थंडीची चाहूल लागली की शरीराला आतून ऊब देणारे पदार्थ खाण्याकडे आपला कल वाढतो. आपले शरीर थंडीत गार पडू नये म्हणून आपण जसे गरम कपडे घालतो, तसेच शरीराला आतून गरम आणि ऊबदार ठेवण्यासाठी आहारात योग्य बदल करणे अत्यंत आवश्यक असते. गार हवामानात शरीरातील उष्णता कमी होते आणि त्यामुळे थकवा, खोकला, सर्दी, घशाची खवखव अशा समस्या वरचेवर त्रास देतात. अशावेळी रोजच्या आहारात काही छोटेसे बदल करून आपण शरीराला सहजपणे आतून गरम, ऊबदार आणि तंदुरुस्त ठेवू शकतो(Must add these 4 nutritious ingredients in flour to make rotis healthy & tasty in winter).
रोजच्या आहारात आपण चपाती तर नक्कीच खातो, या साध्या रोजच्या चपातीच्या पीठात काही खास घरगुती पावडर मिसळून आपण शरीराला आतून आवश्यक असणारी उष्णता देऊ शकतो. या खास मिश्रणामुळे चपाती अधिक पौष्टिक आणि चविष्ट तर होईलच, पण थंडीशी लढण्यासाठी शरीराला नैसर्गिक ऊर्जा देखील मिळेल. रोजची साधी चपाती खाऊन हुडहुडी भरवणाऱ्या थंडीला दूर पळवण्यासाठी चपाती कशी तयार करायची ते पाहूयात(warming ingredients for winter rotis).
थंडीत चपाती खाऊन मिळवा शरीराला हवीहवीशी ऊब...
१. सुंठ पावडर :- सुंठ पावडर किंवा सुक्या आल्याची पावडर पिठात मिसळून चपात्या करणे हिवाळ्यासाठी सर्वोत्तम पर्याय आहे. खरंतर, सुंठ किंवा सुके आले हिवाळ्यामध्ये शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामध्ये असलेले जिंजिरॉल आणि शोगोल यांसारखे घटक शरीरात उष्णता निर्माण करतात आणि सर्दी - खोकला यांसारख्या हंगामी आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. याशिवाय, अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म भरपूर प्रमाणांत असल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. यासाठीच, रोज अर्धा किंवा एक चमचा सुंठ पावडर पिठात मिसळून चपात्या केल्यास यामुळे चवही सुधारते आणि कडाक्याच्या थंडीतही शरीराला आतून ऊब जाणवते.
गारठ्याने होतो सर्दी - खोकला, वाढते घशाची खवखव? करा आजीबाईच्या बटव्यातील पारंपरिक उपाय...
२. मेथी पावडर :- मेथीच्या दाण्यांमध्ये आढळणारे सेपोनिन आणि फ्लेवोनॉइड्स हिवाळ्यामध्ये मधुमेह, वेदना आणि सूज कमी करण्यास मदत करतात. मेथी दाणे रक्तातील साखर नियंत्रित करतात आणि पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करतात. अशावेळी, पिठात १ ते २ चमचे मेथी पावडर मिसळून चपात्या तयार केल्यास त्यांची चव थोडी कडू होते, पण ते शरीराला ऊर्जा आणि उष्णता देण्याचे मुख्य काम करते.
३. ओव्याची पावडर :- हिवाळ्यात बरेचदा आपण पचायला भरपूर जड किंवा तेलकट, तूपकट पदार्थ खूप जास्त प्रमाणांत खातो. वरचेवर असे जड जेवण केल्यावर पोट फुगणे किंवा गॅसची समस्या सतावते. अशावेळी, पिठात ओवा पावडर मिसळून चपाती तयार करणे फायदेशीर ठरू शकते. ओव्यामध्ये थायमॉल असते, जो पचन करणारे एंझाइम्स अॅक्टिव्ह करतो आणि गॅस, अपचन यांसारख्या समस्यांचे प्रमाण कमी करतो.
गाजर न किसता कुकरमध्ये गाजर हलवा करण्याची झटपट रेसिपी, होईल इतका मस्त की खातच राहावा...
४. तीळ पावडर :- पौष्टिक तत्वांनी युक्त तिळामध्ये कॅल्शियम, आयर्न, झिंक आणि हेल्दी फॅट्सचे प्रमाण जास्त असते. तसेच, यात असलेले अँटीऑक्सिडंट्स हाडे मजबूत करतात आणि त्वचेला देखील निरोगी ठेवतात. अशावेळी, थंडीत होणाऱ्या त्वचेच्या कोरडेपणाच्या समस्या कमी होण्यासाठी चपात्या करताना त्यात तिळाची पावडर घालणे फायदेशीर ठरू शकते. पिठात २ ते ३ चमचे तिळाची पावडर मिसळून चपात्या तयार केल्यास त्या अधिक पौष्टिक व शरीराला आतून ऊब देण्यास मदत करतात.
