नाश्ता, जेवण किंवा टिफिन असो, गरमागरम पराठा हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा... आपल्यापैकी अनेकांच्या घरांत वेगवेगळ्या प्रकारचे पराठे हमखास तयार केले जातात. पराठा हा असा पदार्थ आहे की जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो आणि अगदी कमी साहित्यात झटपट तयार करता येतो. एरवी घरात भाजीला काही नसले, काहीतरी वेगळं खावंसं वाटलं, रोजच्या जेवणाचा कंटाळा आला किंवा अगदीच स्वयंपाक करायचा कंटाळा आला की झटपट तयार होणारा हा पराठा सगळ्यांचाच विशेष आवडीचा... आत्तापर्यंत आपण वेगवेगळ्या चवींचे पराठे नक्कीच खाल्ले असतील त्यापैकीच टोमॅटो-बेसनाचा (tomato besan stuffed paratha recipe) स्टफ पराठा हा एक खास प्रकार...
हा पराठा फक्त तयार करायला सोपा नाही, तर टोमॅटोचा आंबट - गोड स्वाद आणि बेसन - मसाल्याची चव यामुळे तो अगदी चटकदार लागतो. हा फक्त साधा पराठा नाही, तर याच्या आत भरलेले टोमॅटो आणि बेसनाचे स्टफिंग त्याला एक खास आणि अनोखी चव देते. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत, हा गरमागरम आणि मसालेदार पराठा सगळ्यांनाच आवडेल. साध्या दही किंवा लोणच्यासोबत खाण्यासाठी परफेक्ट असलेला, हा हेल्दी आणि टेस्टी टोमॅटो बेसनाचा स्टफ पराठा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. गव्हाचे पीठ - १ कप २. पाणी - गरजेनुसार ३. तेल - ३ ते ४ टेबलस्पून ४. जिरे - १/२ टेबलस्पून ५. बडीशेप - १/२ टेबलस्पून६. कलोंजी - १/२ टेबलस्पून७. मोहरी - १/२ टेबलस्पून८. आलं - १/२ टेबलस्पून (बारीक किसलेलं)९. हिरव्या मिरच्या - १/२ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१०. टोमॅटो - १ कप (बारीक चिरलेले)११. मीठ - चवीनुसार १२. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)१३. धणेपूड - १/२ टेबलस्पून १४. जिरेपूड - १/२ टेबलस्पून १५. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून १६. हळद - १/२ टेबलस्पून१७ सैंधव मीठ - चवीनुसार १८. बेसन - ३ टेबलस्पून १९. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)२०. तूप/ बटर - २ ते ३ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका मोठ्या बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घेऊन नेहमीप्रमाणे चपातीसाठी मळतो तशीच कणीक मळून घ्यावी. २. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, बडीशेप, कलोंजी, मोहरी, बारीक किसलेलं आलं, बारीक हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला टोमॅटो व चवीनुसार मीठ घालावे. ३. टोमॅटो घातल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा देखील घालावा. मग धणेपूड, जिरेपूड, लाल तिखट मसाला, हळद, सैंधव मीठ घालावे. ४. सगळे मिश्रण चंचायने कालवून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण थोडे शिजल्यावर त्यात बेसन घालावे. आता सगळे जिन्नस एकजीव करून घट्टसर असे पराठ्याचे सारण तयार करून घ्यावे.
५. सारण व्यवस्थित शिजून तयार झाल्यावर एका डिशमध्ये काढून ते थोडे थंड होऊ द्यावे. तोपर्यंत मळून ठेवलेल्या कणकेचे मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत. ६. कणकेचे गोळे घेऊन बरोबर मध्यभागी बोटाने दाब देत खोलगट अशी वाटी तयार करून घ्यावी. यात तयार सारण भरून पुन्हा कणकेच्या गोळ्याला गोलाकार आकार द्यावा. ७. मग पराठा लाटून घ्यावा. पॅनवर थोडे तेल सोडून पराठा दोन्ही बाजुंनी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यावा.
गरमागरम टोमॅटोचा चटपटीत - मसालेदार पराठा खाण्यासाठी तयार आहे. पराठा गरम असताना वरुन तूप किंवा बटर सोडून पराठा खाण्यासाठी सर्व्ह करावा. लोणचं, चटणी, दही किंवा सॉस सोबत हा गरमागरम पराठा खाण्याची मज्जा काही औरच असते.
Web Summary : Tomato Besan Paratha is a quick, easy, and delicious dish, perfect for breakfast, lunch, or dinner. This stuffed paratha offers a unique, tangy flavor suitable for all ages. Enjoy it with yogurt or pickle.
Web Summary : टमाटर बेसन का पराठा एक झटपट, आसान और स्वादिष्ट व्यंजन है, जो नाश्ते, दोपहर के भोजन या रात के खाने के लिए एकदम सही है। यह भरवां पराठा एक अनूठा, खट्टा स्वाद प्रदान करता है जो सभी उम्र के लिए उपयुक्त है। दही या अचार के साथ इसका आनंद लें।