातच फळ द्यायला सुरू करतं. पण जास्तीत जास्त लोक या झाडासाठी साध्या मातीचा वापर करतात. ज्यामुळे झाड मोठं होऊनही फळ काही येत नाही. याचं मुख्य कारण माती आणि खताची योग्य निवड न करणं. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्या घरी असलेल्या लिंबाच्या झाडाला भरपूर लिंबू लागावे तर यासाठी झाड लावण्याची योग्य पद्धत आणि योग्य खत कोणतं असतं हे जाणून घ्या.

लिंबाचं झाड लावण्याआधी माती कशी तयार कराल

लिंबाचं झाड लावण्याआधी मातीमध्ये भरपूर पोषक तत्वांपासून तयार करणं गरजेचं असतं. यासाठी साध्या मातीमध्ये काही गोष्टी मिक्स कराव्या लागतील.

वर्मीकम्पोस्ट या शेण खत – शेण खतामुळे माती मुलायम आणि पोषक बनते.

कडूलिंबाच्या बिया - मातीमध्ये कडूलिंबाच्या बिया टाकल्या तर यानं झाडाला कीटक लागत नाही आणि झाड सुरक्षित राहतं.

वापरलेलं चहा पावडर - वापरलेल्या चहा पावडरमध्ये अनेक मायक्रोन्यूट्रिएंट्स असतात. जे झाडांना पोषण देतात आणि झाडांची वाढ चांगली होते.

या सगळ्या गोष्टी मातीमध्ये चांगल्या मिक्स करून एका कुंडीत भरून ठेवा. त्यानंतर लिंबाचं रोप पॉलिथीनमधून काढा आणि मुळांवर लागलेली अतिरिक्त माती काढून कुंडीत झाड लावा. यानं नवीन मातीमुळे मुळांना अधिक पोषण मिळतं. त्यानंतर रोपाला हलकं पाणी टाका.

तांदळाचं पाणी

तांदूळ धुतल्यानंतर सामान्यपणे हे पाणी फेकलं जातं. या पाण्यात भरपूर पोषक तत्व असतात, जे झाडाच्या वाढीसाठी खूप फायदेशीर ठरतात. त्यामुळे हे पाणी कधीच न फेकता लिंबाच्या झाडाला टाका. 

मास्यांचं पाणी

लिंबाच्या झाडासाठी सामान्य खतासोबतच एका खास नॅचरल खताची गरज असते आणि ते खास नॅचरल खत म्हणजे मास्याचं पाणी. फिश टॅंक किंवा स्वच्छ पाण्यात ठेवलेल्या मास्यांच्या पाण्यात भरपूर पोषण असतं. यात नायट्रोजन, फॉस्फोरस आणि पोटॅशिअम सारखे पोषक तत्व असतात. जे झाडाला मजबूत बनवतात.

आणखी काही उपाय

लिंबाचं रोप रोज सकाळी हलक्या उन्हात ठेवा आणि दुपारच्या प्रखर उन्हापासून त्याचा बचाव करा. 

दर 10 ते 12 दिवसांनंतर कुंडीत माती मोकळी करा. जेणेकरून मुळांना पुरेसं ऑक्सीजन मिळेल.

झाडाला जास्त प्रमाणात पाणी टाकणं टाळलं पाहिजे. जेव्हा माती जास्त कोरडी झाली तेव्हाच पाणी टाकावं.

जर तुम्ही वर सांगण्यात आलेले उपाय करून लिंबाचं झाड लावत असाल आणि त्याची काळजी घेत असाल तर खूप कमी वेळातच झाडाला लटपट लिंबू लागतील. तसेच झाडाची वाढ चांगली होईल. 

टॅग्स :बागकाम टिप्ससोशल व्हायरल