अनेकांना बागकाम (Gardening) करण्याची आवड असते, पण झाडांची वाढ (Plant Growth) वेगाने होत नाही किंवा फुलांचे प्रमाण कमी असते. अशावेळी महागडी रासायनिक खते वापरण्याऐवजी, नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. रोजच्या वापरातले बटाट्याचे साल आणि चहा पावडीचा वापर करून तुम्ही झाडांसाठी पोषक तत्त्वांचा खजिना (Powerful Tonic) तयार करू शकता.
या नैसर्गिक टॉनिकमुळे झाडांना पोटॅशियम (Potassium), फॉस्फरस (Phosphorus) आणि इतर ट्रेस मिनरल्स मिळतात, ज्यामुळे पाने हिरवीगार होतात आणि फुलांचे उत्पादन वाढते.
बटाट्याच्या सालाचे आणि चहापावडरीचे फायदे
बटाट्याचे साल: यामध्ये पोटॅशियम, फॉस्फरस, नायट्रोजन आणि कॅल्शियम यांसारखी आवश्यक पोषक तत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात, जी झाडांच्या चांगल्या वाढीसाठी आणि मुळे घट्ट करण्यासाठी मदत करतात.
चहा पावडर (वापरलेली): यात नायट्रोजन आणि टॅनिक ॲसिड असते, ज्यामुळे मातीचा pH स्तर सुधारतो आणि झाडांची वाढ चांगली होते.
दोन प्रकारचे खत बनवण्याची सोपी पद्धत :
झाडांना त्वरित पोषण देण्यासाठी द्रव खत (Liquid Fertilizer) आणि हळू व सातत्याने पोषण देण्यासाठी सुके खत (Dry Fertilizer) असे दोन प्रकारचे खत बनवता येतात.
झाडांना त्वरित पोषण देण्यासाठी द्रव खत उत्तम मानले जाते, त्याचे साहित्य पाहू -
मिक्सरमध्ये फिरवून बारीक वाटून घेतलेले बटाट्याचे साल - १०० ग्रॅम
वर्मीकंपोस्ट (गांडूळ खत) - १०० ग्रॅम
वापरलेली चहा पावडर - १० ग्रॅम
पाणी प्रत्येकी अर्धा लीटर
निर्मिती प्रक्रिया:
भिजवणे: बटाट्याचे साल, वर्मीकंपोस्ट आणि चहापावडर प्रत्येकी अर्धा लीटर पाण्यात वेगवेगळ्या भांड्यांमध्ये दोन दिवसांसाठी भिजत ठेवा.
गाळणे: दोन दिवसांनंतर तिन्ही द्रावण एका कंटेनरमध्ये गाळून घ्या. गाळलेला भाग कंपोस्ट खतामध्ये वापरू शकता.
पातळ करणे (Dilution): हे गाळलेले द्रव खत तीव्र असते, त्यामुळे ते थेट झाडांना देऊ नये. १ लीटर गाळलेल्या खतामध्ये ४ ते ५ लीटर साधे पाणी मिसळून ते पातळ करा.
वापरण्याची पद्धत:
>> हे पातळ केलेले द्रव खत तुम्ही फुलझाडे, भाजीपाला किंवा घरातील इनडोर प्लांट्स (Indoor Plants) अशा कोणत्याही झाडांना वापरू शकता.
>> हे खत झाडांच्या पेशी मजबूत करते आणि त्यांची वाढ वेगाने होण्यास मदत करते.
२. सुके खत बनवण्याची पद्धत
जेव्हा झाडांना दीर्घकाळ पोषण द्यायचे असते, तेव्हा सुके खत फायदेशीर ठरते आणि ते मातीची पोत (Texture) देखील सुधारते.
निर्मिती प्रक्रिया:
बटाट्याचे साल सुकवा: सर्वप्रथम बटाट्याचे साल ३ दिवस कडकडीत सूर्यप्रकाशामध्ये किंवा हवेत पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत सुकवा. त्यामध्ये ओलावा राहू देऊ नका.
मिश्रण: सुकलेले बटाट्याचे साल, वर्मीकंपोस्ट आणि वापरलेली चहापत्ती समान प्रमाणात घेऊन व्यवस्थित मिसळा.
वापरण्याची पद्धत:
>> माती भुसभुशीत करा : खत टाकण्यापूर्वी, झाडाच्या आजूबाजूची माती भुसभुशीत करून घ्या (Loosening of soil) यामुळे माती मोकळी होते आणि मुळांना हवा मिळते.
>> खत घालणे: तयार केलेले सुके खत झाडाच्या मुळांपासून थोडे दूर (कुंडीच्या काठावर) मातीवर एक पातळ थर म्हणून घाला.
>> पाणी देणे: खत घातल्यानंतर लगेच झाडांना हलके पाणी (Watering) द्या. यामुळे खतातील पोषक तत्त्वे हळूहळू पाण्यात विरघळतात आणि मुळे ती शोषून घेतात.
या सोप्या नैसर्गिक उपायांनी तुम्ही तुमच्या घरातील झाडांची वाढ आरोग्यदायी आणि चमकदार बनवू शकता.
