नवरात्रीत उपवास आणि पूजा मनोभावे केली जाते. या दिवसात अनेकांचे नऊ दिवस उपवास असतात. त्यामुळे पौष्टिक, हलके खाण्याची संधी मिळते. उपवास म्हटलं की, हमखास साबुदाणा खाल्ला जातो. पण साबुदाणा भिजवण्यासाठी अधिक वेळ लागतो. अनेकदा साबुदाणा वडे तेलात जाऊन फुटतात किंवा कच्चे राहतात. ज्यामुळे आपण ते बनवण्याच्या भानगडीत पडत नाही. नवरात्रीत काही सोप्या ट्रिक्स वापरून तुम्ही साबुदाणा वड्याला कुरकुरीत बनवू शकता आणि वेळेची बचतही करू शकता.
पण अनेकदा आपण साबुदाणा भिजवायला विसरतो. जर इन्स्टंट वडे बनवायचे असतील तर या काही सोप्या टिप्स लक्षात ठेवा. साबुदाणा ही नैसर्गिक ऊर्जा देणारी पदार्थ असून उपवासातला सुपरस्टार आहे. हे शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट्स देते. साबुदाणा न भिजवता कुरकुरीत वडा कसा करायचा पाहूया.
साहित्य
उकडलेले बटाटे- ४
साबुदाणा पावडर - १ वाटी
शेंगदाणे पावडर - १ वाटी
हिरवी मिरची - ४
जिरे - १ चमचा
काळे मीठ - चवीनुसार
कोथिंबीर -
लिंबाचा रस - (हवे असल्यास)
कृती
1. सगळ्यात आधी बटाटे उकडून त्याचे साल काढून खिसून घ्या. आता शेंगदाणे भाजून त्याची पावडर करा. यानंतर किसलेल्या बटाट्यामध्ये शेंगदाणे पावडर, साबुदाणा पावडर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरे, काळे मीठ, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून पीठ मळून घ्या.
2. आता पीठाचे छोटे गोळे करुन त्याला वळवून घ्या. वड्याचा आकार देऊन बाजूला ठेवा. कढईत तेल तापवून घ्या. तेल चांगले तापल्यानंतर मंद आचेवर वडा लालसर होईपर्यंत चांगला तळून घ्या. कमी तेलातला कुरकुरीत उपवासाचा वडा तयार होईल. हिरव्या चटणीसोबत खा.