Fasting Tips : जास्तीत जास्त लोक धार्मिक (Navratri 2025) कारणांनी उपवास करतात, तर असेही लोक असतात जे तब्येत चांगली ठेवण्यासाठी, फिट राहण्यासाठी उपवास करतात. एक दिवस पोटाला आराम देण्यासाठी सुद्धा उपवास (Fasting) खूप महत्वाची मानला जातो. अशात जेव्हाही उपवास सोडला जातो, तेव्हा आपण काय खातो, कोणते पदार्थ खातो हे खूप महत्वाचं ठरतं. कारण त्यांचा आपल्या आरोग्यावर प्रभाव पडत असतो. अशात आपण आज पाहणार आहोत की, उपवास सोडताना काय खावे आणि काय खाऊ नये.
उपवास सोडताना काय खावे-प्यावे?
अनेक हेल्थ एक्सपर्ट, डॉक्टर सांगतात की, उपवास सोडताना नेहमीच शरीराला हायड्रेट करणारे, पचायला हलके, कमी फॅट असलेले, कमी फायबर असलेले पदार्थ खावेत. जे खालीलप्रमाणे बघता येतील.
नारळाचं पाणी
उपवास सोडल्यानंतर चहा–कॉफीऐवजी ताजं नारळपाणी किंवा लिंबूपाणी घ्यावं. यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.
उकडलेल्या भाज्या
उकडलेल्या भाज्या खाल्ल्यानं त्यातील पोषक तत्त्वं टिकून राहतात. भोपळा, झुकिनी (काकडीसारखी एक भाजी) यांसारख्या भाज्या हलक्या असतात. बटाटा व गाजर खाल्ल्याने सुद्धा उपवास सोडल्यानंतर उर्जा मिळते.
केळी
उपवासानंतर केळी खाणं हा सगळ्यात बेस्ट पर्याय मानला जातो. कारण यात भरपूर पोटॅशिअम असतं, फायबर असतं ज्यामुळे पचन सुधारतं आणि शरीर हायड्रेटही राहतं.
स्मूदी
एक किंवा दोन फळं मिक्स करून त्यात लो-फॅट दूध किंवा बदाम दूधात स्मूदी करून घेऊ शकता. स्मूदी हलकी आणि पचायला सोपी असते.
हलके जेवण
दुधी भोपळ्याची भाजी, राजगिऱ्याची भाकरी, मूग डाळीची खिचडी यांसारखे पदार्थ घ्यावेत. त्यासोबत लो-फॅट दहीचे रायते किंवा ताक घेणे उत्तम.
पाणी सगळ्यात महत्वाचं
उपवासादरम्यान सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दिवसभर भरपूर पाणी पिणे. डिहायड्रेशन टाळण्यासाठी दिवसभर थोड्या थोड्या वेळानं पाणी पित राहणं खूप गरजेचं आहे. असं न केल्यास चक्कर येऊ शकते किंवा आपण बेशुद्धही पडू शकता.
उपवास सोडताना काय टाळावे?
केक, कँडी, सोडा यांसारख्या जास्त साखर असलेल्या वस्तू, समोसा, कचोरी, आईस्क्रीम, तळलेले व जास्त फॅटचे पदार्थ टाळावेत. तसेच जास्त फायबर असलेल्या भाज्या व धान्य जसे की कोबी, डाळी, बीन्स, क्विनोआ, मसालेदार पदार्थ टाळावेत.