यंदा चांगली थंडी पडली आहे. बाजारात भरपूर हिरव्यागार भाज्या आल्या आहेत. तेलकट, तुपकट, गोड, तिखट, आंबट, तुरट अशा कोणत्याही चवीचे पदार्थ पोटभर खा, या ऋतूमध्ये ते सहज पचतात. शरीरात ऊर्जा निर्माण करतात. मग ती भोगीची भाजी असो, नाहीतर सुरती उंधियु! सगळ्या प्रकारच्या भाज्या, मसाले, भरपूर तेल आणि मुख्यत्त्वे तिळाचे कूट आणि गोडव्यासाठी गुळाचा खडा टाकला जातो. शिवाय संक्रातीला केला जाणारा तीळ गूळ, गजक, गुडदाणी, गुळपोळी, गुळपापडी, तिळगुळाची चिक्की या सगळ्यामधला कॉमन फॅक्टर अर्थात सामायिक घटक पाहिलात तर लक्षात येईल, तीळ आणि गूळ ही हिवाळ्यातली जय आणि वीरूची जोडी आहे. हिवाळ्यात सगळ्या पदार्थांत यांची उपस्थिती असते. पण का? आरोग्याच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व जाणून घेऊ.
गुळाचे महत्त्व :
तापमानवाढ: आयुर्वेदामध्ये गुळ हा ऊर्जावर्धक पदार्थ मानला जातो, त्यामुळे हिवाळ्यात शरीराचे तापमान वाढवण्यासाठी त्याची मदत होते.
रोगप्रतिकारक शक्ती: गुळात भरपूर अँटिऑक्सिडंट्स, जस्त आणि सेलेनियम सारखी खनिजे असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
पचन: गूळ पचनशक्ती वाढवतो आणि बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करतो.
श्वसनाचे विकार : दमा, ब्राँकायटिस आणि खोकला यांसारख्या श्वसनाच्या समस्यांपासून मुक्त होण्यास गूळ मदत करतो.
डिटॉक्सिफिकेशन: गूळ शरीरातील विषारी पदार्थ आणि अशुद्धता काढून टाकून शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करतो.
रक्तदाब: गुळात पोटॅशियम असते, जे रक्तदाब पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.
वजन कमी करणे: गुळाचा छोटासा खडा खाल्ला तरी छोटी भूक त्वरित भागते आणि चयापचय सुधारण्यास मदत होते.
त्वचा आणि केस: गुळात ग्लायकोलिक ऍसिड असते, जे त्वचेच्या मृत पेशींना बाहेर काढण्यास मदत करते आणि लोह असल्यामुळे रक्तशुद्धी होते.
ॲनिमिया: गुळातील लोहाचे प्रमाण जास्त असल्याने ॲनिमिया टाळण्यास मदत होते.
तिळाचे फायदे :
तापमानवाढ : तिळामुळे ऊर्जा वाढते, हिवाळ्यात शरीराला आवश्यक पोषण मिळते.
पोषणमूल्य : तिळाच्या बियांमध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम आणि जस्त यासह आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. हाडांच्या आरोग्यासाठी, प्रतिकारशक्तीसाठी आणि इतर शारीरिक कार्यांसाठी हे पोषक घटक महत्त्वाचे ठरतात.
उपयुक्त चरबी : तिळाच्या बियांमध्ये ओमेगा -3 फॅटी ऍसिडसह निरोगी घटक असतात, जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात आणि त्वचेला आर्द्रता ठेवण्यास मदत करतात.
रोगप्रतिकारशक्ती वाढवते : तिळाच्या बियांमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे हिवाळ्यातील आजारांपासून संरक्षण मिळू शकते.
पाचक : तिळात फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनक्रिया नियमित ठेवण्यास मदत करते.
त्वचेचे पोषण करते : तिळाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई असते, जे त्वचेचे पोषण आणि हायड्रेट करण्यास मदत करते आणि पर्यावरणीय तणावापासून संरक्षण करते.