>> सायली वझे पानसे
पियुष म्हणजे अमृत आणि हे पेय म्हणजे एक प्रकारची लस्सीच! त्यात मराठमोळ्या श्रीखंडाचा/आम्रखंडाचा स्वाद. लज्जत वाढवायला जोडीला केशर, वेलची, ड्रायफ्रुटस. हे पेय मी प्रथम डोंबिवली (माझं माहे ) येथील कुलकर्णी ब्रदर्सकडे प्यायले. माझ्या नवऱ्याला तर हे खूपच आवडले. त्यामुळे उन्हाळा सुरु झाला की हमखास करतेच. आम्रखंडही घरीच करते. त्याच आम्रखंडाचे पियुष करते. श्रीखंडाचे पातेले विसळून पियुष करतात, हा पुलंचा विनोद आहे. प्रत्यक्षात मात्र असं नाहीये हं. मी देते तुम्हाला रेसिपी , नक्की करून पहा ,आवडेल याची खात्री आहे !
साहित्य :
१ कप दही १ कप आम्रखंड 2 टेबलस्पून पिठीसाखर १/४ टीस्पून जायफळ पावडर१/४ टीस्पून वेलची पावडरथोड्या केशराच्या काड्या आणि काजू ,बदाम पिस्त्याचे काप वरून सजवण्यासाठी
कृती:
>>ब्लेंडरच्या भांड्यात दही, आम्रखंड, २ टेबलस्पून साखर, वेलची पावडर आणि जायफळ पावडर घालून एकत्र फिरवून घेणे. पियुष तयार! जर पियुष फार घट्ट वाटले तर त्यात १-२ टेबलस्पून दूध घालून फिरवून घेणे.>> अशाच प्रकारे श्रीखंडापासूनही पियुष बनवता येते.>>फ्रिजमध्ये थंड होऊ द्यावे आणि मस्त गारेगार प्यायला द्यावे . प्यायला देताना वरून केशर काजू, बदाम , पिस्ता काप घालून सजवावे.