घरात भाजीला काय करायचं हा प्रश्न जेव्हा पडतो, तेव्हा शेवग्याच्या शेंगांची झणझणीत, चमचमीत मसाला भाजी हा बेस्ट पर्याय ठरतो. पौष्टिक असलेल्या शेवग्याच्या शेंगा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वयंपाकात त्यांना विशेष स्थान आहे. शेवग्याच्या शेंगा केवळ चवीलाच अप्रतिम असतात असे नाही, तर त्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहित आहे. पण अनेकदा हॉटेलसारखी तर्री आणि घरची चव यांचा मेळ बसवणं कठीण जातं. अनेकांना शेवग्याची भाजी फक्त साधी किंवा नेहमीसारखीच बनवायची सवय असते. पण योग्य मसाले आणि खास पद्धतीने बनवली तर हीच भाजी झणझणीत, चमचमीत आणि अगदी हॉटेल स्टाईल लागते(Shevgachya Shenganchi Bhaji Recipe).
तिखट - मसालेदार चव, खमंग फोडणी आणि मसाल्यांचा परफेक्ट बॅलन्स यामुळे शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी भाकरी, पोळी किंवा गरम भातासोबत अप्रतिम लागते. रोजच्या जेवणाला वेगळी चव देणारी आणि पौष्टिक असलेली ही रेसिपी घरातील सगळ्यांनाच आवडेल. गावरान पद्धतीचा तो झणझणीतपणा, शेंगांच्या आतपर्यंत (spicy drumstick sabzi) मुरलेला तो मसाला आणि वरून येणारा खमंग सुवास...असा बेत जर ताटात असेल, तर दोन पोळ्या किंवा भाकऱ्या जास्तच जातात. तुम्हालाही घरच्याघरीच लग्नाच्या पंगतीसारखी किंवा अस्सल महाराष्ट्रीयन चवीची चमचमीत शेवग्याची भाजी करायची असेल तर पाहा साधीसोपी रेसिपी...कमी साहित्यात पण अतिशय (shevga shenga masala bhaji recipe) चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगांची मसाला भाजी कशी तयार करायची, जी भाकरी आणि भात या दोन्हीसोबत अगदी फक्कड लागते!
साहित्य :-
१. शेवग्याच्या शेंगा - २५० ग्रॅम (तुकडे करून घेतलेले)
२. हळद - १ टेबलस्पून
३. मीठ - चवीनुसार
४. सुकं खोबरं - १/४ कप
५. आलं - १ इंचाचा छोटा तुकडा
६. लसूण - ६ ते ८ पाकळ्या
७. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
८. तेल - ४ टेबलस्पून
९. मोहरी - १/२ टेबलस्पून
१०. जिरे - १/२ टेबलस्पून
११. हिंग - चिमूटभर
१२. कडीपत्ता - ६ ते ८ पाने
१३. कांदा - १/२ कप (बारीकचिरलेला)
१५. टोमॅटो - १/२ कप (बारीकचिरलेला)
१६. धणेपूड - १ टेबलस्पून
१७. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
१८. गरम मसाला - १/२ टेबलस्पून
१९. कांदा लसूण मसाला - १ ते २ टेबलस्पून
२०. जाडसर शेंगदाणा कूट - २ टेबलस्पून
बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रोज खा १ वाटी 'हा' पदार्थ, स्मार्ट डाएट, हेल्दी हार्ट...
तळणीचे पदार्थ होणार नाही तेलकट! शेफ संजीव कपूर सांगतात १ ट्रिक, तेल न पिता होतील कुरकुरीत...
कृती :-
१. एका मोठ्या भांड्यात पाणी ओतून ते व्यवस्थित गरम करा. या गरम पाण्यात थोडं मीठ आणि हळद घालावी. मग तुकडे केलेल्या शेवग्याच्या शेंगा घालाव्यात. या शेंगा पाण्यांत उकडवून घ्याव्यात.
२. मिक्सरच्या भांड्यात सुकं खोबरं, लसूण पाकळ्या, आलं, कोथिंबीर एकत्रित घालून त्याचे वाटणं तयार करून घ्यावे.
३. मोठ्या कढईत तेल घेऊन त्यात फोडणीसाठी जिरे, मोहरी, हिंग घालावं. मग कडीपत्ता, बारीक चिरलेला टोमॅटो, कांदा घालावा. त्यानंतर याच मिश्रणात मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं वाटणं घालावं.
४. त्यानंतर या वाटणाच्या मिश्रणात हळद, धणेपूड, लाल तिखट मसाला, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, जाडसर शेंगदाणा कूट घालावे. २ ते ३ मिनिटे हे सगळे जिन्नस तेलात परतवून घ्यावे. मग यात गरजेनुसार पाणी घालून ३ ते ४ मिनिटे व्यवस्थित शिजवून घ्यावे. झाकण ठेवून एक वाफ काढावी.
५. सगळ्यात शेवटी यात उकडवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.
शेवग्याच्या शेंगांची झणझणीत, चमचमीत मसाला भाजी खाण्यासाठी तयार आहे. ही भाजी आपण गरमागरम चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता.
