दुपारचं साधं वरण-भात असो किंवा रात्रीची गरमागरम खिचडी, जोपर्यंत ताटाच्या कोपऱ्यात काहीतरी कुरकुरीत नसतं, तोपर्यंत जेवणाची मजाच येत नाही. उन्हाळ्याची चाहूल लागली की प्रत्येक घराच्या गच्चीवर किंवा अंगणात वाळवणाची लगबग सुरू होते. पापड, कुरडयांच्या गर्दीत सर्वात जास्त लक्ष वेधून घेणारा आणि वाळताना आपल्या खमंग वासाने संपूर्ण घर दरवळून टाकणारा पदार्थ म्हणजे 'सांडगी मिरची'! पारंपरिक पद्धतीने तयार केली जाणारी सांडगी मिरची ही केवळ चवीसाठीच नाही तर जेवणाची लज्जत वाढवणारा खास पदार्थ... मेथी, धणे, जिरे आणि मसाल्यांचे सार भरलेली ही मिरची जेव्हा कडक उन्हात वाळवून तयार होते, तेव्हा तिचे रूपच पालटते(How To Make Sandagi Mirchi At Home).
तेलात तळल्यानंतर खमंग सुटणारा वास आणि तिचा तो चटपटीत तिखट-आंबट स्वाद जिभेवर रेंगाळत राहतो. ही सांडगी मिरची उन्हांत वाळवल्यानंतर वर्षभरासाठी साठवून ठेवता येते. आजही अनेकजण बाजारात मिळणाऱ्या पाकीटबंद मिरच्यांपेक्षा आजी-आईच्या हाताने तयार केलेल्या, पारंपरिक मसाल्यांनी भरलेल्या सांडगी मिरचीलाच पसंती देतात. आज बाजारात तयार मिरच्यांची पाकीटं मिळतात, पण आई - आजीच्या हाताच्या मसाल्याची ती चव आणि उन्हात वाळलेल्या मिरचीचा तो घरगुती खमंगपणा (Sandagi Mirchi Recipe) काही केल्या विसरता येत नाही. मग, तोच पारंपरिक स्वाद पुन्हा एकदा अनुभवण्यासाठी ही घ्या सांडगी मिरचीची खास रेसिपी...
साहित्य :-
१. धणे - ५ ते ६ टेबलस्पून
२. पिवळी मोहरी - २ टेबलस्पून
३. जिरे - २ टेबलस्पून
४. मेथी दाणे - १ टेबलस्पून
५. मीठ - चवीनुसार
६. हळद - १/२ टेबलस्पून
७. हिंग - १ टेबलस्पून
८. हिरव्या मिरच्या - २० ते २५ मिरच्या (जाड आणि आकाराने छोट्या)
९. लिंबाचा रस - ४ ते ५ टेबलस्पून
फक्त एका दिवसात कडधान्यांना येतील लांब मोड! ८ खास टिप्स - येणार नाही चिकट, कुबट दुर्गंधी...
कृती :-
१. सगळ्यांत आधी एका मोठ्या पॅनमध्ये धणे, पिवळी मोहरी दाणे, जिरे, मेथी दाणे असे सगळे जिन्नस एक - एक करुन व्यवस्थित भाजून घ्यावे. त्यानंतर हे सर्व जिन्नस एकत्रित करुन पुन्हा एकदा २ ते ३ सेकंदांसाठी पुन्हा एकदा हलकेच भाजून घ्यावेत.
२. त्यानंतर भाजून घेतलेले हे सगळे जिन्नस एका मोठ्या डिशमध्ये काढून थोडे थंड करून घ्यावेत. थंड झाल्यावर हे सगळे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात ओतून त्यात चवीनुसार मीठ, हळद, हिंग घालावे. मग हे मिश्रण मिक्सरमध्ये फिरवून त्याची थोडी जाडसर अशी भरड तयार करून घ्यावी.
३. मिक्सरमध्ये वाटून तयार केलेली ही पूड एका डिशमध्ये काढून त्यात लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे.
४. आता हिरव्या मिरच्यांच्याबरोबर मधोमध सुरीच्या मदतीने हलकीशी उभी चीर पाडून घ्यावी. तयार मसाला या मिरच्यांमध्ये दाबून भरुन घ्यावा.
५. या स्टफिंग केलेल्या मिरच्या एका ताटात ठेवून उन्हांत ३ ते ४ दिवस व्यवस्थित वाळवून घ्याव्यात. मिरच्या वाळून पूर्णपणे कुरकुरीत होईपर्यंत वाळवून घ्याव्यात.
वाळवणातील सांडगी मिरची तयार आहे. या मिरच्या हवाबंद डब्यांत भरुन आपण वर्षभरासाठी त्या स्टोअर करुन ठेवू शकता.
