Join us  

सेंद्रिय म्हणता, पण तुम्ही 'केमिकल' असलेलाच गुळ तर खात नाही? कशी ओळखायची गुळातली भेसळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 3:59 PM

आरोग्याच्या दृष्टीने साखरेऐवजी गुळ खाता, हे चांगलंच आहे. पण तुमचा गुळ खरोखरच केमिकलमुक्त आहे की नाही, हे सांगणाऱ्या काही टिप्स..

ठळक मुद्देगुळ घेताना तो डार्क चॉकलेटी रंगाचाच असावा. पिवळट दिसणारा गुळ भेसळयुक्त असतो.

साखर खाल्ल्यामुळे आरोग्यावर किती विपरित परिणाम होत असतात, हे आपण वारंवार ऐकतो. त्यामुळेच साखरेऐवजी शक्य तेथे गूळ खाण्याकडे अनेक जणांचा कल वाढलेला आहे. त्यामुळेच गुळाचे अनेक प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. पावडर गुळ, लहान- मोठ्या गुळाच्या भेल्या असे अनेक गुळ आपण बाजारात पाहतो. यामध्येही अमूक- अमूक गुळ हा सेंद्रिय गुळ असून रसायनविरहीत आहे, असे सांगणाऱ्या काही जाहिरातीहीआपण नेहमीच ऐकतो. या जाहिरातींना भुलून आपण गुळ विकत आणतो खरे, पण आपण आणलेला गुळ खरोखरच सेंद्रिय आहे की नाही, हे ओळखणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

 

बऱ्याचदा सेंद्रिय गुळ किंवा केमिकलविरहित गुळ या नावाखाली ग्राहकांकडून अव्वाच्या सव्वा किंमत आकारली जाते. आपल्याला नैसर्गिक गुळ खायला मिळतो आहे, हे ऐकूणच ग्राहक खुष होतात आणि विक्रेता मागेल ती किंमत त्याला द्यायला तयार होतात. पण अशा पद्धतीने ग्राहकांची दिशाभूल करण्याचा प्रकार सध्या प्रचंड वाढला आहे. एकतर ग्राहकांना जास्त किंमत घेऊन लुबाडायचे आणि दुसरे म्हणजे पुन्हा त्यांच्या आरोग्याशी खेळ करायचा, असा प्रकार सध्या वाढला आहे. त्यामुळेच गुळ घेताना ग्राहकांनी काही खबरदारी नक्कीच घेतली पाहिजे. आपला गुळ खरोखरच सेंद्रिय आहे की केमिकलयुक्त् आहे, हे तपासण्यासाठी शेफ पंकज भदोरिया यांनी काही टिप्स दिल्या आहेत. त्यांनी सांगितलेली ही माहिती निश्चितच प्रत्येक महिलेसाठी उपयुक्त ठरणारी आहे. 

 

गुळ खाण्याचे उपयोग१. गुळ हा अतिशय आरोग्यदायी असतो. त्यामुळेच तर मधुमेही व्यक्तीदेखील गुळ किंवा गुळापासून बनविलेले गोड पदार्थ खाऊ शकतो. २. गुळ खाल्ल्यामुळे अन्नपचन चांगल्याप्रकारे होते. त्यामुळे जेवण झाल्यावर गुळाचा लहानसा खडा नेहमी चघळावा, असे सांगितले आहे.

३. गुळामध्ये लोह मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे ज्यांचे हिमोग्लोबिन कायम कमी असते, अशा व्यक्तींनी किंवा ॲनिमिया असणाऱ्या, लोहाची कमतरता असणाऱ्या व्यक्तींनी गुळाचे सेवन नियमित केले पाहिजे.४. गुळामध्ये कॅल्शियमदेखील मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हाडांना बळकटी देण्यासाठी दररोज थोडा तरी गुळ खावा.५. गुळाचे नियमित सेवन शरीराला उर्जा देणारे असते. ६. गुळ खाल्ल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. त्यामुळे हृदयविकार असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे गुळ खावा.

 

गुळ खरेदी करताना ही काळजी घ्या- गुळ घेताना तो डार्क चॉकलेटी रंगाचाच असावा. पिवळट दिसणारा गुळ भेसळयुक्त असतो. कारण जेव्हा उसाचा रस उकळला जातो, तेव्हा त्याचा रंग डार्क चॉकलेटी होतो. यामध्ये वेगवेगळी रसायने टाकली जातात आणि गुळाचा रंग पिवळसर आणि अधिक खुलवट कसा दिसेल, यासाठी प्रयत्न केला जातो. - पिवळट दिसणाऱ्या गुळामध्ये सोडियम बायकार्बोनेट आणि कॅल्शियम कार्बोनेट यांचे प्रमाण अधिक असते.- सोडियम बायकार्बोनेटमुळे गुळाला एक चकचकीतपणा येतो. असा गुळ पाहून अनेक ग्राहक भुलतात आणि चकचकीत गुळ घेण्यास प्राधान्य देतात.- कॅल्शियम कार्बोनेटमुळे गुळाचे वजन वाढण्यास मदत होते. 

-  गुळ घेण्यापुर्वी तो थोडा चाखून बघा आणि चवीने थोडेसे खारट लागणारे गुळ घेऊ नका.- ज्या गुळामध्ये साखरेचे कण दिसतील, तो गुळ घेऊ नये.- गुळाचा खडा घेऊन त्याची पावडर करा. ही पावडर पाण्यात टाका. पावडर पाण्यात टाकल्यानंतर जर थोडीशीच पावडर पाण्यात विरघळली आणि बाकीची भांड्याच्या तळाशी साचून राहिलेली दिसली, तर असा गुळ घेणे टाळावे. 

 

टॅग्स :अन्नआरोग्यहेल्थ टिप्स