हल्ली जागेचा प्रश्नही आहेच. त्यामुळेच तर फ्लॅटमध्ये राहणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे. आता फ्लॅटमध्ये राहून गार्डनिंगची हौस भागवायची असेल तर कुंड्यांमध्ये वेगवेगळी रोपं लावली जातात. त्यांना वेळोवेळी खत आणि पाणीही आपण घालतो. पण तरीही कधी कधी असं दिसून येतं की रोपांची चांगली वाढच होत नाहीये. रोप सुकत चालली आहेत किंवा त्यांना कळ्या, फुलंही येत नाहीयेत. खत, पाणी देऊन तसेच पुरेसं ऊन देऊनही रोपांची अशीच अवस्था असेल तर एकदा कुंडीतली माती तपासून पाहा. कारण मातीचा कसदारपणा टिकून राहिला तरच रोपांची चांगली वाढ होते. त्यासाठी नेमकं काय करायचं ते पाहुया..(how to improve soil quality to keep plants healthy and green?)
कुंडीतल्या मातीचा कसदारपणा कसा टिकवून ठेवायचा?
१. कुंडीतल्या मातीची व्यवस्थित काळजी घेतली नाही तर तिचा सगळ्यात वरचा थर अगदी दगडासारखा कडक होऊन जातो. माती अशी असेल तर मुळापर्यंत ऑक्सिजन पोहाेचत नाही. त्यामुळे मग मुळं सडतात आणि रोपांची वाढ खुंटते. यासाठी महिन्यातून एकदा छोटी खुरपणी किंवा टोकदार काडी घेऊन कुंडीतल्या मातीचा वरचा थर उकरून भुसभुशीत करायला हवा.
२. चहा गाळून घेतल्यानंतर जी चहा पावडर गाळणीत जमा होते ती स्वच्छ धुवून उन्हात वाळवा. त्यानंतर ती कुंडीमधल्या मातीमध्ये मिसळत चला. चहा पावडर मातीमध्ये मिसळण्यापुर्वी माती थोडी उकरून घ्यावी आणि मग चहा पावडर मिसळावी. यामुळे माती भुसभशुीत राहाते. शिवाय चहा पावडरमधील काही घटक मातीचा कस वाढवतात.
३. कुंडीतली माती दरवर्षी बदलायला हवी. यासाठी पावसाळ्याचा ऋतू उत्तम आहे. रोपांसकट कुंडीतली माती बाहेर काढा. त्यामध्ये थोडं गांडूळ खत, कोकोपीट, थोडी वाळू मिसळा आणि मग कुंडी भरा. यामुळे माती भुसभुशीत राहण्यास मदत होते. आणि अशा मातीतच रोपांची चांगली वाढ होते.
४. महिन्यातून एकदा रोपांना गुळाचं पाणी द्या. यासाठी साधारण १ लीटर पाण्यात ५० ग्रॅम गूळ भिजत घाला. हे पाणी कुंडीतल्या मातीत मिसळा. गुळामध्ये असणाऱ्या काही घटकांमुळेही कुंडीतल्या मातीचा कस टिकून राहातो.
