Join us  

लालचुटूक गाजर, हिवाळ्यात हलवा करा नाहीतर सलाड खा! सुंदर डोळे, हेल्दी हार्ट, ९ फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2021 5:34 PM

आरोग्यासाठी उपयुक्त भाज्यांचा आहारात जरुर समावेश करा, तब्येत राहील ठणठणीत

ठळक मुद्देगाजर खा, तंदुरुस्त राहा...थंडीत सहज मिळणारी गाजरे भरपूर खायला हवीत हलवा नाहीतर सलाड, कोशिंबिर नाहीतर ज्यूस गाजर खायलाच हवे

थंडीचा काळ म्हणजे तब्येत कमावण्याचा काळ. या काळात बाजारात उपलब्ध असणाऱ्या भाज्या आणि फळे खाऊन तब्येत तुंदुरुस्त करण्याची संधी असते. या संधीचा फायदा घ्या आणि धष्टपुष्ट व्हा. थंडी पडायला सुरुवात झाली की बाजारात छान कोवळी, गोड गाजरं दिसायला सुरुवात होते. मग गाजराचा हलवा, गाजराची वडी, कोशिंबीर, सूप, तर कधी सलाड म्हणून जेवणात गाजराचा समावेश होतो. लालबुंद गाजर दिसायला जितके छान दिसतेत तितकेच त्याचे आरोग्यासाठी फायदे असतात. डोळ्यांपासून ते हृदयापर्यंत अनेक अवयवांसाठी गाजर खाणे उपयुक्त असते. असंख्य उपयुक्त घटक असलेले गाजर शरीराचे उत्तम पोषण करते आणि प्रतिकारशक्ती वाढविण्यासही उपयोगी ठरते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत उपलब्ध भाज्या आणि फळे खाऊन तंदुरुस्त व्हा. पाहूयात गाजर खाण्याचे फायदे 

(Image : Google)

१. एरवी बाजारात मिळणाऱ्या गाजरांना आपण चायनिज गाजर म्हणून ओळखतो. ही गाजरे केशरी रंगाची असतात आणि त्यांना विशेष चवही नसते. मात्र आता थंडीच्या दिवसांत बाजारात दिसणारी गाजरे ही आपल्या मातीत पिकणारी आणि लाल रंगाची अतिशय गोड गाजरे असतात. या गाजरांमध्ये अँटीऑक्सिडंटसचे प्रमाण भरपूर असते त्यामुळे ती आरोग्यासाठी अतिशय पोषक असतात.

२. गाजर डायबिटीस असणाऱ्यांसाठीही अतिशय उपयुक्त असते. गाजरात मोठ्या प्रमाणात पाणी आणि फायबर असते, त्यामुळे गाजर खाल्ले की पोट भरल्यासारखे वाटते आणि तुम्ही साहजिकच कमी खाता. त्यामुळे शरीराला आवश्यक नसलेल्या जास्तीच्या कॅलरीज घेतल्या जात नाहीत.

३. बीटा केरोटीन आणि व्हिटॅमिन ए चा एक चांगला स्रोत असलेले गाजर खाल्ल्याने शरीरातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४. गाजरामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन के जास्त प्रमाणात असते. हे दोन्हीही घटक हाडांची ताकद चांगली राहण्यासाठी उपयुक्त असतात. त्यामुळे तुम्हाला हाडांशी निगडित त्रास असतील तर नियमित गाजर खायला हवे. यामुळे हाडे मजबूत होण्यास मदत होते. 

५. गाजरातील अँटीऑक्सिडंटस अतिशय उपयुक्त असून हृदयरोगापासून कॅन्सरपर्यंतच्या गंभीर आजारांचा धोका कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. त्यामुळे या लालबुंद गाजरांचा थंडीच्या दिवसांत आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

६. गाजराचे नियमितपणे योग्य प्रमाणात सेवन केल्यास डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.

(Image : Google)

७. यामध्ये असणारे पोटॅशियम रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. सध्या रक्तदाब ही अतिशय सामान्य समस्या झाली असून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी गाजराचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

८. गाजरातील फायबर पचनक्रिया सुरळीत करण्यास मदत करतात. त्यामुळे पोटाशी निगडित तक्रारी दूर होण्यास मदत होते. 

९. कोलेस्टेरॉल ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. आहाराच्या चुकीच्या पद्धतींमुळे कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. पण गाजराच्या सेवनाने कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यास मदत होते.  

 

 

 

टॅग्स :अन्नहेल्थ टिप्सभाज्या