Join us  

भाजीत मीठ चुकून जास्त झालं? पंकज भदौरीया सांगतात १ सोपा उपाय, खारट भाजी खाण्यापासून होईल सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 3:22 PM

How To Adjust Excess salt in Sabji or Dal Easy trick by Master Chef Pankaj Bhadauria : स्वयंपाक करताना किरकोळ चूकही खाप जास्त महागात पडू शकते...

स्वयंपाक करणं हे अनेकांना अगदीच किरकोळ काम वाटते. पण ती एक कला आहे आणि जीव ओतून केलं तरच पदार्थ छान होतात. नाहीतर केवळ पोट भरण्यासाठी स्वयंपाक केला इथपर्यंतच त्याची पोहोच असते. स्वयंपाक करताना थोडं जरी दुर्लक्ष झालं किंवा चूक झाली तर ती आपल्याला चांगलीच महागात पडू शकते. एखादवेळी एखाद्या पदार्थांत आपण मीठ घालायचे पूर्णपणे विसरुन जातो. मग जेवायला बसल्यावर त्या पदार्थांला चवच नाही हे लक्षात येते आणि वरुन मीठ घालावे लागते. असे होणे एकवेळ ठिक आहे, पण पदार्थांला जास्तीचे किंवा चक्क दुप्पट मीठ होणे हे किती भयंकर आहे आपण समजू शकतो (How To Adjust Excess salt in Sabji or Dal Easy trick by Master Chef Pankaj Bhadauria). 

कधी घाईगडबडीत स्वयंपाक करताना २ वेगवेगळ्या पदार्थांमध्ये मीठ घालायचे सोडून आपण एकाच पदार्थात २ वेळा मीठ घालून ठेवतो. स्वयंपाक करताना हे लक्षात येत नाही मात्र पदार्थ खाल्ल्यावर याची तीव्रता लक्षात येते. ऐन जेवायला बसलेले असताना हा पदार्थ पूर्णपणे बाद करणेही शक्य नसते आणि एकदा घातलेले मीठ बाहेर काढता येणे शक्य नसते. अशावेळी नेमके काय करायचे ते आपल्याला सुचत नाही. प्रसिद्ध सेलिब्रिटी शेफ पंकज भदौरीया अशाप्रकारे मीठ चुकून जास्त पडले तर भाजीचे नेमके काय करायचे याबाबत महत्त्वाच्या गोष्टी आपल्याशी शेअर करतात. इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून या गोष्टी त्या सांगत असून हा उपाय नेमका काय आहे पाहूया... 

(Image : Google)

ग्रेव्हीची भाजी किंवा आमटीसाठी

१. भाजी किंवा आमटीमध्ये मीठ जास्त झाले तर ही भाजी/आमटी एका पॅनमध्ये घालून गॅस लावायचा. 

२. गव्हाच्या पीठाचे लहान लहान गोळे करुन या थोड्याशा पातळ असलेल्या भाजी किंवा आमटीत घालायचे. 

३. या गोळ्यांमुळे भाजी, आमटीतले जास्तीचे मीठ पीठात शोषले जाईल आणि मीठाची मात्रा आपोआप कमी होईल. 

४. थोड्या वेळाने हे गोळे बाहेर काढायचे आणि त्याची विल्हेवाट लावायची. 

कोरड्या भाजीसाठी...

१. कोरड्या भाजीत मीठ जास्त झालं तर ते वेगळं करणं केवळ अशक्य असतं.

२. अशावेळी त्या भाजीत वरुन काहीतरी घालण्याशिवाय पर्याय नसतो. 

३. वरुन काहीतरी घालण्याची गोष्ट आंबट असेल तर आपोआप भाजीला एकप्रकारचा आंबट फ्लेवर येतो आणि त्याचा खारटपणा कमी होण्यास मदत होते. 

४. यामध्ये लिंबाचा रस, बारीक चिरलेला टोमॅटो, टोमॅटो प्युरी किंवा अगदी दहीही घालू शकतो. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स