Join us

नवरात्र स्पेशल: आज करा निळ्या रंगाचा चहा आणि मस्त भरली वांगी; पौष्टिक खाण्याची चंगळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2022 16:35 IST

नवरात्र स्पेशल : तिसरी माळ- रंग -गडद निळा, निळ्या रंगाचे कोणते पौष्टिक पदार्थ करता येतील? घ्या यादी..

ठळक मुद्देतुम्ही खाण्याचा निळा रंग वापरून काही पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता.

भक्ती सोमण-गोखले

निळा रंग हा प्रत्येकीच्या आवडीचा. आपल्या संग्रही एकतरी निळ्या रंगाची साडी असावीच अशी प्रत्येकीची इच्छा असते. त्यामुळे रंगाबाबतीत म्हणाल तर निळा रंग हा प्रत्येकीकडे मिळेलच मिळेल. आपल्या स्वयंपाकघरात निळ्या रंगाचे पदार्थ आहेतच. त्यात पहिला क्रमांक लागतो तो वांग्यांचा. गडद निळ्या रंगाच्या छोट्याश्या वांग्यापासून ते भरताच्या वांग्यापर्यंत निळ्या रंगाच्या शेड्स वांग्यात आढळतात. पण अनेकांना वांगं आवडत नाही. आता तर ब्लू बेरीजही बाजारात सहज मिळतात. गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर गोकर्णाची फूले उकळून त्यापासून केलेला निळ्या रंगाचा चहा लोकप्रिय झाला आहे. तुम्ही खाण्याचा निळा रंग वापरून काही पदार्थ नक्कीच ट्राय करू शकता.

(Image : google)

निळ्या रंगापासून करता येणारे पदार्थवांग्याच्या काचऱ्या, भरलं वांगं, ब्लू बेरीज, गोकर्णाचा चहा....

भरलं वांगं रेसिपी 

साहित्य- निळ्या रंगांची छोटी वांगी ४-५, बटाटे-१-२, एक मोठी वाटी ओला नारळ, दाण्याचं कुट, थोडासा कांदा, थोडीशी चिंच, गुळ, आवडीप्रमाणे गोडा मसाला, तिखट, मीठ, कोथिंबीर फोडणीचे साहित्य, तेलकृती- ओला नारळ, कांदा, दाण्याचं कुट, थोडीशी चिंच, गुळ, गोडा मसाला, तिखट, मीठ, कोथिंबीर हे सर्व एकत्र करून घ्यावे, वांग्याला मधोमध चिर पाडून त्यात हा मसाला भरावा. थोडा मसाला बटाट्याच्या फोडींनाही लावावा. आता कढईत २ मोठे चमचे तेल गरम करून त्यात नेहमीची फोडणी करावी. त्या फोडणीत मसाला भरलेली वांगी घालून त्याला वाफ आणावी. गरज असल्यास थोडे थोडे पाणी शिंपडावे. बटाटेही आवडत असतील तर घालावे. मसाला जर उरला असेल तर तोही एकत्र करावा. गरज असल्यास मीठ घालावे. वांगं, बटाटा चांगला शिजला की गॅस बंद करून कोथिंबीर घालावी. ही भाजी भाकरीबरोबर खायला जास्त मजा येते.

(लेखिका मुक्त पत्रकार असून, फूड बिझनेस प्रमोशन करणारे Three Cheers हे YouTube चॅनल चालवितात.)(https://m.youtube.com/channel/UCpBE9TFFIs5m5HjAOpJI-tw)

टॅग्स :अन्ननवरात्री