Join us  

रोज कोणती डाळ खावी तुरीची की मुगाची? प्रोटीन- पोषण - पचनासाठी कोणती डाळ योग्य..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2022 5:05 PM

डाळीचं वरण करण्याबरोबरच डोसे, हलवा, लाडू, भजी असे अनेक पदार्थ करता येतात...

ठळक मुद्देमुगाचं सूप प्याल्यानं उष्माघाताचा धोका टाळण्याइतका ओलावा शरीरात निर्माण होतो.   मूगाची डाळ तुरीच्या डाळीपेक्षा पचायला हलकी असल्याने आपण रोजच्या रोज या डाळीचा आहारात समावेश केला तरी हरकत नाही

डाळींचा आहारात समावेश असायला हवा असे आपण नेहमी ऐकतो. पण या डाळी मात्र आपण केवळ वरण किंवा आमटी याच स्वरुपात खातो. डाळींमध्ये शरीराला आवश्यक असणारे बरेच घटक असल्याने रोजच्या आहारात विविध प्रकारच्या डाळींचा आवर्जून समावेश करायला हवा. डाळींमध्ये झिंक, प्रथिने, जीवनसत्त्वे चांगल्या प्रमाणात असल्याने शरीराचे पोषण होण्याचे काम डाळींमार्फत केले जाते. डाळींपासून वरणाबरोबरच भजी, धिरडे, शिरा, हलवा, लाडू असे वेगवेगळे पदार्थ करता येतात. आपण रोजच्या जेवणात तूरडाळ आवर्जून वापरतो. कधीतरी मूगाच्या डाळीचे वरण किंवा मूगाच्या डाळीची खिचडी केली जाते. मात्र मूग डाळ पचायला हलकी असल्याने तिचा आहारात नियमित समावेश करायला हवा. तूरीच्या डाळीने अनेकदा पित्ताचा त्रास होण्याची शक्यता असते. तसेच ही डाळ पचायलाही काही प्रमाणात जड असते. अशावेळी मूगडाळ खाणे अतिशय फायदेशीर ठरते. मुगाच्या डाळीत कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, क, बी 6 जीवनसत्व, फायबर, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, लोह, नियासिन, थायमिन हे घटक असतात. मूग डाळीत असलेल्या फायबरमुळे आतड्यात साचलेली घाण बाहेर टाकण्यास मदत होते.

(Image : Google)

मूगडाळ नियमीत खाण्याचे फायदे

१. ही डाळ अगदी हलकी, पथ्याची डाळ आहे. लहान मुलांना किंवा वयस्कर व्यक्तींना आवर्जून ही डाळ दिली जाते. 

२. प्रथिने शरीरात शोषले जाण्यासाठीचे घटक या डाळीत चांगल्या प्रमाणात आहेत. त्यामुळे शरीरातील प्रथिनांचे प्रमाण चांगले राहण्यास या डाळीचा उपयोग होतो.

३. सध्या कोलेस्टेरॉलची समस्या अतिशय सामान्य झाली आहे. मूगाच्या डाळीतील विरघळण्याजोगे तंतुमय पदार्थ (सोल्युबल फायबर्स) शरीरातील कोलेस्टेरॉल कमी होण्यासाठी मदत करतात. 

४. मूगडाळीतला ‘आयसोफ्लॅवॉन’ हा घटक ‘इस्ट्रोजेन’ या संप्रेरकासारखा परिणाम देतो. त्यामुळे स्त्रियांना रजोनिवृत्तीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन कमी झाल्यामुळे होणाऱ्या त्रासाच्या वेळी मूगडाळ चांगली ठरते. 

(Image : Google)

५. मूगाच्या डाळीत ‘बी- १२’ सोडून इतर सर्व ‘बी’ जीवनसत्त्वे असतात. ‘सी’ जीवनसत्त्व आणि फॉलिक अ‍ॅसिडही यात असल्यामुळे ही डाळ प्रतिकारशक्तीसाठीही चांगली.

६. उन्हाळ्यात दिवसात मुगाच्या डाळीचं सूप पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. मुगाच्या डाळीत दाह आणि सूजविरोधी घट्क असल्याने उष्माघात, शरीराचं तापमान वाढणं , तहान लागणं या उन्हाळ्यातल्या समस्यांचा धोका टळतो. मुगाचं सूप प्याल्यानं उष्माघाताचा धोका टाळण्याइतका ओलावा शरीरात निर्माण होतो.   

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.