महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरांत खिचडी मोठ्या आवडीने खाल्ली जाते. खिचडी हा असा पदार्थ आहे की जो, अगदी कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चवीला अप्रतिम लागतो. कधी स्वयंपाक करायचा कंटाळा आला किंवा भूक लागली म्हणून झटपट करता येईल असा पदार्थ म्हणजे खिचडी... खिचडी पदार्थ एक असला तरी ती तयार करण्याची पद्धत प्रत्येकाची वेगवेगळी असते.. प्रत्येक भागानुसार खिचडी तयार करण्याची रेसिपी बदलत असते, असाच खिचडीचा एक खास झक्कास प्रकार म्हणजे परभणी स्पेशल 'कच्च्या फोडणीची खिचडी'! मराठवाड्याच्या खाद्यसंस्कृतीत अनेक चविष्ट आणि पारंपरिक पदार्थ आहेत, ही कच्च्या फोडणीची खिचडी ही त्यापैकीच एक... परभणीची कच्च्या फोडणीची खिचडी ही चव आणि सुगंध दोन्हींसाठी खास ओळखली जाते(Parbhani Style Kachhya Fodnichi Khichdi Recipe).
या खिचडीची खासियत म्हणजे ती पारंपरिक पद्धतीने तयार केली जाते, ज्यात फोडणी आधी दिली जाते त्यामुळे तिची चव अधिक रुचकर आणि सुगंधी लागते. सामान्यतः आपण खिचडी करताना भात आणि डाळीच्या मिश्रणाला उकडून किंवा शिजवून नंतर फोडणी देतो, पण परभणीची ही विशिष्ट खिचडी तयार करण्याची पद्धत अगदी निराळी आणि खूपच सोपी आहे. यात सर्वात आधी खमंग अशी कच्च्या मसाल्यांची फोडणी दिली जाते. कच्च्या फोडणीमुळे ही खिचडी फक्त चविष्टच नाही, तर पचायला हलकी आणि पोषक देखील होते. विशेषतः थंडीच्या दिवसांत हा पदार्थ अगदी कमी वेळेत तयार होतो आणि आपली भूक भागवतो. परभणीची ही पारंपरिक आणि तोंडाला पाणी आणणारी 'कच्च्या फोडणीची खिचडी' कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. पाणी - ४ कप
२. हळद - १/२ टेबलस्पून
३. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
४. धणेपूड - १ टेबलस्पून
५. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
६. मीठ - चवीनुसार
७. तांदुळ - १ कप (भिजवून घेतलेला तांदूळ)
८. हिरवी सालाची मुगाची डाळ - १ कप (भिजवून घेतलेली डाळ)
९. आलं - लसूण - हिरव्या मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून
१०. कांदा - १ कप (उभा लांब चिरलेला)
११. गाजर - १/२ कप (छोटे तुकडे केलेले)
१२. फ्लॉवर - १/२ कप (छोटे तुकडे केलेले)
१३. टोमटो - १/२ कप (छोटे तुकडे केलेले)
१४. दही - २ टेबलस्पून
१५. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१६. तेल - १ टेबलस्पून
कृती :-
१. एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे, पाण्यात हलकीशी उकळी काढून घ्यावी.
२. पाण्याला उकळी आल्यावर त्यात हळद, लाल तिखट मसाला, धणेपूड, जिरेपूड व चवीनुसार मीठ घालावे. मग यात पाण्यांत भिजवून घेतलेला तांदूळ आणि भिजवलेली सालीची हिरवी मूग डाळ घालावी.
३. त्यानंतर आलं, लसूण , हिरव्या मिरच्या खलबत्त्यात ठेचून त्याची भरड करावी किंवा पेस्ट देखील करु शकता. ही तयार पेस्ट खिचडीत घालावी.
४. मग या मिश्रणात उभा चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, फ्लॉवर, गाजराचे तुकडे घालावेत. (आपल्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकता). या भाज्यांसोबतच थोडे दही देखील घालावे.
५. सगळ्यात शेवटी यात बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल घालून सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे.
६. भांड्यावर झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवावा आणि वाफेवर खिचडी व्यवस्थित शिजवून घ्यावी.
परभणी स्पेशल कच्च्या फोडणीची मस्त चमचमीत, झणझणीत खिचडी खाण्यासाठी तयार आहे. गरम खिचडीवर आपल्या आवडी प्रमाणे साजूक तूपाची धार सोडून खाण्याने खिचडीची चव दुपटीने वाढते.
