उन्हाळ्याची चाहूल लागली की घरोघरी वाळवणाला सुरुवात होते. त्यातही खमंग, कुरकुरीत आणि जिभेला चव देणारे सांडगे म्हणजे तर सर्वांचाच आवडीचा पदार्थ. डाळीचे सांडगे असोत किंवा गव्हाचे, वर्षभर टिकणारा साठा घरात असेल तर पाहुणे आल्यावर किंवा भाजीला काही नसेल तर पटकन भाजी करता येते.(Unhali Valvan Recipe) पण अनेकदा मेहनत करूनही सांडगे जाळी धरतात किंवा त्याला बुरशी लागते. जर आपल्याकडे ऊन नसेल किंवा हवामान दमट असेल, तरीही घाबरण्याचे कारण नाही.(Sandge Tikavnyachya Tips) आपण अशा काही ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे १ किलो डाळीचे सांडगे वर्षभर अगदी ताज्या चवीचे टिकतील. पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. (Gharaguti Sandge recipe)
साहित्य उडीद डाळ - २ वाटी मूग डाळ- १ वाटी हरभरा डाळ- १ वाटी कोहळा- १ किलो लसूण- १०० ग्रॅम जिरे- 5 टीस्पून बेडगी मिरची पावडर- ४ टीस्पून धणेपूड- ५-६ टेबलस्पून मिरपूड- १ टीस्पून हिंग- १ टीस्पून मीठ- चवीनुसारचिरलेली कोथिंबीर- १/२ वाटीपांढरे तीळ- ४-५ टीस्पून
कृती
1. सर्व डाळी ओल्या फडक्याने पुसून स्वच्छ करा. त्यानंतर डाळींमधील ओलावा पूर्णपणे जाण्यासाठी त्या १५-२० मिनिटे फॅनखाली सुकवून घ्या.
2. प्रत्येक डाळ मिक्सरमध्ये जाडसर दळून घ्या. एकदम पिठासारखी बारीक करू नका. या सर्व डाळी एकत्र करून गिरणीतूनही जाडसर दळून आणू शकता. दळलेली डाळ एका मोठ्या भांड्यात काढून घ्या.
3. कोहळा धुवून, सोलून घ्या आणि आतील बिया काढून टाका. त्यानंतर कोहळा किसून घ्या. हा किस एका चाळणीत ठेवा जेणेकरून त्यातील जास्तीचे पाणी निथळून जाईल. हे पाणी फेकून देऊ नका.
4. आता लसूण, जिरे आणि मिरची पावडर थोड्या पाण्यासोबत मिक्सरमध्ये वाटून घ्या.
5. दळलेल्या डाळींमध्ये हे वाटण, किसलेला कोहळा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, मिरेपूड, धणेपू़ड, हिंग, तीळ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व नीट मिक्स करा.
6. मिश्रण घट्ट वाटल्यास आधी काढून ठेवलेले कोहळ्याचे पाणी आवश्यकतेनुसार घालून बॅटर तयार करा. हे मिश्रण ओल्या फडक्याने झाकून ४ ते ५ तास किंवा रात्रभर मुरण्यासाठी ठेवा.
7. मिश्रण मुरल्यानंतर पुन्हा एकदा चांगले मिक्स करा. त्यानंतर एका स्वच्छ सुती कापडावर किंवा प्लास्टिक पेपरवर छोटे-छोटे सांडगे घालून घ्या.
8. सांडगे २-३ दिवस कडक उन्हात वाळवा. जर ऊन नसेल, तर हवेशीर सावलीच्या ठिकाणी ३ दिवस वाळवा आणि त्यानंतर किमान २ तास कडक उन्हात ठेवा.
9. सांडगे पूर्णपणे वाळल्यावर एका एअर-टाईट डब्यात भरून ठेवा. हे सांडगे वर्षभर अगदी छान टिकतात.