सणासुदीचे दिवस आले की घरात मस्त वेगवेगळ्या पारंपरिक पदार्थांची मेजवानीच असतेच. सणवार असला की ताटात काही खास पदार्थ असतात, या खास पदार्थांपैकीच एक पदार्थ म्हणजे नारळाच्या दुधातील खमंग - खुसखुशीत अळूची वडी. आपण नेहमीच्या वाफवलेल्या अळूच्या वड्या तर कायम करतोच, परंतु नारळाच्या दुधात (Tasty Alu Vadi Recipe) शिजवलेल्या वड्यांना येणारा खमंग आणि खुसखुशीतपणा (Narlachya Dudhatil Aluvadi) जिभेवर कायमच रेंगाळत राहतो. मसाल्यांचा सुगंध, अळूच्या पानांची चव आणि नारळाच्या दुधाची गोडसर चव यामुळे या वड्यांना एक वेगळाच स्वाद येतो(Narlachya Dudhatil Aluvadi Recipe).
कोणताही खास प्रसंग किंवा सणवार असला की घरात खास पारंपरिक पद्धतीच्या अळूच्या वड्या तयार केल्या जातात. या नेहमीच्या अळू वड्यांना थोडा ट्विस्ट देत आपण नारळाच्या दुधातील अळू वड्या देखील करू शकतो. बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम, तर नारळाच्या दुधाची गोडसर-खमंग चव तिच्या चवीत अधिकच भर घालते. अशा या वड्या खास जेवणात किंवा स्नॅक्समध्ये दिल्या, तर वड्या अगदी मिनिटभरात फस्त होतात. नेहमीच्या वाफवलेल्या अळूच्या वड्या तयार करण्यापेक्षा, आपण पारंपरिक पद्धतीच्या नारळाच्या दुधातील अळू वड्या एकदा नक्की ट्राय करुन पाहू शकतो. नारळाच्या दुधातील अळूवड्या तयार करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
२. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)
३. आलं - १ टेबलस्पून (बारीक किसलेलं)
४. हिरव्या मिरच्या - १ टेबलस्पून (बारीक चिरलेल्या)
५. लाल मिरची पावडर - १ टेबलस्पून
६. हळद - १/२ टेबलस्पून
७. गोडा मसाला - १/२ टेबलस्पून
८. धणेपूड - १/२ टेबलस्पून
९. जिरेपूड - १/२ टेबलस्पून
१०. गूळ - २ टेबलस्पून
११. मीठ - चवीनुसार
१२. चिंचेचा कोळ - १/२ कप
१३. तांदुळाचे पीठ - १/२ कप
१४. बेसन पीठ - २ कप
१५. अळूच्या वडीची पाने - ४ ते ५ पाने
१६. तेल - तळण्यासाठी
१७. नारळाचे दूध - २ ते ३ कप
१८. पिठीसाखर - २ टेबलस्पून
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, आलं, लाल मिरची पावडर, हळद,
गोडा मसाला, धणेपूड, जिरेपूड, गूळ, चवीनुसार मीठ, चिंचेचा कोळ, तांदुळाचे पीठ, बेसन पीठ घालावे.
२. बाऊलमधील सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. त्यानंतर या मिश्रणात गरजेनुसार पाणी घालून बॅटर मध्यम कंन्सिस्टंन्सीचे करून घ्यावे.
३. आता अळूची पाने घेऊन त्याला हे तयार बॅटर लावून घ्यावे. एकावर एक पान ठेवून त्यावर हे बॅटर लावून घ्यावे. त्यानंतर बॅटर लावून झाल्यावर या पानांची गोलाकार घडी घालूंन रोल तयार करून घ्यावा.
४. आता या गोलाकार रोलच्या अळू वड्या कापून घ्याव्यात. पॅनमध्ये थोडे तेल घेऊन या वड्या खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्याव्यात. दोन्ही बाजुंनी अळूवड्या छान खुसखुशीत होईपर्यंत तळून घ्याव्यात.
५. मग तयार नारळाचे दूध चमच्याने थोडे थोडे घेऊन या वड्यांवर सोडावे. मग झाकण ठेवून एक हलकीशी वाफ काढून घ्यावी.
नारळाच्या दुधातील खमंग, खुसखुशीत अशा अळूच्या वड्या खाण्यासाठी तयार आहेत.