Join us  

World Food Day : रोज दोनदा जेवता खरं, पण आहारात हे 5 पदार्थ असतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2021 3:03 PM

आपला आहार संतुलित त्याचप्रमाणे प्रतिकारशक्ती वाढविण्याच्यादृष्टीने योग्य असायला हवा. पाहूयात दररोजच्या आहारात असायलाच हवेत असे काही अन्नघटक...

ठळक मुद्देबैठ्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहेछोट्या-मोठ्या कुरबुरींपासून दूर राहायचे असल्यास काही घटक आहारात असायलाच हवेतत्यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होऊन आरोग्य उत्तम राहाते

आरोग्य उत्तम राहण्यासाठी झोप, व्यायाम याबरोबरच आहार हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आहार चांगला असेल तर तुम्ही अनेक समस्यांपासून स्वत:ला दूर ठेऊ शकता. पण हेच जर तुम्ही सतत जंक फूड, मसालेदार, तळलेले पदार्थ किंवा कमी पोषक पदार्थ खात असाल तर त्याचा शरीराला काहीही उपयोग होत नाही आणि तुम्हाला आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. सध्या वर्क फ्रॉम होम, त्यामुळे सतत डोळ्यासमोर असणारा स्क्रीन, कामाचे वाढलेले तास आणि बैठी जीवनशैली यामुळे खाण्याच्या वेळा, खाण्याचे स्वरुप यामध्ये बरेच बदल झालेले दिसून येत आहेत. कमी अंतराने खाणे किंवा दोन खाण्यांमध्ये खूप जास्त अंतर असणे यामुळे आरोग्याच्या तक्रारी उद्भवतात. तसेच खाण्याच्या वेळा निश्चित नसणेही आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. यामुळे अॅसिडीटी, बद्धकोष्ठता यांसारखे पोटाशी निगडित त्रास सतावू शकतात. आज जागतिक अन्न दिवसाच्या निमित्ताने तुमच्या रोजच्या आहारात असायलाच हवेत असे काही अन्नघटक पाहूया...

बदाम 

तुमचा आहार संतुलित आणि प्रथिने, जीवनसत्त्वे यांनी युक्त असेल तर तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहते. प्रतिकारशक्ती चांगली असल्यास सतत आजारी पडण्याचे कारणच नाही. बदाम आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात हे आपल्याला माहित आहे. आठवड्याचे ७ दिवस रोज बदाम खाणाऱ्या लोकांना बरेचसे त्रास उद्भवत नसल्याचे नुकत्यात करण्यात आलेल्या एका अभ्यासातून समोर आले आहे. बदामामध्ये मॅग्नेशियम, प्रोटीन, व्हीटॅमिन इ, झिंक यांसारखे आरोग्यासाठी उपयुक्त असे बरेच घटक असतात. दररोज २ ते ३ बदाम खाल्ल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. सध्या घरात बसून काम असल्यामुळे सतत तोंडात टाकायला काहीतरी लागते. अशावेळी तुम्ही दोन ते ३ बदाम खाल्ल्यास तुम्हाला चटपटीत काही खायची इच्छा होणार नाही. तसेच बदामामुळे तुम्हाला एनर्जी आल्यासारखी वाटेल आणि तुम्ही दिवसभर ताजेतवाने राहण्यास मदत होईल. 

( Image : Google)

संत्री 

रोजच्या आहारात संत्र्यांचा समावेश केल्यास तुम्हाला हृदयाशी संबंधित आजार उद्भवण्याची शक्यता कमी असते. तसेच संत्र्यामध्ये असणाऱ्या अँटीऑक्सिडंटसमुळे तुमच्या पेशींचे कमीत कमी नुकसान होते. संत्री त्वचेसाठीही अतिशय उत्तम कार्य करतात. संत्र्यामध्ये असणाऱ्या व्हीटॅमिन सी मुळे पांढऱ्या रक्तपेशी आणि अँटीबॉडीज तयार व्हायला मदत होते, तसेच प्रतिकारशक्ती वाढते. नुसती संत्री खाण्यापेक्षा तुम्ही संत्र्यापासून तयार केलेले पदार्थ किंवा ज्यूसही घेऊ शकता, फक्त यामध्ये कृत्रिम साखर नसावी. 

काकडी

काकडीमध्ये जवळपास ९६ टक्के पाणी असते. तसेच काकडी सहज कुठेही मिळू शकते आणि परवडणारा घटक आहे. काकडीमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकून राहण्यास मदत होते. त्यामुळे तुमचे पचनकार्य सुधारण्यासही मदत होते. काकडीमध्ये कॅलरीज नसतात त्यामुळे तुम्ही जेवणाच्या काही तास आधी एक काकडी रोज खाल्ल्यास तुमचे वजन कमी होण्यास मदत होते. काकडीमध्ये कॅल्शियम आणि व्हीटॅमिन के असल्याने हाडांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. याबरोबरच काकडीमध्ये व्हीटॅमिन ए,बी,सी, मँगनिज, तांबे आणि पोटॅशियम असते. यामुळे तुमची प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. काकडीत व्हीटॅमिन बी१, बी ५ आणि बी ७ असल्याने मज्जासंस्थेला आराम मिळण्यास मदत होते, त्यामुळे भिती आणि ताण कमी होण्यास मदत होते. तसेच सलाडचा उत्तम पर्याय असल्याने तुम्ही जेवणातही काकडीचा वापर करु शकता. 

कडधान्ये 

कडधान्यांमध्ये फायबरसोबतच प्रथिने, लोह आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असते. फायबरमुळे पचनकार्य चांगले होण्यास मदत होते, त्याचप्रमाणे यातील विद्रव्य घटकांमुळे कोलेस्टेरॉलची पातळी कमी होण्यासही मदत होते. कडधान्य खाल्ल्याने पोट पूर्णपणे भरते आणि त्यामुळे तुम्हाला इतर काही खायची इच्छा होत नाही. कडधान्ये सलाडसोबत खाण्याबरोबरच तुम्ही उसळ करुन ती पोळी आणि भातासोबतही खाऊ शकता. 

आलं

आलं अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. आल्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास मदत होते. ताज्या आल्याचा आहारात समावेश केल्यास तुम्ही वेगवेगळ्या संसर्गांपासून स्वत:चा बचाव करु शकता. आलं आपण वेगवेगळ्या पदार्थांचा स्वाद वाढावा म्हणून तर वापरतोच पण चाहमध्येही आल्याचा स्वाद चांगला लागतो आणि प्रतिकारशक्ती वाढण्यास त्याची मदत होते. झोपताना आलं घालून पाणी प्यायल्यास आरोग्यासाठी चांगले असते. सर्दी-खोकल्यापासून आराम मिळवायचा असल्यास आले अतिशय गुणकारी आहे. 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स