हिवाळा सुरू झाला की बाजारात हिरव्यागार ताज्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढते. या ऋतूतील अशीच एक खास मेजवानी म्हणजे तुरीचे हिरवेगार दाणे. या कोवळ्या आणि पौष्टिक दाण्यांची चवच खास असते. या ताज्या तुरीच्या दाण्यांपासून एक अत्यंत चविष्ट आणि पारंपरिक चवीचा भात तयार केला जातो, ज्याला 'सोले भात' किंवा 'हिरव्या तुरीच्या दाण्यांचा भात' असे म्हणतात.
गरमागरम सोले भात थंडीच्या दिवसांत शरीराला ऊब (Warmth) तर देतोच, पण तुरीच्या दाण्यांतील प्रोटीन आणि फायबरमुळे तो आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतो. तुरीच्या दाण्यांचा वापर करून तयार केला जाणारा गरमागरम, सुगंधी आणि पारंपरिक ‘सोले भात’ हा विदर्भाची खासियत... विदर्भातील प्रत्येक घरांत हा अस्सल पारंपरिक चवीचा सोले भात अगदी कम्फर्ट फूड मानले जाते. हा सोले भात फक्त एक पदार्थच नाही, तर विदर्भातील ग्रामीण संस्कृती आणि अस्सल चवीची ओळख आहे. एकदा हा भात खाल्ल्यावर त्याची चव तुम्ही विसरू शकणार नाही! भाताचा सुगंध, मसाल्यांची चव आणि तुरीच्या दाण्यांची खास तुरट - गोड चव एकत्र येऊन तयार होणारा हा पदार्थ हिवाळ्यातील जेवणाची रंगत वाढवतो. थंडीत मिळणाऱ्या हिरव्यागार तुरीच्या दाण्यांचा अस्सल पारंपरिक वैदर्भिय चवीचा सोले भात करण्याची विशेष रेसिपी...
साहित्य :-
१. तुरीचे दाणे - २०० ग्रॅम
२. तांदूळ - २ कप (भिजवलेले)
३. कांदे - २ (उभे चिरून घेतलेले)
४. सुकं खोबरं - ३ ते ४ टेबलस्पून
५. दालचिनी - २ ते ३ काड्या
६. लवंग - ५ ते ६
७. वेलीची - ३ ते ६
८. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
९. हिंग - चिमूटभर
१०. तमालपत्र - २ पाने
११. आले-लसूण पेस्ट - १ टेबलस्पून
१२. शेंगदाणे - १/२ कप
१३. हिरव्या मिरच्या - २ ते ३
१४. टोमॅटो - १ बारीक चिरलेला
१५. हळद - १/२ टेबलस्पून
१६. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
१७. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
१८. धणेपूड - १/२ टेबलस्पून
१९. गरम मसाला - १ टेबलस्पून
२०. कसुरी मेथी - १ टेबलस्पून
२१. मीठ - चवीनुसार
२२. बटाटे - १ ते २ (लाहान तुकडे केलेले)
२३. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
हिवाळ्यात फक्त दूध हळद नको, तर दुधात मिसळा ‘हे’ २ थेंब - जुनाट कफ आणि सर्दीखोकल्यावर घरगुती उपाय...
कृती :-
१. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात उभा चिरलेला कांदा, सुकं खोबर, दालचिनी, लवंग, वेलीची परतून घ्या, मग हे मिश्रण मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा.
२. कुकरमध्ये तेल घेऊन त्यात तमालपत्र, हिंग, जिरे, आले-लसूण पेस्ट घालून हलकेच परतवून खमंग अशी फोडणी तयार करून घ्यावी.
३. मग यात हिरव्या मिरच्या, शेंगदाणे, मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट, टोमॅटो, हळद, लाल तिखट मसाला, जिरेपूड, धणेपूड, गरम मसाला, कसुरी मेथी व चवीनुसार मीठ घालावे.
४. बटाटे, तुरीचे दाणे , भिजवलेला तांदूळ घालून २ ते ३ वाट्या पाणी घाला.
५. २ ते ३ शिट्ट्या येईपर्यंत प्रेशर कुकरमध्ये शिजवा.
गरमागरम विदर्भ स्पेशल तुरीच्या दाण्यांचा अस्सल पारंपरिक चवीचा सोले भात खाण्यासाठी तयार आहे.
