तुळशीच्या रोपाचे धार्मिक महत्व आहे. त्यासोबतच औषधी गुणांसाठीसुद्धा तुळस ओळखली जाते. हिवाळ्याच्या दिवसांत तुळशीच्या रोपाची काळजी घेणं कठीण होतं कारण व्यवस्थित पाणी घालूनही तुळस सुकू लागते. तुळशीच्या रोपाची खास काळजी घेणं आवश्यक असते. जर तुळशीला सुकण्यापासून वाचवायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. तुळशीचं रोप नेहमी बहरलेलं ठेवण्यासाठी ३ गोष्टी करायला हव्यात ज्यामुळे तुळस नेहमी निरोगी राहते. तुळशीचं रोप सुकू नये यासाठी काय करावं पाहूया.
रोपाची जागा बदला
हिवाळ्याच्या दिवसांत तुळशीचं रोप सुकू नये यासाठी तुळस जिथे ऊन येतं अशा ठिकाणी ठेवा. कारण पावसाळा संपून हिवाळा सुरू झाल्यानंतर वातावरणात बरेच बदल होतात ज्यामुळे रोप सुकू लागते. तुळशीच्या रोपाला अधून मधून उन्हात ठेवल्यास उष्णता मिळते. ज्यामुळे पानं निरोगी, हिरवीगार राहतात.
माती
तुळशीला बहरलेलं ठेवण्याासठी तुळशीच्या मुळांना व्यवस्थित श्वास घेऊ देणं महत्वाचं आहे. म्हणून माती सुकल्यावर खोदून घ्या. मातीचा वरचा भाग हळूहळू सैल करा. मुळांचं नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. यामुळे हवा आणि ऊन मिळते.
हिवाळ्यात अशी घ्या काळजी
रात्रीच्या वेळी आणि कडाक्याच्या थंडीत तुळशीला उघड्यावर ठेवू नका. शक्य असल्यास, संध्याकाळ झाल्यावर तुळस घरात किंवा छताखाली सुरक्षित ठिकाणी ठेवा. बाहेर ठेवणार असाल, तर रात्रीच्या वेळेस जाड कापडाने किंवा प्लॅस्टिकने झाकून ठेवा. थेट पानांवर कपडा टाकू नका. आधार देऊन त्यावर कपडा अंथरा, जेणेकरून गारठा लागणार नाही.
हिवाळ्यात तुळशीला जास्त पाण्याची गरज नसते. जास्त पाणी दिल्याने मुळे कुजतात. कुंडीतील वरची २ इंच माती पूर्णपणे कोरडी झाल्यावरच पाणी द्या. शक्य असल्यास थंड पाणी न वापरता थोडे कोमट पाणी घाला. हिवाळ्यात खत घालणे टाळावे किंवा खूप कमी प्रमाणात घालावे. महिनाभरातून एकदा कोरडे शेणखत किंवा गांडूळ खत मातीत हलक्या हाताने मिसळा. कोरफडीचे तुकडे मातीत घालणे किंवा हळद मिसळलेले पाणी देणे देखील फायदेशीर ठरते.
