कोकण म्हटलं की डोळ्यासमोर येतात ती नारळ-पोफळीची झाडं, अथांग समुद्र किनारा आणि जिभेवर रेंगाळणारी अस्सल पारंपरिक कोकणी चव! कोकणातील प्रत्येक सण - समारंभ आणि पाहुणचाराची सुरुवात होते ती येथील खास आणि अप्रतिम पदार्थांनी. असाच एक पारंपरिक, गोड आणि जिभेवर ठेवताच विरघळून जाणारा पदार्थ म्हणजे 'खापरोळी'(Kokani Ras Khaproli Recipe).
खापरोळी म्हणजे एक प्रकारचा डोशा सारखाच मऊ लुसलुशीत पदार्थ, जो ओल्या नारळाच्या गोड आणि सुगंधी दुधात भिजवून खाल्ला जातो. दिसायला अगदी साधी वाटणारी ही खापरोळी चवीला इतकी लाजवाब असते की, एकदा खाल्ल्यावर तिची चव विसरणे शक्य नाहीच! हा पदार्थ बनवण्यासाठी काही खास पद्धती आणि योग्य व अचूक प्रमाणात साहित्य लागते, ज्यामुळे त्याला तीच अस्सल पारंपरिक चव येते. मऊ, लुसलुशीत ‘खापरोळी’ हा अगदी मनाला भुरळ पाडणारा कोकणी पारंपरिक पदार्थ आहे. मंद आचेवर हळूवार, खरपूस भाजलेली, बाहेरून खमंग आणि आतून अगदी मऊ - मुलायम असा हा पदार्थ आजही प्रत्येक कोकणी घरात आवडीने आणि मोठ्या हौसेन केला जातो. कोकणच्या या खास, लुसलुशीत आणि पारंपरिक खापरोळीची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. तांदूळ - १ कप
२. पांढरी उडीद डाळ - १/२ कप
३. चणा डाळ - १/२ कप
४. मेथी दाणे - १ टेबलस्पून
५. हळद - १/२ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. पाणी - गरजेनुसार
८. तेल - ३ ते ४ टेबलस्पून
९. साजूक तूप - ३ ते ४ टेबलस्पून
१०. नारळाचे दूध - २ ते ३ कप
११. गूळ - चवीनुसार
१२. जायफळ पावडर - १/२ टेबलस्पून
१३. वेलची पूड - १/२ टेबलस्पून
विदर्भ स्पेशल! तुरीच्या दाण्यांचा ‘सोले भात'! अस्सल पारंपरिक वैदर्भिय चव, हिवाळ्यातला खास बेत...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये तांदूळ, पांढरी उडीद डाळ, चणा डाळ, मेथी दाणे असे सगळे जिन्नस एकत्रित करून पाण्याने ३ ते ४ वेळा स्वच्छ धुवून घ्यावेत.
२. मग या मिश्रणात पाणी घालून किमान ६ ते ७ तास तसेच पाण्यांत भिजवून ठेवावे.
३. ६ ते ७ तासानंतर यातील पाणी काढून सगळे मिश्रण मिक्सरमध्ये घालून किंचित पाणी घालून डोशाच्या पिठाप्रमाणेच मिक्सरमध्ये व्यवस्थित वाटून घ्यावे.
फ्रीजमध्ये ठेवलेले दही किती दिवस ताजे राहते? 'या'पेक्षा जास्त दिवस ठेवले तर हमखास बिघडेल पोट...
४. मिक्सरमधील तयार बॅटर भांड्यात काढून ते ८ ते ९ तासांसाठी झाकून ठेवून डोशाच्या पिठाप्रमाणेच आंबवून घ्यावे.
५. दुसऱ्या दिवशी या आंबवलेल्या पिठात थोडी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडे पाणी घालून डोशाच्या पिठाप्रमाणेच कंन्सिस्टंसीचे बॅटर तयार करून घ्यावे.
६. तव्याला तेल लावून त्यावर हे तयार बॅटर गोलाकार पद्धतीने डोशाप्रमाणेच घालून, खापरोळी तयार करून घ्यावी.
७. दुसऱ्या बाऊलमध्ये नारळाचे दूध, गूळ, जायफळ आणि वेलची पूड घालावी हे सगळे मिश्रण गूळ संपूर्णपणे विरघळेपर्यंत हलवून घ्यावे.
खापरोळी खाण्यासाठी तयार आहे. एका डिशमध्ये गरमागरम खापरोळी घेऊन त्यावर गोड चवीचे नारळाचे दूध ओतावे. २ ते ४ मिनिटे खापरोळी त्या नारळाच्या दुधात भिजू द्यावी. नारळाचे दूध शोषून घेतल्याने खापरोळीची चव अधिकच वाढते.
