Join us
Daily Top 2Weekly Top 5

ये मुंह और मसूर की दाल! मसूर डाळीचा महिमा मोठा, पचायला हलकी- प्रोटीन भरपूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2024 12:15 IST

world pulses day 2024 special 3 : कोण म्हणतं शाकाहारात प्रोटीन कमी, डाळी आहेत प्रोटीनचा खजिना- पाहू मसूर डाळीचे पोषण महत्त्व

स्वस्थ, निरोगी, निरामय आयुष्य जगायचं असेल तर रोजच्या खाण्यापिण्यामधून प्रोटीन्स, आयर्न, कॅल्शियम आणि चांगल्या प्रकारची फॅटस असे ४ अन्नघटक मिळायाला हवेत. त्यासाठी रोजच्या आहारातील  दोन्ही जेवणामध्ये मसूर डाळ वापरली तर पोषणाचा महत्वाचा भाग मिळायला मदत होईल ! सुंदर केशरी रंगाची मसूर डाळ हा बहुतेक सर्व अत्यावश्यक अन्नघटकांचा स्वस्त आणि मस्त स्त्रोत आहे ! अतिशय चवदार असणारी मसूर डाळ शिजायलाही खूप कमी वेळ लागतो. भरपूर प्रोटीन्स देणाऱ्या मसूर डाळीमध्ये कॅलरीज मात्र कमी असतात त्यामुळे वजन कमी करणाऱ्यांच्या रोजच्या आहारात ही डाळ हवीच !

(Image : Google)

ही डाळ पचायला हलकी असल्यामुळे पोटाचं आरोग्य चांगलं राहतं. त्वचेचा पोत म्हणजेच कॉम्प्लेक्शन उत्तम राहतं. तसेच स्नायूंची ताकद चांगली राहण्यासाठी ही डाळ फायदेशीर असते. मसूर डाळीमुळे वातदोष वाढतो आणि कफ आणि पित्त दोष बॅलन्स राहतात. डोळ्यांचं आरोग्य आणि दृष्टी चांगली राहण्यासाठी मसूर डाळीचा फायदा होतो. कारण या डाळी मधून विटामिन ए, विटामिन सी, विटामिन ई मुबलक प्रमाणात मिळतं. मसूर डाळीतून मिळणाऱ्या प्रोटीन आणि अँटिऑक्सिडंटमुळे सुद्धा डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहतं. तसेच वयोमानाप्रमाणे तयार होणारे डोळ्यातील दोष लांबवता येतात. ह्या डाळीमधून चांगल्या प्रमाणात कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम मिळतं, ज्यामुळे हाडांचं आरोग्य चांगले राहतं.तसेच दातांचं आरोग्यही चांगलं राहण्यासाठी आणि ऑस्टिओपोरोसिसचा धोका कमी होण्यासाठीही मसूर डाळ फायदेशीर ठरते. 

आयुर्वेदिक औषध उपचारांमध्ये मसूर डाळीचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. लहान मुलांची वाढ आणि विकास चांगला होण्यासाठी त्यांच्या रोजच्या आहारात मसूर डाळीचा वापर करायला हवा.या डाळीतून भरपूर प्रमाणात फायबर्स मिळतात त्यामुळे तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. डायबिटिक रुग्णांनी रोजच्या आहारात मसूर डाळ वापरली तर त्यांची रक्तशर्करा नियंत्रणात राहण्यास मदत होते. मसूर डाळीचं सूप, आमटी, खिचडी हे पदार्थ अतिशय चविष्ट लागतात. त्यामुळे तूर आणि मूग या डाळींसोबत आहारात मसूर डाळीचा आवर्जून समावेश करायला हवा.  

टॅग्स :अन्नआहार योजना