हिवाळा सुरू झाला की बाजारात काही खास पदार्थ मोठ्या प्रमाणावर विकले जातात, त्यापैकीच एक म्हणजे कच्ची ओली हळद (Raw Turmeric). फक्त सौंदर्य आणि उपचारांसाठीच नाही, तर ही ताजी, ओली हळद थंडीच्या दिवसांत शरीराला उष्णता आणि रोगप्रतिकारशक्ती (Immunity) देण्यासाठी एक नैसर्गिक टॉनिक ठरते. हिवाळा सुरू झाला की बाजारात कच्ची, ओलसर आणि सुगंधी हळद सहज विकत मिळते. औषधी गुणधर्मांनीयुक्त अशी ओली हळद केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर चवीला देखील अप्रतिम असते(rajasthani style haldi ki sabji recipe).
राजस्थानच्या पारंपरिक स्वयंपाकात ओल्या हळदीचा खास वापर केला जातो. राजस्थानमध्ये एक अत्यंत पारंपरिक, चविष्ट अशी खास भाजी बनवली जाते, ती म्हणजे कच्च्या ओल्या हळदीची भाजी... चमचमीत मसाल्यांचा वापर, देसी तूप आणि खास राजस्थानी फोडणीमुळे या भाजीला एक वेगळीच चव येते. साध्या साहित्यांचा वापर करून तयार होणारी ही पारंपरिक भाजी चवीसोबतच आरोग्यदृष्ट्याही फायदेशीर ठरते. हिवाळ्यात हमखास करून पाहावी अशी कच्च्या ओल्या हळदीची राजस्थानी स्टाईल (kachchi haldi ki sabji) चमचमीत भाजी कशी तयार करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. दही - १ कप
२. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
३. धणेपूड - १ टेबलस्पून
४. साजूक तूप - १ टेबलस्पून
५. जिरे - १ टेबलस्पून
६. तमालपत्र - १
७. आलं - लसूण - १ टेबलस्पून (बारीक चिरलेलं)
८. हिरव्या मिरच्या - २ (बारीक चिरलेल्या)
९. ओल्या हळदीचा किस - १ कप
१०. टोमॅटो प्युरी - १ कप
११. मटार दाणे - १/२ कप
१२. काजू - ३ ते ६
१४. मीठ - चवीनुसार
ताज्या हिरव्यागार हिवाळी मिरचीचं इन्स्टंट लोणचं,असं तोंडीलावणं की म्हणाल भाजी नको मिरची वाढ!
कृती :-
१. एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यात चवीनुसार लाल तिखट मसाला आणि धणेपूड घालूंन एकत्रित कालवून पेस्ट तयार करून घ्यावी.
२. एका भांडयात थोडे साजूक तूप घेऊन त्यात जिरे, तमालपत्र, बारीक चिरलेलं आलं - लसूण, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालाव्यात.
३. फोडणी खमंग तयार झाल्यावर त्यात किसलेली ओली हळद घालावी, साजूक तुपात ७ ते १० मिनिटे व्यवस्थित परतवून घ्यावे.
४. मग यात टोमॅटो प्युरी आणि मटार दाणे घालावेत.
५. त्यानंतर या भाजीत तयार केलेली दह्याची पेस्ट घालून सगळे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे.
६. सगळ्यात शेवटी यात वरून काजू आणि चवीनुसार मीठ घालून भाजी चमच्याने हलवून कालवून घ्यावे.
७. भाजीवर झाकण ठेवून मंद आचेवर हलकीशी १ वाफ काढून घ्यावी.
हिवाळ्यात मिळणाऱ्या कच्च्या ओल्या हळदीची राजस्थानी स्टाईल चमचमीत, पारंपरिक भाजी खाण्यासाठी तयार आहे. चपाती किंवा भाकरीसोबत ही चविष्ट भाजी खायला अधिकच टेस्टी लागते. यंदाच्या हिवाळयात कच्च्या ओल्या हळदीची भाजी आणि गरमागरम भाकरीचा बेत नक्की करून पाहा.
