उन्हाळा सुरू झाला की घराघरांत वाळवण करण्याची लगबग सुरू होते. चकल्या, सांडगे आणि कुरडई यांच्या गर्दीतही सर्वांचे लक्ष वेधून घेतात ते म्हणजे तांदुळाचे पळी पापड. पांढरे शुभ्र, काचेसारखे पारदर्शक आणि तेलात टाकताच दुप्पट फुलणारे हे पापड म्हणजे जेवणाची खरी शान असतात. विशेष म्हणजे, हे पापड लाटण्याचे कष्ट नसल्यामुळे अतिशय झटपट तयार होतात. पापड करायचे म्हटले की अनेकांना ते लाटण्याचा कंटाळा येतो. पण तांदुळाच्या पिठाचे पळी पापड हा एक उत्तम पर्याय आहे. फक्त पळीने पीठ पसरवून तयार होणारे हे पापड चवीला तर उत्तम लागतातच, पण दिसायलाही अतिशय सुंदर दिसतात(Tandulachya Pithache Pali Papad Recipe).
तांदळाचे पीठ पाण्यांत कालवून केलेले पळी पापड हा महाराष्ट्रातील घराघरांत बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. उन्हाळ्याच्या दिवसात कडक उन्हात वाळवून साठवून ठेवलेले हे पापड वर्षभर कधीही तळून किंवा भाजून खाता येतात. डाळ-भातासोबत किंवा मधल्या वेळेत खाण्यासाठी हे एक उत्तम स्नॅक्स आहे. हलके, कुरकुरीत आणि झटपट तळून खाता येणारे हे पापड जेवणाची चव आणखी वाढवतात. विशेष म्हणजे कमी साहित्यामध्ये आणि सोप्या पद्धतीने हे पळी पापड घरीच तयार करता येतात. त्यामुळे उन्हाळ्यातील वाळवणांमध्ये तांदळाच्या पिठाचे पळी पापड बनवण्याची परंपरा आजही अनेक घरांत जपली जाते. यंदाच्या ऊन्हाळ्यांत (Tandulachya Pithache Pali Papad Kase Karayche) पारंपरिक पद्धतीने तांदळाच्या पिठाचे पळी पापड करण्याची सहजसोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. तांदुळाचे पीठ - ५०० ग्रॅम
२. पाणी - गरजेनुसार
३. जिरं - १ टेबलस्पून
४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
५. मीठ - चवीनुसार
६. पापड खार - १ टेबलस्पून
उन्हाळ्यात किचनमध्ये स्वयंपाक म्हणजे शिक्षा, १० टिप्स- किचन राहील थंड-घामाघुम न होता करा स्वयंपाक..
कृती :-
१. एका मोठ्या पातेल्यात तांदुळाचे पीठ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालून ते चमच्याने कालवून एकजीव करावं. मध्यम पातळसर असे तांदुळाच्या पिठाचे बॅटर तयार करून घ्यावं.
२. दुसऱ्या एका मोठ्या पातेल्यात ८ वाट्या पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावं. या गरम पाण्यात चवीनुसार मीठ, जिरं, पांढरे तीळ, पापड खार घालून सगळे मिश्रण कालवून मीठ पूर्णपणे विरघळवून घ्यावं.
३. पाण्याला एक हलकीशी उकळी आल्यावर त्यात तांदुळाचे भिजवून घेतलेलं पिठाचं बॅटर या मिश्रणात ओतून व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यावं. मिश्रण चमच्याने नीट कालवून एकजीव करावं त्यात गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी.
४. मिश्रण नीट शिजवून घ्यावं. गरज वाटल्यास मिश्रण घट्ट झालं तर गरजेनुसार गरम पाणी घालून ते व्यवस्थित मध्यम कन्सिस्टंन्सीचे करून घ्यावं.
५. मिश्रण नीट शिजलं आहे की नाही ते पाहण्यासाठी किंचित ओला हात मिश्रणावर ठेवून पाहावा. मिश्रण जर हाताला चिकटले नाही तर ते नीट शिजले आहे.
६. तयार मिश्रण किंचित कोमट करावं आणि सुती कापड अंथरून त्यावर पाळीच्या मदतीने या बॅटरचे गोलाकार पापड घालावेत.
७. ऊन्हात ३ ते ४ दिवस किंवा संपूर्णपणे सुकेपर्यंत हे पापड वाळवून घ्यावेत.
तांदुळाच्या पिठाचे मस्त कुरकुरीत वर्षभर टिकणारे पळी पापड खाण्यासाठी तयार आहेत.
