हिवाळा म्हणजे ताज्या आणि पौष्टिक भाज्यांचा हंगाम! गाजर, मूळा, फुलकोबी, हिरवी मिरची, मटार अशा अनेक भाज्या या काळात ताज्या आणि एकदम फ्रेश मिळतात. या हंगामी भाज्यांची चव आणि पौष्टिकता वर्षभर टिकवून ठेवण्याचा सर्वोत्तम आणि पारंपारिक मार्ग म्हणजे त्यांचे लोणचे (Pickle) बनवणे! हे लोणचे तुमच्या जेवणाची चव केवळ वाढवत नाही, तर या भाज्यांमधील जीवनसत्त्वे आणि खनिजे साठवून ठेवण्यासही मदत करते. हिवाळ्यात मिळणाऱ्या भाज्यांचे खास लोणचं हा एक असा पारंपरिक उपाय आहे, ज्यामुळे भाज्या दीर्घकाळ टिकतातच, पण त्यांची चव, पौष्टिकता आणि सुगंधही अप्रतिम जपला जातो.
तेल, मसाले आणि मीठ यांच्या योग्य प्रमाणात केलेलं लोणचं फक्त टिकाऊच होत नाही तर जेवणात रुचकरपणा वाढवतं. वर्षभर टिकणारे हे 'झणझणीत' आणि मसालेदार लोणचं बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. एकदा बनवून ठेवले की, वर्षभर तुम्ही प्रत्येक जेवणासोबत या हिवाळी भाज्यांच्या लोणच्याचा आस्वाद घेऊ शकता. संपूर्ण वर्षभर टिकणारे हे हिवाळी भाज्यांचे लोणचे (Winter Vegetable Pickle) घरी अगदी सोप्या पद्धतीने कसे तयार करावे याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. हिरवेगार मटार - २ कप
२. गाजर - २ कप
३. फ्लॉवर - २ कप
४. मीठ - चवीनुसार
५. साखर / गूळ - चवीनुसार
६. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून
७. तुरटी - १ छोटा खडा
८. लोणचं मसाला - १ टेबलस्पून
९. मोहरी - १ टेबलस्पून
१०. मेथी दाणे - १ टेबलस्पून
११. हिंग - चिमूटभर
१२. हळद - १/२ टेबलस्पून
१३. तेल - २ कप
फ्रीजमध्ये ठेवलेले दही किती दिवस ताजे राहते? 'या'पेक्षा जास्त दिवस ठेवले तर हमखास बिघडेल पोट...
विदर्भ स्पेशल! तुरीच्या दाण्यांचा ‘सोले भात'! अस्सल पारंपरिक वैदर्भिय चव, हिवाळ्यातला खास बेत...
कृती :-
१. सगळ्यात आधी मटार, गाजर, फ्लॉवर पाण्याने २ ते ३ वेळा स्वच्छ धुवून घ्या.
२. आता फ्लॉवर, गाजर यांचे एकदम बारीक - लहान तुकडे करून घ्या.
३. एका मोठ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात ५ ते ६ वेळा तुरटीचा खडा फिरवून मग चमचाभर मीठ घाला. त्यानंतर सगळ्या भाज्या यात १० ते १५ मिनिटे भिजवून ठेवा.
४. १० मिनिटानंतर या भाज्यांमधील पाणी निथळून त्या एका स्वच्छ कापडावर व्यवस्थित पसरवून पुसून कोरड्या करून घ्या .
५. या भाज्या एका बाऊलमध्ये घेऊन त्यात चवीनुसार मीठ, साखर किंवा गूळ, लाल तिखट मसाला, लोणचं मसाला भुरभुरवून घ्यावा.
६. एका छोट्या भांड्यात तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करा, या गरम तेलात मोहरी, मेथीचे दाणे, हिंग, हळद घालून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी. ही गरमागरम तयार फोडणी लोणच्यावर ओतून घ्यावी. मग चमच्याने सगळे लोणचं कालवून एकजीव करून घ्यावे.
७. तयार लोणचं एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावं.
हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या भाज्यांचे चटपटीत, चमचमीत असे वर्षभर टिकणार चविष्ट लोणचं खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम वरण - भात, चपाती, भाकरीसोबत आपण हे लोणचं नक्कीच खाऊ शकता.
