आजकाल लोक आहारात पनीरचा भरपूर समावेश करत आहेत. आरोग्य तज्ञ म्हणतात की, निरोगी राहण्यासाठी तुम्ही दररोज योग्य प्रमाणात पनीरचं सेवन करू शकता. लोक पनीरपासून अनेक प्रकारचे पदार्थ बनवतात. त्यात पनीर पराठ्यापासून शाही पनीरपर्यंत सर्वच असतं. जे लोक डाएट करतात आणि जिममध्ये जातात ते याचा खूप वापर करतात. आपण जे पनीर खात आहोत ते बनावट, भेसळयुक्त आहे की नाही हे ओळखणं खूप अवघड आहे.
सध्या बाजारात अनेक ठिकाणी बनावट पनीर सापडत आहे. त्यामुळे पनीर खाणाऱ्यांची देखील चिंता वाढली आहे. हे पनीर व्हेजिटेबल ऑईल, स्टार्च आणि पाम ऑईलच्या मदतीने बनवलं जातं. सध्या सोशल मीडियावर डाळ आणि पनीरशी संबंधित एक अशी ट्रिक व्हायरल होत आहे, ज्याच्या मदतीने पनीरची क्वालिटी चेक करता येते. चला तर मग पनीर बनावट आहे की चांगलं यातला फरक कसा ओळखायचा हे जाणून घेऊया...
डाळीची व्हायरल ट्रिक
सोशल मीडियावर तूर डाळ वापरून एक ट्रिक व्हायरल होत आहे. सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे पाणी गरम करा. या पाण्यात तूर डाळ आणि पनीरचा एक तुकडा घाला. जेव्हा पाणी उकळू लागतं, तेव्हा त्यात गुलाबी रंग दिसला तर समजून घ्या की तुमचं पनीर बनावट आहे. युरियाच्या भेसळीमुळे त्याचा रंग गुलाबी आहे. तुम्ही असं पनीर खाणं टाळा.
लेबल काळजीपूर्वक तपासा
पनीर चांगलं आहे का हे तुम्ही त्याच्या पॅकेटवर लिहिलेल्या माहितीवरून ओळखू शकता. जर पनीरच्या पॅकेटच्या लेबलवर दूध, सॉलिग आणि सायट्रिक एसिड लिहिलं असेल तर ते चांगलं आहे असं समजावं. त्याच वेळी, जर पॅकेटवर व्हेजिटेबल ऑईल किंवा स्टार्चचा उल्लेख असेल तर ते बनावट पनीर असू शकतं.
आयोडीन टेस्ट करा.
तुम्हाला हवं असल्यास, तुम्ही आयोडीन टेस्टद्वारे पनीरची गुणवत्ता देखील तपासू शकता. यासाठी पनीरच्या तुकड्यावर आयोडीनचे काही थेंब टाका. जर पनीरचा रंग निळा झाला तर त्यात स्टार्च आहे, असं पनीर अजिबात खाऊ नका.