कैरी बाजारात आली रे आली, की सुगरणींना काय बनवू नि काय नको असे होऊन जाते. कैरीची आंबट गोड चव सगळ्यांनाच आवडते. कैरीच्या फोडीला तिखट मीठ लावून खाल्ले तरी ती रुचकरच लागते. तिचा वापर करून बनवलेला चटकदार आणि झणझणीत ठेचा बनवला तर घरचे खुश होतील नक्की! नुसते वाचूनही तोंडाला पाणी सुचले असेल ना? चला तर मग पाहूया कैरी ठेचा रेसेपी!
साहित्य :
एक माध्यम आकाराची किसलेली कैरी
अर्धा वाटी कोथिंबीर
अर्धा वाटी शेंगदाणे
८-१० पाकळ्या लसूण
दोन मोठे चमचे तेल
५-६ मोठ्या तिखट मिरच्या
जिरे, मोहरी, हिंग, मीठ
कृती :
>> मध्यम आचेच्या गरम तव्यावर तेल घालावे आणि त्यात शेंगदाणे खरपूस तळून घ्यावेत.
>> शेंगदाणे लालसर झाले की त्यात जिरे, मोहरी घालावी.
>> फोडणी तडतडू लागली की त्यात पाव चमचा हिंग घालावे.
>> हिरव्या मिरच्या त्याच तेलात शेकून घ्यायच्या.
>> लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर घालून चांगले परतून घ्यायचे.
>> तयार मिश्रणात एक किसलेली कैरी घालावी आणि थोडी परतून घ्यावी.
>> मिश्रण गार झाल्यावर ते खलबत्त्यात किंवा मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर भरड काढावी.
>> कच्च्या कैरीचा चटकदार ठेचा खाण्यासाठी सर्व्ह करावा.