हल्ली प्रत्येक पदार्थामधली भेसळ, त्यात केलेल्या रसायनांचा वापर एवढा वाढला आहे की त्यातून शुद्ध पदार्थांची पारख करणं अवघड झालं आहे. फळंही त्याला अपवाद नाहीत. केळी, आंबा यासारखी फळं सर्रास कार्बाईडमध्ये पिकवली जातात तर सफरचंद चकचकीत दिसावं म्हणून त्याला मेण आणि इतर केमिकल्स लावले जातात. अनेकजण सफरचंद पाण्याखाली धरतात, कपड्याने अलगद पुसतात आणि ते तसंच खातात. पण यामुळे त्यावर लावलेले पदार्थ पुर्णपणे निघत नाहीत. ते सालासकट आपल्या पोटात जातात. हे पदार्थ जर वारंवार आपल्या पोटात गेले तर त्यामुळे सफरचंद खाऊन फायदे होण्यापेक्षा तोटेच जास्त होऊ शकतात. म्हणून सफरचंद धुताना पुढे सांगितलेल्या काही गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे.(how to wash apple to remove wax and chemicals on it?)
सफरचंदावरचं मेण, केमिकल्स काढून टाकण्यासाठी उपाय
१. सफरचंद बाजारातून घरी आणल्यानंतर ते आधी एखादा मिनिट कोमट पाण्यामध्ये भिजत घाला. त्यानंतर एखादा मऊ ब्रिसल्स असणारा ब्रश घ्या आणि हलक्या हाताने तो सफरचंदावर घासा. यानंतर पुन्हा कोमट पाण्याने सफरचंद धुवून घ्या आणि ते कपड्याने पुसून काढा.
२. दुसरा उपाय करण्यासाठी लिंबाचा रस आणि बेकिंग सोडा यांचं एक मिश्रण तयार करा. सफरचंद धुवून घ्या. त्यानंतर त्यावर बेकिंग सोडा आणि लिंबाच्या रसाची पेस्ट लावा. हातानेच सफरचंद व्यवस्थित चोळा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
३. सफरचंद १० ते १५ सेकंदासाठी गरम पाण्यामध्ये टाका. त्या पाण्यामध्ये थोडं मीठ आणि थोडा बेकिंग सोडा घाला. यानंतर ब्रशने सफरचंद घासून घ्या आणि नंतर ते कपड्याने स्वच्छ पुसून घ्या. त्यावरचं मेण आणि बाकीची घाण, केमिकल्स पुर्णपणे निघून जातील.
४. वरीलपैकी जो उपाय सोपा वाटेल तो तुम्ही करू शकता. पण जर यापैकी काहीच करायचं नसेल तर सालं काढून सफरचंद खाणं कधीही चांगलं. विशेषत: लहान मुलांना सालं काढूनच सफरचंद खायला दिलं पाहिजे.
