Join us  

थंडीत खा नाचणीचे पौष्टिक लाडू, कॅल्शिअम भरपूर व्हा तंदुरुस्त! नाचणीच्या लाडूची परफेक्ट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 1:23 PM

Nagli Laddu Recipe Winter Special : या काळात आपण ड्रायफ्रूट किंवा आळीव, कणीक यांचे लाडू खातो. त्याचप्रमाणे नाचणीचेही लाडू खाल्ले तर शरीराचे चांगले पोषण होते.

ठळक मुद्दे हवे असल्यास तुम्ही यामध्ये बदाम पावडर, काडू पावडरही घालू शकता. त्यामुळे लाडूचा पौष्टीकपणा वाढण्यास मदत होईल. झटपट होणारे हे लाडू थंडीच्या दिवसांत आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरतात

नाचणी आरोग्यासाठी फायदेशीर असते हे आपल्याला माहित असते. मग कधीतरी नाचणीचे सत्त्व किंवा नाचणीचे आंबील आपण नाश्त्यासाठी करतोही, पण ते तेवढ्यापुरतेच. आपण गहू, ज्वारी, तांदूळ ही धान्ये नियमितपणे वापरतो. पण नाचणीचा आपण म्हणावा तितका आहारात वापर करत नाही. लोहाचा उत्तम स्त्रोत असलेली नाचणी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. थंडीच्या दिवसांत तर शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आणि ताकद भरुन काढण्यासाठी नाचणी आवर्जून खायला हवी असे सांगितले जाते. या काळात आपण ड्रायफ्रूट किंवा आळीव, कणीक यांचे लाडू खातो. त्याचप्रमाणे नाचणीचेही लाडू खाल्ले तर शरीराचे चांगले पोषण होते (Nagli Laddu Recipe Winter Special). 

(Image : Google)

नाचणीमध्ये प्रथिने, कार्बोदके, कॅल्शिअम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दात मजबूत राहण्यास मदत होते. लहान मुलांसाठी आणि वयस्कर व्यक्तींसाठीही नाचणी खाणे अत्यंत लाभदायक असते. मुलांचे वाढीचे वय असल्यामुळे आणि ज्येष्ठांना हाडे चांगली राहावीत यासाठी नाचणी नियमितपणे खायला हवी. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी शुगर नियंत्रणात राहण्यासाठी नाचणीचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. याबरोबरच कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहण्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी, शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यासाठीही नाचणी फायदेशीर ठरते. नाचणी पचायला हलकी असते त्यामुळे ज्यांना पचनाशी निगडीत तक्रारी आहेत अशांनी आवर्जून नाचणी खायला हवी. पाहूयात नाचणीच्या लाडूंची सोपी रेसिपी...

साहित्य -  

१. नाचणीचे पीठ - ३ वाट्या 

२. तूप - १ वाटी 

३. पिठीसाखर - २ वाट्या 

४. दूध - अर्धी वाटी 

(Image : Google)

कृती - 

१. कढईमध्ये तूप घालून त्यामध्ये नाचणीचे पीठ बारीक गॅसवर चांगले भाजून घ्यावे. हे पीठ भाजताना सतत हलवावे लागते नाहीतर पटकन करपते. त्यामुळे ते खरपूस होईपर्यंत सतत ढवळत राहा. 

२. पीठ भाजले गेल्याचा वास आला आणि तुम्हालाही ते खमंग भाजल्याचे जाणवले की त्यामध्ये दूध घाला आणि ते चांगले एकजीव करा. ३. गॅस बंद करुन यामध्ये पिठीसाखर घालून पुन्हा हे सगळे मिश्रण एकजीव करा. कढई आणि पीठ गरम असल्याने पीठीसाखर एकजीव होण्यास मदत होते. 

४. हे मिश्रण कोरडे वाटत असल्यास त्यामध्ये थोडे तूप किंवा दूध घाला. म्हणजे लाडू वळणे अवघड जाणार नाही. 

५. हवे असल्यास तुम्ही यामध्ये बदाम पावडर, काडू पावडरही घालू शकता. त्यामुळे लाडूचा पौष्टीकपणा वाढण्यास मदत होईल. 

टॅग्स :अन्नपाककृतीथंडीत त्वचेची काळजीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.