आपल्यापैकी काहीजण अनेक प्रकारची व्रतवैकल्य, उपवास करतात. उपवासाला आपण अगदी मोजकेच पदार्थ खाऊ शकतो. यासाठीच, उपवास म्हटलं की आपल्याला साबुदाण्याची खिचडी आणि वडे हे दोनच पदार्थ सगळ्यांत आधी आठवतात. उपवास असला की प्रत्येक घरोघरी साबुदाण्याची खिचडी, वडे असे दोन पदार्थ (Bhuimugache wade Fasting Recipe) हमखास केलेच जातात. परंतु वरचेवर उपवासाला हेच दोन पदार्थ खाऊन काहीवेळा खूप कंटाळा येतो. यासाठीच, आपण उपवासाला साबुदाण्याचे वडे न करता भूईमुगाचे म्हणजेच शेंगदाण्याचे वडे देखील करु शकता. उपवासाच्या अनेक पदार्थांमध्ये आपण शेंगदाण्याचा वापर करतो परंतु कधी शेंगदाण्याचे वडे करुन पाहिले नसतील तर यंदाच्या चैत्र गौरी सणाच्या उपवासाला तुम्ही हा पदार्थ नक्की करून पाहू शकता(Soaked Peanut Fasting Wada).
गावोगावी घरोघरी गौरीची स्थापना केली जाते. छान नैवेद्य दाखवला जातो. चैत्रगौरीची प्रत्येक घरात वेगळी रीत असते. चैत्रगोरीच्या हळदीकुंकवाला अनेक पदार्थ केले जातात. रोजच्या नैवैद्यातही वेगळे पदार्थ असतात. या नैवेद्याच्या पदार्थांमध्ये देखील आपण हा पदार्थ तयार करु शकता. भूईमुगाचे उपवासाचे वडे कसे तयार करायचे याची सोपी रेसिपी पाहूयात. सुप्रसिद्ध मराठमोळे शेफ विष्णू मनोहर यांनी या भूईमुगांच्या वड्यांची रेसिपी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर केली आहे.
साहित्य :-
१. शेंगदाणे - २ कप (पाण्यांत ३ ते ४ तास भिजवलेले)
२. पाणी - गरजेनुसार
३. हिरव्या मिरच्या - ४ ते ५ मिरच्या
४. जिरे - १ टेबसलस्पून
५. लसूण पाकळ्या - ४ ते ५ पाकळ्या
६. आल्याचा तुकडा - छोटा आल्याचा तुकडा
७. उकडलेला बटाटा - १ बटाटा
८. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
९. मीठ - चवीनुसार
१०. तेल - गरजेनुसार
उन्हाळ्यात इडली-डोशाचे पीठ जास्तच आंबते-फसफसते? पीठ आठवडाभर टिकण्यासाठी ‘ही’ पाहा युक्ती...
लिंबू नको नी साखर-मीठही नको, १ सोपी ट्रिक-५ मिनिटांत करा गारेगार लिंबू सरबत...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये शेंगदाणे घेऊन त्यात पुरेसे पाणी घालून ३ ते ४ तास पाण्यांत भिजत ठेवावेत.
२. शेंगदाणे ३ ते ४ तास व्यवस्थित भिजल्यानंतर त्यावरील सालं अगदी सहजपणे निघते. मग या भिजलेल्या शेंगदाण्याची सालं काढून घ्यावीत.
३. आता जर आपल्याकडे पाटा - वरवंटा असेल तर त्याचा वापर करु शकता किंवा मिक्सर वापरु शकता. पाट्यावर शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, जिरे, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या असे सगळे एकत्रित वाटून त्याची जाडसर भरड करून घ्यावी. (भरड करावी एकदम बारीक पेस्ट तयार करु नये.)
४. आता ही एकत्रित वाटून घेतलेली जाडसर भरड एका बाऊलमध्ये घेऊन त्यात उकडलेला बटाटा मॅश करून घालावा.
५. त्यानंतर सगळ्यात शेवटी यात चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. आता सगळे मिश्रण एकजीव करून हाताला तेल लावून हातावर थोडे थोडे पीठ घेत वडे थापून घ्यावेत.
६. गरम तेलात हे वडे खरपुस, सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावेत.
गरमागरम भुईमुगाच्या दाण्यांचे वडे खाण्यासाठी तयार आहेत. दही किंवा चटणीसोबत तुम्ही हे वडे उपवासाला खाण्यासाठी सर्व्ह करु शकतो.