Join us

दिवाळीत सोनपापडीची होते टिंगलटवाळी, पण सोनपापडी आली कुठून? कुणी केली पहिल्यांदा ही मिठाई..

By चैताली मेहेंदळे | Updated: October 15, 2025 18:30 IST

Sonpapadi is a delicacy during Diwali, but where did Sonpapadi come from? : सोनपापडी नक्की आली कुठून?

भारत अनेक  गोष्टींसाठी जग प्रसिद्ध आहे. त्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणजे भारताची खाद्यसंस्कृती. अनेक पदार्थ आहेत जे फारच वैशिष्ट्यपूर्ण आहेत. त्यांना इतिहास आहे, त्याबद्दल आठवणी आहेत तसेच लोकांच्या मनात त्या पदार्थांना स्थान आहे. असाच एक गोडाचा पदार्थ म्हणजे सोनपापडी. (Sonpapadi is a delicacy during Diwali, but where did Sonpapadi come from?)दिवाळी जवळ आली की सोनपापडीची वटच काही और असते. घरोघरी सोनपापडीचे डबे दिसतात. भेट म्हणून हा पदार्थ देण्याची प्रथा वर्षानुवर्षे सुरु आहे. खास म्हणजे सोनपापडी लोकांची जेवढी आवडती आहे तेवढाच नावडतीही. दिवाळीजवळ आल्यावर सोशल मिडियावरही सोन पापडीचे अनेक मिम्स पाहायला मिळतात. ही सोनपापडी नक्की आली कुठून आणि कशी ? हा विषय मात्र तसा वादात्मकच. 

कणीक, मैदा, साखर, सुकामेवा आदींचा वापर करुन तयार केली जाणारी ही मिठाई फार जुन्या काळापासून खाल्ली जात आहे.  काही जणांचे म्हणणे आहे की, सोन पापडी महाराष्ट्रात सर्वप्रथम केली गेली. तर काही जण म्हणतात, हा उत्तर भारतीय पदार्थ आहे. ज्याचा उगम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश सारख्या ठिकाणहून झाला. सोनपापडीचा संबंध थेट जोडला जातो तो तुर्की आणि पारशी मिठायांशी. पांढर्‍या रंगाची सोनपापडीही मिळते. मात्र मुळात तिचा रंग पिवळसर सोनेरी असल्याने 'सोन' हा शब्द त्यात आला आणि पापडी सारखे खुसखुशीत, जरा कुरकुरीत असल्यामुळे 'पापडी'. त्यामुळे 'सोनपापडी' असे नाव पडले असावे, असे मानले जाते. 

सोनपापडी उत्तर भारतात जास्त खाल्ली जाते. तिथे फक्त मिठाई म्हणून नाही, तर एक खाऊ म्हणून हा पदार्थ विकला जातो. रस्त्यावरही विक्रेते हातात सोनपापडीचे थाळे घेऊन उभे दिसतात. सोनपापडीला सोहन हलवा, सोहन पापडी अशी विविध नावे आहेत. असे मानले जाते ही मिठाई एका पारशी पदार्थासारखी आहे ज्याचे नाव सोहन पाशमीकी आहे. तसेच पतीसा आणि सोन पापडीही सारखेच असतात असाही अनेकांचा दावा आहे.  सोनपापडी सध्या कितीही बदनाम असली तरी दिवाळीच्या दिवसांमध्ये तिची मागणी कमी होत नाही. 

सोनपापडी चवीला छान असते, तसेच सर्वसामान्य लोकांना परवडते. मिठाई हा प्रकार मुळात फार महाग होत चालला आहे, पण उत्सव म्हटल्यावर गोड तर हवेच ना? म्हणून मग ही सोनपापडी घरोघरी दिसत असावी. तसेच सगळीकडे आरामात उपलब्ध होणारा पदार्थ आहे, टिकतेही जास्त काळ. त्यामुळे दिवाळी आणि सोनपापडी हे नाते अतूट आहे.  

English
हिंदी सारांश
Web Title : The sweet mystery: Tracing the origins of the Sonpapdi delicacy.

Web Summary : Sonpapdi, a Diwali staple, has debated origins in Maharashtra or North India, linked to Turkish and Parsi sweets. Despite jokes, it remains popular due to affordability and availability.
टॅग्स :दिवाळी २०२५अन्नभारतीय खाद्यसंस्कृतीसोशल मीडियासोशल व्हायरलइतिहास