कच्ची केळी आरोग्याचा खजिना मानली जातात, पण अनेकदा लोक ती उकडूनच वापरतात. आज आपण कच्च्या केळ्याची अशी कोरडी भाजी पाहणार आहोत जी चवीला जबरदस्त, करायला अतिशय सोपी आणि काही मिनिटांत तयार होणारी आहे. ही भाजी पोळी, पराठा किंवा कोणत्याही साइड डिशशिवायही छान लागते. कच्च्या केळात पोटॅशियम, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर असल्यानं रोगप्रतिकार शक्ती वाढते, पचन सुधारतं आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. तर चला जाणून घेऊया ही सोपी आणि टेस्टी रेसिपी...
साहित्य (१–२ जणांसाठी)
२ कच्ची केळी (सोलून कापलेले)
२ चमचे तेल
१/४ चमचा जिरे
१/२ चमचा बडीशेप
१ छोटी हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
१ ते १½ चमचे धणे पावडर
१/२ चमचा लाल तिखट
१/४ चमचा हळद
चवीनुसार मीठ
१/४ चमचा गरम मसाला
१ चमचा बारीक चिरलेली कोथिंबीर
चवीनुसार लिंबाचा रस
कशी बनवाल?
- सगळ्यात आधी कच्ची केळी सोलून मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या. हे तुकडे नीट धुवा, जेणेकरून त्यातील चिकटपणा निघून जाईल. हवे असल्यास थोडा वेळ पाण्यात भिजतही ठेवू शकता.
- आता कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर त्यात जिरे आणि बडीशेप टाका व मंद आचेवर तडतडू द्या. मसाल्याचा सुगंध येऊ लागल्यावर त्यात बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून थोडी परतून घ्या.
- त्यानंतर हळद, धणे पावडर, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घाला. मसाले जळू नयेत म्हणून तेलात नीट मिसळा.
- आता कापलेले कच्च्या केळ्याचे तुकडे कढईत टाका आणि नीट हलवा, जेणेकरून प्रत्येक तुकड्यावर मसाल्याचा थर बसेल.
- कढई झाकणाने झाकून भाजी मध्यम आचेवर शिजू द्या. मधूनमधून झाकण काढून भाजी फिरवा, जेणेकरून केळी तळाला चिकटणार नाहीत. गरज असल्यास १–२ चमचे पाणी शिंपडू शकता, पण भाजी कोरडीच ठेवा.
- साधारण १०–१२ मिनिटांत कच्ची केळी मऊ होतात. चमच्याने सहज तुटू लागतात आणि मसाले नीट मुरले की भाजी तयार झाली असे समजा. गॅस बंद करून त्यावर गरम मसाला शिंपडा.
- शेवटी लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हलक्या हाताने मिसळा. यामुळे भाजीला छान ताजेपणा आणि हलकी आंबट चव येते.
तयार झालेली कच्च्या केळ्याची कोरडी भाजी पोळी, पराठा, पूरी किंवा वरण-भातासोबत छान लागते. उपवासासाठीही थोडे बदल करून ही भाजी करता येते. ही भाजी खूप चविष्ट लागते आणि आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे.
