मकर संक्रातीचा (Makarsankranti 2026) सण हा तिळगुळाशिवाय अधूराच आहे. या सणाला तीळ आणि गूळ यांना विशेष महत्त्व असून “तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला” असं म्हणत घरोघरी तीळगुळाचे लाडू, तिळगुळ किंवा तीळ आणि गुळाचे वेगवेगळे पदार्थ हमखास तयार केले जातात. लाडू, चिकीसोबतच तीळ पापडी ही संक्रांतीची खास आणि सगळ्यांचा आवडता पदार्थ मानला जातो. पातळ, कुरकुरीत आणि खमंग अशी तीळ पापडी खायला जितकी स्वादिष्ट लागते, तितकीच ती आरोग्यासाठीही फायदेशीर असते(How To Make Til Papdi Recipe).
संक्रांतीला तिळाचे लाडू तर प्रत्येक घरात तयार केले जातात, पण चवीला अप्रतिम आणि खायला अगदी कुरकुरीत लागणारी 'तीळ पापडी' तयार करणं ही एक कला आहे. कुरकुरीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी 'तीळ पापडी' चवीला उत्तम लागते. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच आवडणारी ही पापडी खाताना जेवढा आनंद होतो, तेवढीच ती तयार करणं देखील सोपं आहे. मकरसंक्रांतीसाठी तिळाची पापडी तयार करण्याची साधीसोपी रेसिपी पाहूयात...आपण साखर आणि गूळ या दोन्ही पदार्थांचा वापर करून कुरकुरीत, खुटखुटीत अशी तीळ पापडी घरीच तयार करू शकता.
साहित्य :-
१. पांढरे तीळ - १/२ कप
२. साखर - १/२ कप
३. साजूक तूप - २ टेबलस्पून
४. वेलची दाणे - १/२ टेबलस्पून
५. पिस्त्याचे काप - १/२ टेबलस्पून
६. गूळ - १/२ कप (किसलेला गूळ)
७. पाणी - ४ ते ५ टेबलस्पून
तीळ पापडी आपण दोन प्रकारे करु शकता. साखर किंवा गूळ असे दोन पदार्थ वापरुन आपण गुळाची कुरकुरीत, चविष्ट अशी पापडी तयार करू शकता.
कृती :-
१. पॅन मध्यम आचेवर व्यवस्थित गरम करून त्यात पांढरे तीळ हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावेत.
२. पांढरे तीळ भाजताना आपण त्यात थोडेसे वेलीची दाणे देखील घालू शकता. तीळ आणि वेलची दाणे एकत्रित भाजून घेतल्यानंतर ते एका डिशमध्ये काढून घ्यावेत.
३. याच गरम पॅनमध्ये आपण आपल्या आवडीनुसार गूळ किंवा साखर घालू शकता. गूळ किंवा साखर घालून मध्यम आचेवर व्यवस्थित गरम करून त्याचा पाक तयार करून घ्यावा.
४. पाक व्यवस्थित तयार झाल्यावर त्यात भाजून घेतलेले तीळ घालावेत मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करुन घ्यावेत.
५. मिश्रण हलके गरम असतानाच थोडे - थोडे मिश्रण घेऊन पोळपाट - लाटणीला थोडे साजूक तूप लावून त्यावर गरम मिश्रण ठेवून सुरीच्या मदतीने आकार देत लाटण्याने लाटून घ्यावे.
६. एकदम पातळ अशी तीळ पापडी लाटून घ्यावी.
गुळाची तीळ पापडी तयार करताना गुळाचा पाक करताना त्यात ४ ते ५ टेबलस्पून पाणी घालावे म्हणजे गूळ व्यवस्थित वितळून एकजीव होतो. पाक तयार झाल्यानंतर तो वाटीभर पाण्यात टाकून पाहावे. गूळ कडक झाला तर समजावे की पाक तयार आहे. बाकी साखरेची गूळ पापडी तयार करताना जी कृती वापरली तिची पुढे फॉलो करावी.
कुरकुरीत, खुटखुटीत अशी तीळ पापडी खाण्यासाठी तयार आहे.
