Join us  

Modak Recipe : उकडीचे मोदक बनवताना फाटतात? ही घ्या रेसेपी अन् मऊ, पांढऱ्याशुभ्र मोदकांसाठी टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 11:38 AM

Angarki chaturthi 2021 Modak Recipe & Tips : मोदक वळताना फाटतात आणि सारण बाहेर यायला लागतं. म्हणून काही टिप्स लक्षात घेतल्या तर मऊ, पांढरेशुभ्र उकडीचे मोदक तयार होतील.

ठळक मुद्दे. मोदक करायचे असतील दुपारपासूनच तयारीला सुरूवात करावी लागते. त्यातल्या त्यात उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं की बराच वेळ लागतो. . ही पद्धत वापरल्यानं बाप्पाला आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारे मोदक मस्त सुबक आणि रेखीव होतील. अत्यंत कमीतकमी वेळात तुम्ही बाप्पाला नैवेदय दाखवू शकता. 

मंगळवारी संकष्ट चतुर्थी आली की, त्यावेळी अंगारक योग जुळून येतो. अंगारकी चतुर्थी (Angarki chaturthi 2021)म्हटलं की सगळ्यात आधी डोक्यात येतं मोदक बनवणं. मोदक करायचे असतील दुपारपासूनच तयारीला सुरूवात करावी लागते. त्यातल्या त्यात उकडीचे मोदक बनवायचे म्हटलं की बराच वेळ लागतो. अनेकदा नेहमीप्रमाणे सारणाची, पीठाची तयारी करूनही मोदक मनासारखे होत नाही. मोदक वळताना फाटतात आणि सारण बाहेर यायला लागतं. म्हणून मोदक करताना काही टिप्स लक्षात घेतल्या तर मऊ, पांढरेशुभ्र उकडीचे मोदक तयार होतील.

साहित्य

स्वच्छ धुवून सुकवलेले तांदळाची पीठी

एक वाटी साखर किंवा गूळ

एक नारळ

दोन चमचे तूप

वेलची पूड

 तेल.

कृती

सारणासाठी कढईत थोडं तूप घालून खोवलेल्या नारळात साखर किंवा गूळ घालून मंद आचेवर शिजत ठेवा. शिजत असताना मधून मधून हलवत राहा  आणि भांड्याच्या तळाला सारण चिकटू देऊ नका. शिजत आल्यावर त्यात खसखस, वेलची पूड घालावी. हालवून सारण एकजीव करावे. पुन्हा थोडे शिजवून आचेवरून उतरवावे.

आवरणासाठी जितकं तांदळाचं पिठ, तितकंच पाणी उकळून घ्यावे. त्यात चवीपुरते मीठ, दोन चमचे तूप आणि अर्धा चमचा तेल घालावे. पाणी उकळल्यावर खाली घेऊन त्यात पिठ घालून हालवावे. 

झाकण ठेवून मंद गॅसवर दोन वाफा काढाव्या. आचेवरून खाली उतरवून ही उकड गरम असतानाच एखाद्या भांड्याच्या मदतीने मळावी. हाताने मळण्यासारखं झाल्यानंतर तेलपाण्याचा हात लावत मोदक घडवता येईल इतपत मऊसर ठेवावे.

या उकडीच्या पीठाचे गोळे करून हातानं पारी बनवावी. वाटीचा आकार देऊन त्यात सारण भरावे आणि पारीच्या कडा थोड्या थोड्या अंतरावर चिमटीने दाबून बंद कराव्या व टोक काढावे. मोदकाच्या कळ्या नेहमी विषम संख्येत म्हणजे तीन, पाच, अशा पाडाव्यात. 

हे तयार केलेले मोदक एका चाळणीत स्वच्छ पांढरे कापड घालून किंवा केळीच्या पानावर थोडं तुप लावून उकडायला ठेवावे आणि गरम असतानाच त्यावर साजूक तूप घालून खायला द्यावे. ही पद्धत वापरल्यानं बाप्पाला आणि तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणारे मोदक मस्त सुबक आणि रेखीव होतील. अत्यंत कमीतकमी वेळात तुम्ही बाप्पाला नैवेदय दाखवू शकता.  

टॅग्स :संकष्ट चतुर्थीभारतीय सणअन्न