पिंपल्स दिसले की मनातली पहिली प्रतिक्रिया असते, हे आत्ताच नाहीस झालं पाहिजे! आणि मग नकळत आपला हात त्या पिंपलवर जातो. चिमटा काढून फोडायची इच्छा अनावर होते आणि आपण विचारही करत नाही. पटकन बोटांच्या चिमटीत पिंपल पकडून फोडून टाकतो. (What happens if you pop a pimple? These changes occur in the skin for a lifetime)ते फोडल्यावर काही क्षणासाठी हलके वाटते, पण हा छोटासा दिलासा त्वचेसाठी किती मोठा त्रास निर्माण करू शकतो, हे अनेकांना लक्षात येत नाही.
पिंपल म्हणजे त्वचेखालील तेल, मृत पेशी आणि बॅक्टेरिया यांचा एकत्रित परिणाम. तो फोडताना हा सगळा दाब उलट त्वचेत खोलवर ढकलला जातो. त्यातून दाह वाढतो आणि पिंपल आणखी खोलवर डाग निर्माण करु शकतो. पिंपलमधील पस बाहेर काढल्यावर काही सेकंद समाधान मिळते, पण त्या जागी सूज, लालसरपणा किंवा वेदना वाढतात. त्वचेला नैसर्गिकरीत्या बरे होऊ देण्याऐवजी आपण पुन्हा जखम तयार करत असतो.
यातील सर्वात मोठा धोका म्हणजे डाग. पिंपल दाबून, खाजवून त्याची त्वचा वारंवार उघडली की ती जागा काळवंडते. हे डाग महिनोन्महिने जात नाहीत. काहींच्या बाबतीत खड्ड्यासारखी खुणही राहते. ही दाहानंतरची प्रतिक्रिया म्हणजेच पोस्ट-इन्फ्लेमेटरी हायपरपिग्मेंटेशन, जी पिंपलपेक्षा जास्त त्रासदायक ठरते. फोडताना नखातील जंतू त्वचेत जातात आणि छोट्या पिंपलचे मोठ्या, दुखऱ्या गाठीमध्ये रूपांतर होऊ शकते.
पिंपल फोडण्याची सवय मानसिकदृष्ट्या देखील तीव्र असते. आरशात दिसणारा प्रत्येक छोटा पिंपल फोडायची इच्छा होते. काहींना हे ताण, अस्वस्थता किंवा चिंता असताना जास्त जाणवते. ही सवय इतकी ऑटोमॅटिक होते की हाताची हालचाल कधी झाली हेच कळत नाही आणि मग त्वचा दिवसेंदिवस जास्त संवेदनशील आणि डागाळलेली दिसू लागते.
पिंपलवर प्रयोग करण्यापेक्षा त्याला हात न लावणे हेच सर्वात मोठे औषध असते. चेहरा स्वच्छ ठेवणे, सौम्य फेसवॉश वापरणे, हलका जेल किंवा स्पॉट ट्रीटमेंट लावणे हे उपाय पिंपलला नैसर्गिकरीत्या कोरडे होऊ देतात. त्याला स्वतःच वाळू द्यावे, निघून जाऊ द्यावे. हात चेहऱ्यावर कमी नेणे ही छोटी सवय पिंपल्सचे प्रमाण, त्यांचे वारंवार येणे आणि डाग निर्माण होणे यावर मोठा फरक पाडेल. पिंपल फोडणे हा काही क्षणांचा मोह असतो, पण त्याचे ठसे मात्र अनेक दिवस टिकतात. थोडा संयम ठेवा म्हणजे त्वचा पुन्हा मऊ, स्वच्छ आणि निरोगी होते.
