'ढोकळा' हा गुजराथी पदार्थ असला तरी, संपूर्ण देशभरात तो मोठ्या आवडीने खाल्ला जातो. एरवी आपण शक्यतो बेसनाचा पिवळाधम्मक खमण ढोकळा खातो. पण जर तुम्हाला अगदी झटपट, कमी तेलकट आणि पौष्टिक ढोकळा तयार करायचा असेल, तर 'पोह्याचा ढोकळा' हा एक उत्तम पदार्थ आहे. पोह्याचा वापर केल्यामुळे हा ढोकळा हलका आणि पचायला सोपा होतो. इतकंच नाही, तर तो नेहमीच्या खमंग ढोकळ्याप्रमाणेच एकदम मऊ आणि स्पॉन्जी होतो. खास गोष्ट म्हणजे, यासाठी तुम्हालापीठ आंबवण्याची जास्त वाट पाहावी लागत नाही, त्यामुळे ऐनवेळी नाश्ता किंवा मुलांना डब्यासाठी देण्यासाठी हा ढोकळा अगदी कमी वेळात तयार होतो. पारंपरिक गुजराथी ढोकळ्यासारखाच हा ढोकळा असतो, पण यात बेसनाऐवजी पोह्यांचा वापर केला जातो, त्यामुळे तो अधिक पौष्टिक, हलका आणि पचायला सोपा होतो(Poha Dhokla Recipe )
पोह्यात कार्बोहायड्रेट, फायबर आणि आयर्नचं प्रमाण जास्त असल्यामुळे हा पदार्थ मुलं, मोठे आणि वयोवृद्ध सगळ्यांसाठीच योग्य ठरतो. शिवाय यात तेलाचं प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी ठेवणाऱ्यांसाठीही हा हेल्दी पर्याय आहे. हा ढोकळा केवळ नाश्त्याला नाही, तर संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी, टिफिनसाठी किंवा पाहुण्यांसाठी स्पेशल डिश म्हणूनही सर्व्ह करता येतो. वरून मोहरी, कडीपत्ता, आणि हिरव्या मिरच्यांची फोडणी देऊन सर्व्ह केल्यावर त्याचा सुवास आणि चव दोन्हीही अफलातून लागतात. अगदी (how to make poha dhokla at home) सोप्या पद्धतीने, जाळीदार आणि चविष्ट पोह्याचा ढोकळा कसा तयार करायचा, याची संपूर्ण रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. पोहे - १ कप
२. बारीक रवा - १ कप
३. दही - १ कप
४. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या
५. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
६. कडीपत्त्याची पाने - ६ ते ७ पाने
७. आलं - १ छोटा तुकडा
८. मीठ - १ टेबलस्पून
९. इनो - १ छोटं पाकीट
१०. तेल - २ टेबलस्पून
११. मोहरी - २ टेबलस्पून
१२. हिंग - १/२ टेबलस्पून
कृती :-
१. पोहे मिक्सर मधून फिरवून त्याचे बारीक पीठ तयार करून घ्यावे.
२. बारीक केलेले पोह्याचे पीठ, बारीक रवा आणि दही एकत्रित मिक्स करून घ्यावे.
३. मिक्स केलेले मिश्रण दहा ते पंधरा मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, आलं, इनो पावडर घालून थोडे पाणी घालून मिश्रण फेटून घ्यावे.
उडपी हॉटेलात मिळते तसे करा इडली-डोसा पीठ, ७ स्टेप्स- इडली कापसासारखी आणि डोसा कुरकुरीत...
ना भाजणीची झंझट, ना चकली मऊ पडण्याचे टेंन्शन! करा कुरकुरीत बटर चकली - होईल लगेच फस्त...
४. प्लेटला तेल लावून त्यात फेटलेले मिश्रण घाला. उकड पात्रात पाणी घालून गरम करून प्लेटमध्ये भरलेले मिश्रण पंधरा मिनिटे शिजवून घ्यावे.
५. गॅसवर फोडणी पात्रात तेल घालून त्यात मोहरी, हिंग व कडीपत्ता घालून फोडणी तयार करून शिजवलेल्या ढोकळ्यावर ओतावी. आवडतील त्या आकारात सुरीने ढोकळा कापून वरून कोथिंबीर भुरभुरवून घालावी.
पोहा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे, गरमागरम ढोकळा हिरव्या चटणी सोबत खायला अधिकच चविष्ट लागतो.