भारताची खासियत काय असं विचारल्यावर अनेक उत्तर दिली जातात त्यात सगळ्यात वरती असते ते म्हणजे भारतीय पदार्थ. विविध राज्यांत अनेक प्रकारचे पदार्थ खाल्ले जातात. सगळेच वैविध्यपूर्ण असतात. मसालेदारही तितकेच आणि गोड पदार्थही तितकेच मस्त. जगभरात भारतीय पदार्थांची वाहवाह होत असते. (World's 100 Best Desserts: The two dishes you ate during your summer vacation as a child are considered the most delicious in the world.)भारताच्या पारंपरिक मिठायांनी पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपली गोड छाप सोडली आहे. कुल्फी आणि फिरनी या भारतात अत्यंत लोकप्रिय असलेल्या दोन मिठायांनी World’s 100 Best Desserts या प्रतिष्ठित यादीत स्थान मिळवले आहे. या यादीत कुल्फीला ४९वा क्रमांक, तर फिरनीला ६०वा क्रमांक मिळाला असून ही बाब भारताच्या समृद्ध पाकसंस्कृतीसाठी अभिमानास्पद आहे.
कुल्फी ही उत्तर भारतात विशेष लोकप्रिय असलेली पारंपरिक गोठवलेली मिठाई आहे. दूध आटवून, साखर, वेलदोडा, केशर, बदाम-पिस्ते यांसारख्या घटकांपासून तयार होणारी कुल्फी तिच्या दाटसर पोतासाठी आणि समृद्ध चवीसाठी ओळखली जाते. आइस्क्रीमपेक्षा वेगळी, अधिक नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने तयार होणारी कुल्फी आजही उत्सव, यात्रा, लग्नसमारंभ आणि रस्त्यावरील गाड्यांवर तितक्याच प्रेमाने खाल्ली जाते. कुल्फीवाल्याचा आवाज ऐकल्यावर मुले हातात दहाची नोट घेऊन त्याच्या मागे धावत जातात. सगळ्यांनीच लहानपणी हे केले असले. तिच कुल्फी आता जगभरात प्रसिद्ध आहे.
दुसरीकडे फिरनी ही तांदूळ, दूध आणि साखरेपासून तयार होणारी सौम्य, सुगंधी मिठाई असून तिचा उगम प्रामुख्याने उत्तर भारत आणि काश्मीर भागाशी जोडला जातो. केशर, वेलदोडा, गुलाबपाणी किंवा बदामांची सजावट यामुळे फिरनीला खास सुगंध आणि चव प्राप्त होते. सण-उत्सव, ईद, लग्नकार्य किंवा खास प्रसंगी फिरनीला आजही मानाचे स्थान आहे.
या दोन्ही मिठायांना मिळालेले जागतिक मानांकन केवळ त्यांच्या चवीमुळे नाही, तर त्यामागील परंपरा, सांस्कृतिक वारसा आणि पिढ्यान्पिढ्या चालत आलेली पाककला यामुळेही आहे. कुल्फी आणि फिरनी यांनी जागतिक रसिकांची मने जिंकत भारताची खाद्यसंस्कृती किती वैविध्यपूर्ण, समृद्ध आणि कालातीत आहे हे पुन्हा एकदा सिद्ध केले. भारतीय पदार्थ म्हणजे तिखट आणि मसालेदार एवढेच असतात असे अनेकांना वाटते. मात्र भारतात तेवढ्याच जबरदस्त चवीचे गोड पदार्थही आहेत, भारतीय पाककला ही सगळ्याच चवींमध्ये समृद्ध आहे.
