Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिलं आईस्क्रीम कोणत्या देशात बनलं आणि पहिलं नाव काय होतं? पाहा कसा आहे आईस्क्रीमचा इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 10:21 IST

Ice Cream History : सगळ्यात आधी कोणत्या देशात आईस्क्रीम बनवण्यात आलं होतं? सगळ्यात आधी आईस्क्रीमचं नाव काय होतं? क्वचितच याबाबत कुणाला माहिती असेल. पण आज आम्ही आपल्याला आईस्क्रीमचा इतिहास सांगणार आहोत.

Ice Cream History : नुसतं आईस्क्रीम म्हटलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. जगभरातील लोकांमध्ये आईस्क्रीमची आवड बघायला मिळते. बरेच लोक तर असे आहेत जे केवळ उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यातही आईस्क्रीम फस्त करतात. लहान मुलं आणि महिलांमध्ये आईस्क्रीमची क्रेझ अधिक बघायला मिळते. उन्हाळ्यात आईस्क्रीम थंडावा देते, मनाला आनंद देते आणि गोड खाण्याची इच्छा पूर्ण करते. आपणही अनेक वेगवेगळ्या प्रकारचं आईस्क्रीम खाल्लं असेल. पण आपल्याला माहीत आहे का की, आईस्क्रीमची सुरूवात कुठे झाली होती? सगळ्यात आधी कोणत्या देशात आईस्क्रीम बनवण्यात आलं होतं? सगळ्यात आधी आईस्क्रीमचं नाव काय होतं? क्वचितच याबाबत कुणाला माहिती असेल. त्यामुळे आज आम्ही आपल्याला आईस्क्रीमचा इतिहास सांगणार आहोत.

आईस्क्रीमचा इतिहास

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल की, आईस्क्रीमचा इतिहास साधारण 2,500 वर्ष जुना आहे. प्राचीन संस्कृतींमध्येही उष्णतेपासून दिलासा मिळवण्यासाठी थंड आणि गोड पदार्थांचा वापर केला जात होता. गोठवलेल्या मिठायांची सुरुवात नेमकी कुठे झाली याबाबत वेगवेगळे दावे आढळतात. काही ठिकाणी १७व्या शतकातील इटली आणि फ्रान्सचा उल्लेख आढळतो, तर काही ठिकाणी चीनचा. मात्र, आईस्क्रीम तयार होण्याआधी बर्फ निर्मिती आणि स्टोरेजचं तंत्रज्ञान आवश्यक होतं, जे सर्वात आधी इ.स.पू. ५५० च्या सुमारास फारस म्हणजे आताच्या इराण येथे विकसित झालं.

इराणमध्ये विकसित झालं बर्फ गोठवण्याची तंत्रज्ञान

प्राचीन फारसी लोकांनी वाळवंटी भागात ‘यखचाल’ नावाच्या मधमाशीच्या पोळ्यासारख्या दिसणाऱ्या मोठ्या दगडी रचना उभारल्या होत्या. या संरचनांमध्ये खोल आणि इन्सुलेटेड अंडरग्राउंड भाग असायचा, ज्यामुळे वर्षभर बर्फ साठवून ठेवता येत असे. उंच घुमट गरम हवा बाहेर सोडत, तर ‘विंड कॅचर’ थंड हवा आत खेचत. या रचना केवळ बर्फ साठवण्यासाठीच नव्हे, तर बर्फ तयार करण्यासाठीही वापरल्या जात. हिवाळ्यात कालव्यांद्वारे उथळ तलावांमध्ये पाणी सोडलं जात असे, जे रात्रीच्या कमी तापमानामुळे आणि कोरड्या हवेमुळे गोठत असे. आजही इराणमध्ये अनेक यखचाल पाहायला मिळतात.

सर्वात आधी शरबत आणि फालूदा तयार झाले

या साठवलेल्या बर्फापासून फळांचे शरबत, शोरबे आणि ‘फलूदा’सारखे पदार्थ तयार केले जात होते. सुमारे ६५० ईसवीमध्ये फारसवर अरबांनी विजय मिळवल्यानंतर हे तंत्रज्ञान मध्यपूर्वेत पसरले. याच तंत्रज्ञानाच्या मदतीने सीरियामध्ये ‘बूझा’ आणि फारसमध्ये ‘बस्तानी’सारखी चिवट आईस्क्रीम तयार करण्यात आली. याच काळात चीनच्या तांग राजवटीत ‘सुशन’ नावाची गोठवलेली मिठाई बनवली जात होती. कवींनी तिचे वर्णन तोंडात विरघळणारी, द्रव आणि घन यांच्या मधली अशी रचना असलेली केले आहे. काळानुसार फ्रीझिंग तंत्रज्ञानात सुधारणा होत गेली. १५५८ मध्ये नेपल्स येथे जियाम्बातिस्ता डेला पोर्ता यांचे ‘माजिया नातुरालिस’ हे पुस्तक प्रकाशित झाले, ज्यात बर्फात शोरा म्हणजेच पोटॅशियम नायट्रेट मिसळून द्रव पदार्थ झपाट्याने थंड करण्याची पद्धत सांगितली आहे.

इटली आणि फ्रान्समध्ये साखरेची आईस्क्रीम लोकप्रिय झाली

पुढे १७व्या शतकात मीठ, पाणी आणि बर्फ यांच्या मिश्रणाचे प्रयोग करण्यात आले. ज्यामुळे कमी बर्फातही गोठवलेल्या मिठाया तयार करणं शक्य झालं. या तंत्रज्ञानाला कॅरिबियनमधील युरोपीय वसाहतींमधून मिळणाऱ्या स्वस्त साखरेचा मोठा फायदा झाला. साखर गोठवलेल्या मिठायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते, कारण ती मिश्रणाला कडक बर्फाचे खडे बनू देत नाही. आधुनिक आईस्क्रीमची ‘पहिली’ रेसिपी कोणाची, यावर १६९० च्या दशकात इटली आणि फ्रान्स यांच्यात दावे-प्रतिदावे झाले.

दूध, साखर आणि फळांपासून बनायची आईस्क्रीम

इटलीमध्ये कार्डिनल बार्बेरिनी यांच्यासाठी काम करणाऱ्या अल्बर्टो लातिनी यांनी १६९४ मध्ये ‘द मॉडर्न स्टुअर्ड’ या पुस्तकात दूध, साखर आणि फळांपासून बनवलेल्या ‘मिल्क सोरबे’ची रेसिपी दिली. ही रेसिपी आजच्या जेलाटोची पूर्वज मानली जाते. तर फ्रान्समध्ये लुई १४व्या राजाचे मंत्री जीन-बॅप्टिस्ट कोलबेर्ट यांच्यासाठी काम केलेल्या निकोलस ओदिजे यांनी १६९२ मध्ये ‘ला मेझों रेग्ले’ या पुस्तकात फळांचे सोरबे आणि संत्र्याच्या फुलांच्या पाण्याने बनवलेल्या स्वादिष्ट आईस्क्रीमची रेसिपी प्रकाशित केली. तज्ज्ञांच्या मते, ओदिजे यांच्या रेसिपीमध्ये मिश्रण सतत ढवळणे आणि खरवडण्याची पद्धत सांगितली होती, ज्यामुळे आईस्क्रीमची बनावट अधिक मऊ आणि क्रीमी झाली. अशा प्रकारे अनेक वर्षांपासून चालत आलेल्या तांत्रिक आणि पाककलेच्या प्रगतीनंतर आजची क्रीमी आईस्क्रीम अस्तित्वात आली.

English
हिंदी सारांश
Web Title : Ice cream's sweet history: From ancient Persia to modern delight.

Web Summary : Ice cream's history dates back 2,500 years. Persia developed ice storage. Arabs spread the tech. Italy and France innovated recipes. Modern ice cream emerged after centuries of culinary and technological advancements.
टॅग्स :अन्नइंटरेस्टींग फॅक्ट्स